Mumbai News, 27 Nov : केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना 'आयआयटी बॉम्बे’च्या नावातील बॉम्बे तसेच ठेवले. त्याचे मुंबई केले नाही हे चांगलेच झाले. त्यामुळे मी खूश आहे.', असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून नव्या वादाला तोंड फुटलं होतं. मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी या वक्तव्यावरून टीका केली होती.
अशातच आता ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून जितेंद्र सिंह यांच्या वक्तव्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. शिवाय सिंह यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना भाजपवर सडकून टीका केली आहे. सामनात लिहिलं की, भाजपच्या डोक्यात मुंबई-महाराष्ट्राविषयी कोणते कारस्थान शिजते आहे त्याचा भंडाफोड केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी केला.
सिंह मुंबईत येऊन म्हणाले की, 'आयआयटी बॉम्बे’च्या नावातील ‘बॉम्बे’ तसेच ठेवले. त्याचे ‘मुंबई’ केले नाही हे चांगलेच झाले. त्यामुळे मी खूश आहे.' हे विधान मुंबादेवीचा अपमान करणारे आहे. जितेंद्र सिंह यांना हे असे बोलण्याची अजिबात गरज नव्हती, पण त्यांनी हे विधान केले. मोदी-शहा-अदानी यांच्या डोक्यात काय सुरू आहे ते डॉ. सिंह यांनी जाहीर केले. सिंह हे पंतप्रधानांचे निकटवर्तीय आहेत.
हे महाशय जम्मूमधून निवडून येतात व मुंबईत येऊन ‘बॉम्बे’चा ‘उदो उदो’ करतात. त्यांना संयुक्त महाराष्ट्राचा लढा आणि इतिहास कोणीतरी समजावून सांगायला हवा. महाराष्ट्राला मुंबई मिळाली ती दिल्लीशी लढा देऊन आणि ‘बॉम्बे’चे ‘मुंबई’ केले तेदेखील संघर्ष करून. सिंह यांना मात्र ‘बॉम्बे’चाच तोरा मिरवायचा आहे. ‘बॉम्बे’ची तरफदारी करणाऱ्या डॉ. सिंह यांच्यावर महाराष्ट्रात गुन्हाच दाखल व्हायला हवा, पण इतका महाराष्ट्र स्वाभिमान फडणवीसांच्या मिंध्या सरकारात शिल्लक आहे काय?
स्वतःस शिवसेना म्हणवून घेणाऱ्या टोळ भैरवांकडून जितेंद्र सिंह यांच्या ‘बॉम्बे’ प्रेमावर साधा निषेधाचा सूर निघालेला दिसत नाही. मुंबईची अवहेलना करून एक केंद्रीय मंत्री येथून सरळसोट निसटतो हे राज्य सरकारचे अपयश आहे. महाराष्ट्र प्रेमाचे ढोंग करणारे लोक सरकारात आहेत. त्यांचे महाराष्ट्र प्रेम तकलादू आहे. मुंबईवर भाजपच्या दिल्लीकर नेतृत्वाची सुरुवातीपासूनच वाईट नजर आहे, अशा शब्दात भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेवर सामनात टीका केली आहे.
तर गेल्या दहा वर्षांपासून मुंबईची पद्धतशीर लूट सुरू आहे. मुंबई ही ‘मुंबई’ राहू नये व ती एकतर गुजरातच्या पोटात घालावी, नाहीतर दिल्लीची आश्रित व्हावी यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मुंबईवर ज्यांचा मराठी पगडा होता अशा संस्थांचे सरळ गुजरातीकरण केले गेले. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचा ताबा गुजरातच्या गौतम अदानींकडे दिला. मुंबईतील धारावीसह अनेक मोक्याचे भूखंड अदानींना देऊन मराठी माणसाचा मुंबईवरील हक्क कमजोर केला जात आहे.
मुंबई यापुढे महाराष्ट्राच्या बाहुपाशात राहू नये व मुंबईवर केंद्राचे नियंत्रण राहावे याची सुरुवात मोदी-शहांनी चंदिगडपासून केली. मुंबईस केंद्रशासित करून महाराष्ट्रापासून तोडायचे व या केंद्र शासित मुंबईवर गुजरातचा प्रशासक लादून मुंबईची लूट सुरू ठेवायची. उद्या मुंबईचे ‘बॉम्बे’ करून मुंबईचे महाराष्ट्राबरोबरचे भावनिक नाते तोडायचे हे धोरण स्पष्ट दिसते. महाराष्ट्रातील सर्वच स्वाभिमानी राजकीय पक्षांनी ही बाब गांभीर्याने घेणे गरजेचे आहे.
सरकारमधील भाजप, मिंधे व अजित पवारांच्या पक्षाला जितेंद्र सिंह यांच्या मुंबईविरोधी वक्तव्याने वेदना झाल्या नाहीत. कारण हे तिन्ही पक्ष दिल्लीच्या वाटेवरील पायपुसणे झाले आहेत, असा टोला लगावत विरोधी पक्षाने मात्र जितेंद्र सिंह यांच्या वक्तव्याचा फक्त निषेध करून चालणार नाही, तर त्यास जाहीरपणे ‘जोडे मारो’ आंदोलन सुरू केले पाहिजे, असं आवाहन सामनातून केलं आहे.
मुंबईला ‘मुंबई’ हे नाव ‘मुंबाई’ किंवा ‘मुंबादेवी’ हिच्या प्रसादानेच मिळाले आहे. मुंबईप्रमाणे तिच्या या नावाचे अपहरण करण्याचे प्रयत्न अनेकदा झाले. मुंबईचे बारसे पोर्तुगीजांनी केले, अशी समजूत करून घेऊन ‘बॉम्बे’च्या प्रेमात पडणाऱ्यांची अवलाद येथे आहे. केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांचे ‘बॉम्बे’ प्रेम हे त्यांच्या मानसिक गुलामीचे लक्षण आहे. अयोध्येच्या राममंदिरावर धर्मध्वजा फडकवून पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘भारताला गुलामीच्या मानसिकतेतून मुक्त करू.
पण त्यांच्या मंत्रिमंडळात ‘बॉम्बे’ची चाटूगिरी करणारे, पोर्तुगीज बापाची चाटूगिरी करणारे मंत्री बसले आहेत. त्यांना काय शिक्षा देणार? सिंह यांना मराठी जनांचे जोडे खावेच लागतील. या जोडेमारीत भाजप, अजित पवार व मिंधे लोक सामील होतात काय तेच पाहायचे? पोर्तुगीज बापाच्या गुलामांनो, मुंबईचा अपमान करणार असाल तर याद राखा, असा सनसनीत इशारा देखील ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुखपत्रातून देण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.