

Chhath Puja controversy Mumbai : मुंबई आणि महाराष्ट्रात छठ पुजेवरून, काही ठिकाणी संघर्ष उफाळले आहेत. त्याला काही ठिकाणी राजकीय संघर्ष सुद्धा प्राप्त झाला आहे. विशेष करून मुंबईत, छठ पूजेवरून वाद वाढू लागले आहेत. समाज माध्यमांवर तसे काहीसे चित्र रंगवले जात आहे. यामागे उत्तरप्रदेशाच्या निवडणुकीचा राजकीय संधीसाधूपणा लपलेला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी, यावरून भाजप आणि त्यांच्या सोशल मीडियाला 'विषारी' म्हणत, मुंबईसह महाराष्ट्राला सावध केले आहे. राज ठाकरे यांच्या या भूमिकेवर, भाजप काय प्रत्युत्तर देते? मराठी माणूस काय भूमिका घेतो? भाजप विरोधक राज ठाकरेंच्या भूमिकेला कसा प्रतिसाद देतात? मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते ग्राऊंड पातळीवर छठ पुजेवरून कोणता संघर्ष करतात? अशा एक ना अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी, 'एक्स' खात्यावर पोस्ट शेअर करत, भाजपच्या आणि त्यांनी पोसलेल्या विषारी सोशल मीडिया सेलला छठ पूजेचा मुद्दा वापरून संघर्ष उभा करायचा असल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यासाठी सोशल मीडियावर पूजेच्या आणि सांस्कृतिक आक्रमणांच्या 'रील्स'चा भडिमार केला जात आहे. मुंबईतील काही रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाणी वाजली जात आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. पण अपेक्षित संघर्ष उभा राहत नसल्याची खंत भाजपला आहे. यातून विषारी प्रचार अन् पसार सुरू झाला असून, यामागे उत्तर प्रदेशाच्या निवडणुकांचा राजकारण लपलेले आहे, असे लिहित राज ठाकरेंनी सावध केले आहे.
राज ठाकरे यांनी भाजपच्या विषारी विचारसरणीवर हल्ला चढवताना, भाजपचा (BJP) जो काही एक थिंक टँक आहे, त्याची बौद्धिक क्षमता कमकुवत झाल्याचे म्हटले आहे. कारण निवडणुका जिंकण्यासाठी त्यांनी वर्षानुवर्षे वापरलेला फोडा आणि राज्य करा, हा फॉर्म्युला आता निकामी होत चाललेला आहे. लोकसभेच्या निवडणुका आल्या की हिंदू मुस्लिम वाद पेटवायचा, मैदानांमध्ये, बागांमध्ये मुस्लिम बुरखा घातलेल्या स्त्रिया फिरवून बघा-बघा आता हे आपल्या मैदाना आणि बागांपर्यंत आले, असे सांगून लोकांना घाबरवायचे. अर्थात हिंदू स्त्रियांना आणि पुरुषांना बुरखे घालून दहशत निर्माण करतानाचे बरेचसे व्हिडीओ सोशल मीडियावर दिसतातच! असे सांगून राज ठाकरेंनी भाजपच्या जाती-धर्माच्या राजकारणावर जोरदार प्रहार केला.
राज्यांच्या निवडणुका जवळ आल्या की जातींमध्ये विष कालवायचे, मागच्या वर्षी मुंबई महापालिकेच्या निवडणुका जिंकायच्या म्हणून कबुतरखान्यावरून गुजरातीविरुद्ध मराठी वाद पेटवला. भाजपला कामे दाखवून निवडणुका जिंकता येत नाही. मग दोन गटांमध्ये संघर्ष घडवून त्यांच्या सांडलेल्या रक्तावर निवडणुका जिंकतात. अर्थात तो पण एक वरवरचा देखावाच आहे, खरं काम निवडणूक आयोगच करते. पण विजय कसा झाला यासाठी पसरवायला एक कारण मिळतं! असेही सांगून भाजपच्या निवडणुकीच्या रणनीतीवर देखील राज ठाकरेंनी हल्ला चढवला.
जेन-झी आंदोलनापासून भाजपचा केंद्रापासून राज्यापर्यंत सत्तेतून पायउतार होण्याकडे प्रवास सुरू झाला आहे. लवकर हे घडणारंच आहे! यामुळे भाजप आणि त्यांचे पालक पार बिथरले आहेत. कारण सत्तेतून बाहेर फेकले गेले की, यांनी गेल्या 12-24 वर्षांत जे जे केलं आहे त्या सगळ्याची भूतं यांच्या मानगुटीवर बसतील आणि याचीच त्यांना भीती आहे. भाजपच्या रणनीतीत मराठी माणसाने, महाराष्ट्राने न फसता, छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी काव्याने कोणाला कधी कसं उत्तर द्यायचे हे लक्षात ठेवा. भाजपने देशाची वाट लावली आहे, सलोखा पार संपवला आहे, सहिष्णुता संपवली आहे. महाराष्ट्रात पण हेच सुरू आहे. केंद्रीय आदेशाने महाराष्ट्राला एकाच उद्योगपतीला आणि त्याच्या चिल्ल्यापिल्यांना विकून फक्त चहुबाजूनी ओरबाडण्याचे काम सुरू केले आहे! महाराज आणि त्यांचे मावळे जिथे नांदले, तो सह्याद्री पण यांनी पोखरायला सुरूवात केली आहे, असा गंभीर आरोप राज ठाकरेंनी भाजपच्या सत्ता धोरणावर केला.
पूजेच्या नावाखाली सांस्कृतिक उन्माद कोणी घातलाच (अर्थात कोणी तशी हिंमत करेल, असं वाटत नाही), तर शांत आहोत म्हणजे गांडू नाही आहोत, हे महाराष्ट्र ओरबाडणाऱ्यांनी आणि महाराष्ट्राच सांस्कृतिक वैभव बिघडवणाऱ्यांनी कायम लक्षात ठेवावे! उत्तर भारतीयांना आणि गुजराती समाजाला पण समजलं पाहिजे की हे फक्त तुम्हाला आमच्या विरोधात उभं करून स्वतःचा स्वार्थ साधून घेत आहेत! आणि जर त्यांच्याबरोबर सामील होऊन तुम्ही आमच्या अंगावर येणार असाल तर विसरू नका की हा महाराष्ट्र आहे ते! येथे मरहट्टे राहातात ते! भाजपला सांगणे आहे की धार्मिक, किंवा राज्या-राज्यात किंवा जातीपातीत संघर्ष निर्माण करणे यापेक्षा आता काही नवीन सुचतंय का ते पहा! मराठी बांधवांना-भगिनींना आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांना आवाहन करताना, यांच्या सापळ्यात अडकू नका पण सतर्क राहा! योग्य वेळी निर्णय घेऊ! असेही राज ठाकरे यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.