Mumbai News, 20 May : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ महायुती सरकार स्थापन झाल्यापासून नाराज होते. कारण जेष्ठ नेते असूनही त्यांना फडणवीस सरकारने मंत्रिपदापासून वंचित ठेवलं होतं.
मंत्रीपद न मिळाल्याची खंत भुजबळांनी अनेकदा जाहीरपणे बोलून दाखवली होती. त्यांची नाराजी त्यांच्या बोलण्यातून आणि कृतीतून सतत दिसत होती. पक्षाच्या वरिष्ठांनी अनेकदा त्यांची समजूत काढली होती पण ती निष्फळ ठरली.
मात्र, आता याच नाराज भुजबळांना महायुती सरकारने अचानक मंत्रिपदाची जबाबदारी देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. सोमवारी रात्री राज्याच्या राजकारणात अनपेक्षित अशी बातमी समोर आली ती म्हणजे छगन भुजबळ यांची मंत्रीपदी वर्णी लागणार आहे.
शिवाय त्यांचा शपथविधी आजच म्हणजे मंगळवारी (ता.20) सकाळी 10 वाजता राजभवनात पार पडणार आहे. छगन भुजबळांकडे धनंजय मुंडे यांच्याकडील अन्न व नागरी पुरवठा खात्याचा कारभार सोपवला जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, अचानकपणे छगन भुजबळ यांना मंत्रिपद देणार असल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर हे कधी आणि कसं घडलं याची उत्सुकता संपूर्ण राज्याला लागून राहिली आहे. शेवटच्या क्षणापर्यंत कोणालाही याबाबतची माहिती कशी नव्हती अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
अशातच स्वत: छगन भुजबळ यांनी देखील त्यांना याबाबतची माहिती एका मेसेजद्वारे मिळाल्याचं सांगितलं. ते म्हणाले, "मला फक्त एका ओळीचा मेसेज आला आणि मला एवढंच सांगण्यात आलं की, राज्य मंत्रिमंडळात तुमची वर्णी लागली असून शपथविधी मंगळवारी सकाळी दहा वाजता होईल."
त्यामुळे आता भुजबळांचे कमबॅक करत अजितदादांची राष्ट्रवादी ऐन आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये आपली ताकद वाढवण्यासाठी रणनीती आखत आहे का? की भुजबळांची अधिकची नाराजी पक्षाला परवडणारी नव्हती त्यामुळे यांचा मंत्रिमंडळात समावेश केला? अशा विविध चर्चांना आता उधाण आलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.