मुंबई : महाविकास आघाडी सरकाने २०२२-२०२३ साठीच्या सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या (ncp) अखत्यारीत येणाऱ्या खात्यांना भरभरून निधी दिला आहे. तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेला मिळालेल्या खात्यांपेक्षा जवळपास तिप्पट आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या १२ खात्यांसाठी तब्बल ३ लाख १४ हजार ८२० कोटींची तरतूद केली आहे. काँग्रेसच्या (Congress) खात्यांना १ लाख ४४ हजार १९३ कोटी इतका निधी मिळाला आहे. शिवसेनेला (shivsena) केवळ ९० हजार १८१ कोटींची खातेनिहाय तरतूद लाभली आहे. यामुळे या निधीवाटपावरुन पुन्हा महाविकास आघाडीमध्ये धुसफूस होणार असल्याचे सांगितले जात आहे.
त्यातील नगरविकास विभागाला ४४ हजार ३०६ कोटींची म्हणजे पक्षाला दिल्या गेलेल्या रकमेतील अर्धी तरतूद आहे. शिवसेना नागरी भागातील पक्ष असल्याने या विभागाला मोठी तरतूद आहे की नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील स्थानामुळे याबाबत चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. शिवसेनेच्या आमदारांना निधी वाटपात अन्याय सहन करावा लागतो, अशी नाराजी आहे. काँग्रेस आमदारांनीही निधी मिळत नसल्याची तक्रार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन केली होती. अधिवेशनाच्या तिसऱ्या आठवड्याला प्रारंभ झाल्यानंतर निधी वाटपाची चर्चा जोर घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शिवसेनेच्या अखत्यारीतील उच्च व तंत्र शिक्षण विभागाला १२ हजार ३६४ कोटी तर पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाला ११ हजार १ कोटी आणि कृषी विभागाला १२ हजार ७२१ कोटी मिळतील. काँग्रेसकडील शालेय शिक्षण विभागाला ६६ हजार ८८६ कोटी तर सार्वजनिक बांधकाम विभागाला २८ हजार ६०४ कोटी इतका निधी मिळणार आहे.
राष्ट्रवादी मालामाल
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खात्यांसाठी भक्कम तरतूद आहे. वित्त खात्याला १ कोटी ४३ हजार ६०० तर नियोजन विभागाला २५ हजार ५७७ कोटी देण्यात येणार आहे. ग्रामीण विकास विभागाला २६ हजार ५९३ कोटी आणि जलसंपदा विभागाला १९ हजार ७६६ कोटी देण्यात येणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.