
Mumbai News : पाच महिन्यापुर्वीच झालेल्या राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरभरून बहुमत मिळाले. त्यानंतर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार सत्तेत आले. सरकार सत्तेत येऊन पाच महिन्याचा कालावधी लोटला आहे, तरीही सरकारमधील तीन घटक पक्षात समन्वय साधणारी समिती अद्याप अस्तित्वात आलेली नाही. त्यामुळे तीनही पक्षांत समन्वयाचा अभाव जाणवतो.
महायुती सरकारमध्ये भाजप (BJP), शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचा पक्ष असे तीन पक्ष सत्तेत आहेत. हे सरकार सुरुवातीपासूनच एकत्रितपणाच्या प्रश्नांने ग्रासलेले दिसते. सत्तेच्या वाटपापासून ते धोरणनिर्मितीपर्यंत अनेक विषयांवर समन्वयाचा अभाव प्रकर्षाने जाणवत आहे. यासाठी नेत्यांनी समिती स्थापन करून नियमित बैठकांद्वारे निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, पाच महिने उलटूनही समितीचा काही थांगपत्ता नाही.
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांचे सरकार स्थापन होऊन पाच महिने झाले आहेत. तरी तीन पक्षामध्ये समन्वय साधणाऱ्या समितीची स्थापना करण्यात आली आहे. या पूर्वी एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री असताना सरकारचे कार्य करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीची बैठक होत होती. त्यावेळी स्थापन करण्यात आलेल्या समन्वय समितीमध्ये भाजपकडून माजी मंत्री सुधीर मुनगंटीवर, मंत्री आशिष शेलार, तर एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून शंभूराज देसाई तर अजित पवार यांच्या गटाकडून संजय खोडके यांचा यामध्ये समावेश होता. भाजपचे विधान परिषद सदस्य प्रसाद लाड हे या समितीचे समन्वयक होते.
गेल्या काही दिवसात या समन्वय समितीची बैठक झालेली नाही. त्यामुळे आता या समितीत कोणाचा समावेश करण्यात येणार याची उत्सुकता लागली आहे. नवीन सरकार सत्तेत येऊन पाच महिने झाले आहेत. हे नवे सरकार आल्यानंतर नवीन समन्वय समिती स्थापन करणे अपेक्षित होते. मात्र अद्याप समिती स्थापन करण्यात आलेली नाही. तर दुसरीकडे आधीची समिती या पुढेही कार्यरत राहील का ? असे देखील जाहीर करण्यात आले नाही. त्यामुळे समन्वय समिती स्थापण्याबाबत संभ्रम कायम आहे. समिती स्थापन करून आतापर्यंत बैठक होणे आवश्यक होते. मात्र, आतापर्यंत बैठकच झालेली नाही.
समन्वय समिती नसल्याने त्याचा थेट परिणाम प्रशासनावर होत असून, काही मंत्री आणि आमदार विकासकामांमध्ये अडथळे येत असल्याची तक्रार करत आहेत. निधी वाटप, फाइल क्लीअरन्स, प्राधान्यक्रम ठरवणे या साऱ्याच बाबींमध्ये गोंधळ दिसतो आहे. विशेषतः महायुतीतीमधील एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवार यांच्या गटात नाराजी असल्याची चर्चा आहे. त्यामुळे येत्या काळात या तीन पक्षात समन्वय राखणे गरजेचे आहे.
महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात तीन पक्षाचे मिळून महायुतीचे सरकार आहे. हे सरकार चालवायचे असेल, तर स्पष्ट समन्वय हवा आहे. समिती ही केवळ औपचारिकता न राहता, ती सक्रिय आणि परिणामकारक असणे आवश्यक आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याकडे लक्ष देऊन त्वरित तीन पक्षात समन्वय राखण्यासाठी आवश्यक असलेल्या समितीची नेमणूक करून समन्वय राखतील असे वाटते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.