

Maratha Reservation Latest News : मराठा आरक्षणाबाबत २ जानेवारीपर्यंत मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला मुदत दिली आहे, पण या मुदतीवरून आता वेगवेगळ्या शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. माजी मंत्री आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी २ जानेवारीच्या तारखेबाबत एक मोठी भीती व्यक्त केली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं. कालच्या यशस्वी मध्यस्थीचं यश हे जरांगे पाटील आणि मराठ्यांचं आहे. माझा एक कार्यकर्ता म्हणून रोल होता, असं बच्चू कडू म्हणाले. जरांगे पाटील यांनी दिलेल्या २ जानेवारीच्या मुदतीवरही बच्चू कडू बोलले.
आता जो तारखेचा घोळ होत आहे, तो मी तारीख जाहीर करताना जरांगे पाटलांशी बोललो होतो. तीन महिने वेळ द्या, असं मी सांगत होतो. पण आता लोकसभा निवडणूक आचारसंहितेच्या आत हा मराठा आरक्षणाचा प्रश्न मिटला पाहिजे, असं बच्चू कडू म्हणाले.
जरांगे पाटील हे २४ डिसेंबरची तारीख म्हणत आहेत. सरकार दोन जानेवारी म्हणत आहे. मात्र, या काळात दिवाळीच्या आठ ते दहा दिवस सुट्ट्या जात आहेत. त्यामुळे मोठी अडचण निर्माण होईल. यामुळे राज्य सरकारने २४ तारीख समजूनच काम केलं पाहिजे तर ते लगेच होईल, असं बच्चू कडू म्हणाले.
७५ वर्षे सर्वच पक्षांनी अन्याय केला. त्यामुळे कोण खरं आणि कोण खोटं? कोणावरही आता मराठ्यांना विश्वास राहिलेला नाही. मोठा अन्याय त्यांच्यावर झालेला आहे. मराठा कोण आहे? कुणबी नाही तर कोण आहे? असा प्रश्न उपस्थित होतो. आता तारखेनंतर आणखी पुन्हा तारखा मिळतील, आचारसंहिता लागेल, सरकारच राहणार नाही आणि त्यामुळे भीतीचं वातावरण आहे. पण मराठ्यांनी आता विश्वास ठेवावा. सरकारने २४ डिसेंबरची तारीख समजूनच राज्य सरकारने २४-२४ तास काम गरजेचं आहे. जानेवारीमध्ये लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू शकते. यामुळे त्याच्या आत हा निर्णय झाला पाहिजे. लोकसभा निवडणूक अचारसंहितेच्या आत निर्णय झाला नाही तर मोठी अडचण निर्माण होईल. सत्तेत असलेल्या सरकारलाही अडचण होईल आणि मराठ्यांचा उद्रेक वाढेल, अशी भीती बच्चू कडू यांनी केली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
तारीख ही महत्त्वाची नाही. आरक्षण हे लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या आधी दिलं पाहिजे. सध्या शिष्टमंडळ भेटणार नाही. आता जरांगेच्या प्रकृतीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. पण पुढे जाऊन राज्य सरकारने दगा फटका केला, तर आम्ही पूर्ण मराठ्यांसोबत उभे राहू. पूर्ण ताकदीने आंदोलनात सहभागी होऊ आणि राज्य सरकारला घेरू, असा इशाराही बच्चू कडू यांनी दिला.
मी जर मध्यस्थी केली आहे तर मला त्याचे परिणाम भोगले पाहिजे. मी एक कार्यकर्ता म्हणून गेलो होतो. सरकारचा प्रतिनिधी म्हणून गेलो नव्हतो. मात्र, जरांगेंची प्रकृती पाहून सरकार आणि जरांगेची मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, असं बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.