Dombivali : उंबर्डे येथील दफनभूमी व कोंडवाड्यासाठीची आरक्षित जागा खेळाच्या मैदानासाठी उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी विधीमंडळ अधिवेशनात केली. कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाने नगरविकास विभागाला याबाबतचे पत्र दिले असल्याचे भोईर यांनी सांगितले. गेल्या पाच वर्षात त्याची दखल घेतली नाही, अशी खंत भोईर यांनी व्यक्त केली.
कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्रात केडीएमसी क्षेत्रात 22 एकर जागेवर दफनभूमी व कोंडवाड्यासाठी दोन जागा आरक्षित आहेत. उंबर्डे गावात अल्पसंख्याक समाजाचे वास्तव्य नाही. उर्वरीत जमिनी या विविध प्रकल्प, गृहसंकुलांना देण्यात आल्या आहेत. गुरे राहिलेली नसल्याने कोंडवाड्याचा प्रश्न येत नाही. केडीएमसी प्रशासनाने ४ मे २०१८ रोजी ठराव मंजूर करुन हे आरक्षण बदलून तेथे खेळाच्या मैदानासाठी आरक्षण द्यावे, याविषयी नगररचना विभागास पत्र दिले आहे. हा ठराव लवकर मंजुर करुन त्या भागास उत्तम क्रीडा संकुल उभे करावे, अशी मागणी भोईर यांनी केली.
भूमीपुत्रांच्या गावठाण जमिनीच्या विस्ताराचा मुद्दाही आमदार भोईर यांनी उपस्थित केला. कल्याण, ठाणे, रायगड या परिसरातील भूमीपुत्रांच्या गावठाण जमिनीचा विस्तार अनेक वर्षांपासून रखडलेला आहे. जो अद्यापही झालेला नाही. यामुळे अनेक गावठाण भागातील भूमीपुत्रांना भाड्याने कुठेतरी घर घेऊन राहावे लागते. याचा विचार करून राज्य सरकारने गावठाण जमिनीचा विस्तार करावा, अशी मागणी भोईर यांनी केली आहे.
कल्याण शहरातील वन विभागाचा भाग काही प्रमाणात महसूल विभागात येतो. दोन्ही विभागामध्ये समन्वय नसल्याने संबंधित क्षेत्रावर अद्यापही वन विभागाचे नियंत्रण आहे. या परिसरात गेल्या 40 ते 50 वर्षांपासून अडीच हजारहून अधिक कुटुंब घरे बांधून राहत आहेत. त्यांच्यावर भाविष्यात कारवाईची टांगती तलवार आहे. वनमंत्री सुधीर मनुगंटीवर आणि महसूल विभागाने संबंधित कुटुंबीयांना कोणत्या तरी योजने अंतर्गत दिलासा द्यावा. ते राहत असलेली घरे कायम करण्यासाठी प्रयत्न करावे, याकडे भोईर यांनी सरकारचे लक्ष वेधले.
Edited By : Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.