Manoj Gharat News : शिवाजी पार्कवर रविवारी राज ठाकरेंची सभा झाली. दिवसभर ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा होती. मात्र, राज ठाकरेंच्या सभेपूर्वीच भाजपने मनसेला मोठा झटका दिल्याचे समोर आले आहे. मनसेचे माजी डोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
निवडणुकीच्या रिंगणातून भाजपाचे उमेदवार महेश पाटील यांच्या विरोधातील उमेदवारी घरत यांनी माघार घेतली होती. त्याचवेळी ते भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. घरत हे भाजपात गेल्याने मनसे पक्षाला मोठा झटका बसल्याची चर्चा आहे.
डोंबिवली पश्चिमेतील प्रभाग 22 मध्ये आयोजित भाजपा प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या जाहीर सभेत मनसेचे मनोज घरत यांनी भाजपात प्रवेश केला. महायुतीचे उमेदवार प्रकाश भोईर, विकास म्हात्रे, कविता म्हात्रे आणि अश्विनी म्हात्रे यांच्या प्रचारासाठी देवी चौकात ही सभा घेण्यात आली होती. याच वेळी मनोज घरत यांच्यासह रवी गरुड, केदार चाचे, संदीप शिंदे, संतोष शिलकर, निनाद मिसाळ यांसह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.
यावेळी मनोज हे काहीसे भावुक झाल्याचे दिसून आले. त्यांच्या डोळ्यात पाणी आले होते. 20 वर्षे एका पक्षाशी एकनिष्ठ होतो मात्र आता काही कारणास्तव वेगळा निर्णय घ्यावा लागतो अशी भावना त्यांनी खासगीत बोलून दाखवली.
या घडामोडीची सुरवात पॅनल 27 मध्ये झालेल्या राजकीय नाट्यावरून दिसून आली. या पॅनलमधून भाजपाचे उमेदवार महेश पाटील यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या मनोज घरत यांनी माघार घेतल्याने महेश पाटील हे बिनविरोध निवडून आले आहेत. विशेष म्हणजे महेश पाटील हे काही महिन्यांपूर्वीच शिंदे सेनेतून भाजपात आले आणि त्यांनी एकहाती विजय देखील मिळवला.
पॅनल 27 मध्ये भाजपाचे मंदा पाटील, महेश पाटील, अभिजित थरवळ आणि सायली विचारे हे उमेदवार रिंगणात होते. यापैकी मंदा पाटील आणि महेश पाटील हे बिनविरोध निवडून आले आहेत. त्यांच्या विरोधातील मनसेच्या सुवर्णा पाटील आणि मनोज घरत यांनी माघार घेतली होती.
घरत यांना ऐन निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची वेळ आल्याने ते प्रचंड नाराज असल्याची चर्चा होती. त्यामुळे ते लवकरच भाजपात प्रवेश करतील याची जोरदार चर्चा रंगली. त्यांना मोठी ऑफर भाजपा पक्षाकडून दिल्याची चर्चा रंगात असतानाच त्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देखील घरत यांच्यावर टीका केल्याचे दिसून आले. तोपर्यंत मनोज यांनी केवळ पक्षातील पदाचा राजीनामा दिला होता.
मनोज घरत हे केवळ उमेदवार नव्हते, तर ते मनसेचे डोंबिवली शहराध्यक्ष होते. मनसे नेते राजू पाटील यांचे ते अत्यंत विश्वासू मानले जातात. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी डोंबिवलीतील संघटनात्मक फेररचनेनंतर पुन्हा घरत यांच्याकडे शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली होती.
त्यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या विद्यार्थी सेनेला नवसंजीवनी मिळाली होती आणि कार्यकर्त्यांमध्येही नवचैतन्य निर्माण झाले होते. त्यामुळे पॅनल २७ मध्ये महेश पाटील विरुद्ध मनोज घरत अशी सरळ, पण चुरशीची लढत होईल, असे चित्र निर्माण झाले होते. मात्र, ऐनवेळी घरत यांनी माघार घेतल्याने राजकीय चित्रच पालटून गेले होते. अखेर त्यांनी भाजपात प्रवेश केला असून यामुळे मनसेची डोंबिवलीमध्ये मोठे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.