
Mumbai : अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर अखेर रविवारी महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण 39 आमदारांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. पण या विस्तारामुळे आता नाराजीनाट्यही सुरू झाले आहे. शपथविधी होण्याआधीच महायुतीतील घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पक्षाचे सर्वेसर्वा व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची नाराजी समोर आली आहे.
मंत्रिमंडळ विस्तारामध्ये पक्षाला स्थान न मिळाल्याने आठवले यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द पाळला नाही, असे टीकाही आठवले यांनी केली. ते म्हणाले, नागपूरमध्ये महायुतीच्या आमदारांचा शपथविधी होत आहे. तिथे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीही उपस्थित राहणार आहेत. मी महायुतीतील एक घटक पक्ष आहे. तरीही मला त्याचे निमंत्रणही आलेले नाही.
निवडणुका असतात त्यावेळी मला सगळीकडे नेले जाते. शपथेची वेळ आली तेव्हा मला निमंत्रणही दिले नाही. रिपब्लिकन पक्षाचे निवडणुकीत चांगले प्रदर्शन राहिले. विधानसभा निवडणुकीत आंबेडकरी, दलित समाज महायुतीसोबत राहिला. लोकसभा निवडणुकीत संविधान बदलाच्या विरोधकांच्या प्रचारामुळे जनतेच्या मनात गैरसमज निर्माण झाला होता. पण संविधान बदलणार नाही, अशा आम्ही केलेल्या प्रचारामुळे विधानसभा निवडणुकीत हा समाज महायुतीसोबत राहिला, असे आठवले म्हणाले.
अनेक दिवस मंत्रिमंडळात आणि विधानसभेतही पक्षाला जागा दिली नाही. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांनी एक विधान परिषदेची आमदारकी आणि एक मंत्रिपद देण्याचे आश्वासन दिले होते. पण मंत्रिमंडळ विस्तारात पक्षाचा चेहरा दिसत नाही. अडीच वर्षांच्या सरकारमध्ये आमच्या पक्षाचा मंत्री नव्हता. आता गावागावांत माझ्या पक्षाच्या लोकांना तोंड कसे दाखवू, हा माझ्यासमोर प्रश्न असल्याची नाराजी आठवले यांनी व्यक्त केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मला केंद्रात मंत्रिपद दिले आहे. पण ज्या कार्यकर्त्यांनी मला मंत्रिपदापर्यंत पोहचवले, त्यांनाही संधी मिळायला हवी. मी अनेकदा फडणवीसांना भेटलो. त्यांनीही यावेळी नक्की मंत्रिपद मिळेल, असे सांगितले होते. आम्ही कालपर्यंत वाट पाहिली. पण आम्हाला फोन आला नाही. त्यामुळे मी आणि माझे कार्यकर्ते, समाज नाराज आहे. पक्षाला असे वागणूक देणे योग्य नाही. आता उरलेल्या दोन जागांवर पक्षाला संधी मिळाली, अशी मागणीही आठवलेंनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.