
BJP Vs MNS : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आयोजित केलेल्या प्रतिपालिका सभागृहाला उपस्थित राहण्यास भाजपने नकार दिला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे युतीच्या चर्चा सुरु असल्याच्या पार्श्वभूमीवर या नकाराकडे बघितले जात आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप करत या प्रतिपालिका सभागृहाला उपस्थित राहणार नसल्याचे पत्र मुंबई भाजपने मनसे नेते संदीप देशपांडे यांना पाठविले आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातील मधुर संबंध जवळपास संपल्यात जमा आहे.
मुंबई महापालिकेची मुदत संपून जवळपास 2 वर्षांचा कालावधी झाला आहे. लोकप्रतिनिधीच नसल्यामुळे लोकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे, त्यामुळे प्रमुख पक्षाच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये पत्रकार भवन येथे मनसेने प्रतिसभागृहाचे आयोजन केले आहे. या प्रतिपालिका सभागृहाला भाजपकडून मंत्री आशिष शेलार, शिवसेनेकडून मंत्री उदय सामंत, काँग्रेसकडून खासदार वर्षा गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसकडून सिद्धार्थ कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून राखी जाधव आणि समाजवादी पक्षाकडून आमदार रईस शेख यांना निमंत्रण देण्यात आले होते.
याच प्रतिसभागृहात सहभागी होण्यास भाजपने नकार दिला आहे. ज्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने 25 वर्षे मुंबई महापालिकेत पराकोटीचा भ्रष्टाचार केला, ज्यामुळेच मुंबईतील समस्यांनी आक्राळ विक्राळ रूप धारण केले आहे; त्यांच्याच सोबत मुंबईकरांच्या समस्यांबाबत चर्चेत सहभागी होऊन काय साध्य होईल? असा प्रश्न उपस्थित करत या प्रतिपालिका सभागृहाला उपस्थित राहणार नसल्याचे पत्र मुंबई भाजपने मनसे नेते संदीप देशपांडे यांना पाठविले आहे. पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे या दोन पक्षांची युतीची चर्चा सुरु आहे. त्यातच या प्रतिपालिका सभागृहाला आमदार आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहेत. त्यामुळेच भाजपने नकार दिल्याचे बोलले जात आहे.
प्रति,
मा. श्री. संदीप देशपांडे
मुंबई शहर अध्यक्ष,
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
दादर, मुंबई – ४०० ०२८
महोदय,
विषय :- आपले दिनांक २१ एप्रिल २०२५ चे महापालिका प्रतिसभागृहाबाबतचे पत्र ....
आपले उपरोक्त विषयाबाबतचे निमंत्रण आम्हाला मिळाले. निमंत्रणाबाबत आभार !
ज्या उ. बा. ठा. गटाने गेली २५ वर्षे मुंबई महापालिकेत पराकोटीचा भ्रष्टाचार केला ज्यामुळेच मुंबईतील समस्यांनी आक्राळ विक्राळ रूप धारण केले आहे; त्यांच्याच सोबत मुंबईकरांच्या समस्यांबाबत चर्चेत सहभागी होऊन काय साध्य होईल ? असा स्वाभाविक प्रश्न आमच्या पक्षांतर्गत चर्चेअंती उपस्थित झाला. मुंबईकरांचे जीवनमान सुसह्य करण्यासाठी आणि समस्यांवर तोडगा काढण्यासाठी मुंबई भाजपाचे अध्यक्ष श्री. आशिष शेलार, मुंबईचे मंत्री महोदय, आमदार, वरिष्ठ नेते, लोकप्रतिनिधी व आम्ही सर्व भाजपा नगरसेवक सातत्याने रस्त्यावर उतरून सातत्याने प्रयत्नशील आहोतच.
मुंबईतील रस्त्यांच्या दर्जाबाबत आणि कामात होणाऱ्या विलंबाबाबत भाजपा आमदार, लोकप्रतिनिधी यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्रजी फडणवीस यांनी प्रशासनाची प्रदीर्घ बैठक घेऊन दि. ३१ मे २०२५ पूर्वी चालू कामे पूर्ण करण्याचे सकारात्मक निर्देश दिलेले आहेत. दरवर्षी प्रशासनाच्या नाले सफाईबाबतच्या दाव्याची प्रत्यक्ष नाल्यावर जाऊन पाहणी मुंबई भाजपा अध्यक्ष मा. ना. श्री. आशिष शेलार व भाजपाचे लोकप्रतिनिधी करत आहेत. मा. ना. आशिष शेलार, पालकमंत्री मुंबई उपनगर व मा. ना. मंगलप्रभात लोढा, सह पालकमंत्री हे आरोग्य, कचरा व्यवस्थापन, आपत्कालीन व्यवस्थापन, महापालिका विविध प्रकल्प याबाबत वेळोवेळी आढावा बैठका घेत आहेत.
वरील वस्तुस्थिती लक्षात घेता महापालिका प्रतिसभागृहात २५ वर्षे पराकोटींचा भ्रष्टाचार करणाऱ्यांच्यासोबत चर्चेत सहभागी होण्यापेक्षा भाजपा रस्त्यावर उतरून मुंबईकरांच्या समस्या सोडविण्यासाठी यापूर्वी प्रमाणेच सातत्याने • अग्रेसर व कटिबद्ध राहील.
पुनश्च एकदा आपल्या निमंत्रणाबद्दल आभार !
धन्यवाद !
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.