Mumbai News, 27 Apr : राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्तीच्या करण्याच्या निर्णयावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापले आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी 1 मे महाराष्ट्र दिनापासून हा नियम लागू करण्याची घोषणा केली होती.
मात्र, या निर्णयाला रिक्षा-टॅक्सी चालक संघटनांनी तीव्र विरोध केला. तसंच शिवसेना नेते संजय निरुपम यांनी देखील या निर्णयाला विरोध केला होता. अशातच आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंत्रालयात रिक्षा-टॅक्सी संघटनांच्या नेत्यांसोबत बैठक आयोजित केली होती.
मात्र, या बैठकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला निमंत्रण देण्यात आले नव्हते. यावरूनच राज्य सरकार मराठी सक्तीच्या निर्णयावरुन बॅकफूटवर जाण्याच्या तयारीत असल्याचे वक्तव्य मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केलं होतं.
अशातच आता मंत्रालयातील बैठक पार पडली असून बैठकीनंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं की, "आजच्या बैठकीत काहींनी राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्ती करण्याच्या निर्णयासाठी मुदतवाढ करण्याची मागणी केली आहे.
काहींनी एक वर्ष, काहींनी सहा तर काहींनी तीन महिन्यांची मुदत मागितली. यावर बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल, रिक्षा, टॅक्सी चालवायची असेल तर मराठी यायलाच पाहिजे, याला सगळ्यांनी सकारात्मकता दाखवली.
प्रत्येकाची भूमिका आम्ही ऐकून घेतली. सर्वांनी आमच्या रोजी रोटी बंद नाही झाली पाहिजे, अशी भूमिका असेल तर आम्हाला हा निर्णय मान्य असल्याचं सांगितलं. त्यानंतर त्यांनी मुदत मागितली. शिवाय मुदत मागताना त्यांनी जबाबदारी देखील घेतली आहे. रिक्षा टॅक्सी युनियनचे नेते आमच्या भूमिकेशी सहमत आहेत," असं सरनाईकांनी सांगितलं.
तर त्यांनी मुदत मागितली असली तरी अद्याप आम्ही ती दिलेली नाही. पण त्यांच्या मागण्यांशी सकारात्मक भूमिका घेऊ. त्यांनी मुदत मागितली आहे आमचीही द्यायची तयारी आहे. फक्त आता किती वेळ द्यायचा किती काळासाठी द्यायचा याचा निर्णय, उद्या आरटीओ अधिकाऱ्यांशी बैठक बोलावली आहे. या बैठकीनंतर निर्णय जाहीर करू की किती मुदतवाढ द्यायची, असंही सरनाईकांनी स्पष्ट केलं.
शिवाय त्यांनी मुदत वाढवून मागितली आणि त्यांचं समाधान करण्यासाठी मुदतवाढ देणार असं अजिबात नाही. मुदतवाढ द्यायला तयार आहे पण त्यांची मुजोरी चालणार नाही, महाराष्ट्रात हिंदीतच बोलू असली मुजोरी चालमार नाही, असा इशाराही सरनाईकांनी यावेळी दिला. मात्र, सरनाईक यांनी मुदतवाढीच्या भूमिकेसाठी ते सकारात्मक असल्याचं सांगितल्यामुळे मनसेने जी शंका व्यक्त केली होती. ती आता खरी होणार की काय अशा चर्चांना उधाण आलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.