
Nashik News : नाशिक आणि मंत्री छगन भुजबळ हे राज्य मंत्रिमंडळातील समीकरण यंदा बदलले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिकच्या राजकारणात भाकरी फिरवली आहे. त्यामुळे एक नवे राजकीय पर्व सुरू झाले आहे. पक्षाचे नेते आणि सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी आज मंत्रीपदाची शपथ घेतली.
सिन्नरला मिळालेले हे दुसरे मंत्रिपद आहे. त्यासाठी प्रदीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागली. मात्र आता सिन्नरच्या राजकारणाला एक नव्हे आयाम प्राप्त झाले आहे. नाशिक जिल्ह्यात गेली वीस वर्षे छगन भुजबळ यांच्याकडेच मंत्रिपदाची धुरा येत होती. प्रदीर्घकाळ ते पालकमंत्री देखील होते. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणातील पानही भुजबळ यांच्याशिवाय हलत नव्हते.
मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाने भुजबळ वादात सापडले. या वादाची परिणिती यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे मताधिक्य मोठ्या प्रमाणावर घटले. त्यांच्या विजयात भाजपच्या यंत्रणेचे मोठे पाठबळ राहिले. नाशिकच्या राजकारणातील हा संदर्भ लक्षात घेऊन अजित पवार यांनी नवे पर्व म्हणून माणिकराव कोकाटे यांना संधी दिली आहे. त्यामुळे आता नाशिकच्या राजकारणात एक नवा वर्ग आणि नव्या कार्यकर्त्यांना पुढे येण्याची संधी प्राप्त होणार आहे.
भुजबळ यांच्या भोवती तयार झालेले आणि प्रदीर्घ काळ सत्तेत हस्तक्षेप करणारे ठराविक नेते आणि कार्यकर्ते यांना आता साईड ट्रॅक व्हावे लागणार आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्याच्या राजकारणात माणिक पर्व सुरू झाले अशी चर्चा आणि विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांमध्ये निर्माण झाला आहे. या निमित्ताने केवळ पक्षच नव्हे तर भुजबळ यांच्या दृष्टीने साईड ट्रॅक केलेले आणि अडगळीत टाकलेल्या अनेक कार्यक्षम आणि प्रतिष्ठित नेत्यांमध्येही एक नवा आत्मविश्वास निर्माण झाला आहे.
सिन्नर मतदार संघातून तुकाराम दिघोळे यांना शिवसेना-भाजप युतीच्या कार्यकाळात 97 ते 99 या कालावधीत राज्यमंत्रिपद मिळाले होते. त्यानंतर 25 वर्षांनी सिन्नरला आता नव्हे मंत्रिपद मिळाले आहे. या निमित्ताने उपमुख्यमंत्री पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात तुम्ही मला आमदार द्या मी त्याला मंत्रि करतो हे सिन्नरकरांना दिलेले आश्वासन पाळले आहे. मंत्रिपदाच्या शर्यतीत नाशिक जिल्ह्यातून अनेक नावे होती. यामध्ये प्रामुख्याने छगन भुजबळ यांना बाजूला करणे, हे धाडसाचे राजकारण होते.
प्रबळ आणि राज्यात दबदबा असल्याची स्थिती भुजबळ यांनी परिश्रमपूर्वक आणि जाणीवपूर्वक निर्माण केली होती. त्यामुळे भुजबळ यांना मंत्रिपदाची संधी डावलली जाईल, असे कोणालाही वाटत नव्हते. ही स्थिती धाडसी राजकारण आणि एकदा ठरवले ते कोणीही काहीही दबाव किंवा सल्ला दिला तरी केल्याशिवाय राहात नाहीत, अशी प्रतिमा असलेले उपमुख्यमंत्री पवार यांनी हा निर्णय घेतला आहे.
माणिकराव कोकाटे यांना मंत्रीपदाची शपथ दिल्याने नाशिक जिल्ह्यासह सिन्नरमध्ये अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे. यानिमित्ताने राजकारणाचे एक सत्ता केंद्र भुजबळ फार्म येथून बाजूला जाणार आहे. विशेष म्हणजे कोकाटे आणि भुजबळ यांचे फारसे सख्य नाही. किंबहुना सिन्नरच्या राजकारणात भुजबळ यांनी सातत्याने कोकाटे यांच्या विरोधकांना साथ केल्याचा इतिहास आहे. अशा परिस्थितीत कोकाटे बहुजन समाजाचा चेहरा म्हणून नाशिकच्या राजकारणात एक नवी आशा आहे.
कोकाटे यांनी शपथ घेतल्यानंतर सिन्नर मध्ये साजरा करण्यात आलेला समर्थकांचा जल्लोष आणि नाशिकच्या प्रस्थापित आणि विस्थापित अशा दोन्ही गटांनी आणि विशेषतः बहुजन समाज तसेच मराठा कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेला आनंद, हे त्याचे प्रत्यंतर आहे उपमुख्यमंत्री पवार यांनी घेतलेला हा निर्णय नाशिकच्या राजकारणाला कोणती दिशा देतो, हे लवकरच स्पष्ट होईल.
आमदार कोकाटे सिन्नर मतदार संघातून पाच वेळा आमदार म्हणून विजयी झाले आहेत. 2014 ते 19 हा अपवाद वगळता ते सातत्याने सिन्नरचे आमदार राहिले आहेत. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत देखील ते मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. यानिमित्ताने नाशिक जिल्ह्यात मराठा कार्ड चा धबधबा पुन्हा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उपमुख्यमंत्री पवार यांनी टाकलेला हा डाव राजकारणात अनेकांना धक्का देणारा ठरला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.