

Mumbai Police Allegation : दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सुरू असलेल्या आंदोलनादरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
या व्हिडिओत साध्या वेशातील एका पोलिसाने आंदोलक युवतीशी गैरवर्तन केल्याचा आरोप काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी केला आहे. या प्रकरणावरून मुंबई पोलिसांवर टीकेची लाट उसळली असून, पोलिसांनी मात्र हे आरोप स्पष्टपणे फेटाळले आहेत.
व्हायरल व्हिडिओच्या आधारे अनेक सोशल मीडिया (Social Media) वापरकर्त्यांनी संबंधित मुंबई पोलिस कर्मचाऱ्यावर कारवाईची मागणी केली आहे. काहींनी गुन्हा दाखल करून चौकशी करण्याची मागणी केली, तर काहींनी न्यायालयीन चौकशीची गरज व्यक्त केली. पोलिसांनी स्वतःच निष्कर्ष देण्याऐवजी कायदेशीर प्रक्रिया होऊ द्यावी, अशीही भूमिका काही प्रतिक्रियांमध्ये व्यक्त करण्यात आली.
'डिफेन्स ब्रॅट' या एक्स खात्यावरून व्हिडिओतील एक स्क्रीनशॉट शेअर करत संबंधित मुंबई पोलिस (Mumbai Police) कर्मचाऱ्याच्या वर्तनावर प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यानंतर इतर अनेक वापरकर्त्यांनीही विविध प्रतिक्रिया नोंदवत चौकशी आणि कठोर कारवाईची मागणी केली. काही पोस्टमध्ये संबंधित पोलिस कर्मचारी गणवेशात नसल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला.
अनुपम मेहरोत्रा या एक्स वापरकर्त्याने, "अशीच घटना एखाद्या पुरुष आंदोलकाकडून महिला पोलिसाबाबत घडली असती, तर पोलिसांनी त्याकडे याच दृष्टीने पाहिले असते का?" असा सवाल उपस्थित केला. 'अंधभक्त डॉट एक्स' या खात्यावरूनही पोलिसांच्या भूमिकेवर टीका करणारी प्रतिक्रिया पोस्ट करण्यात आली.
दरम्यान, दादरच्या शिवाजी पार्क परिसरातील आंदोलनादरम्यान साध्या वेशातील पोलिसाने आंदोलक युवतीशी गैरवर्तन केल्याचा आरोप मुंबई पोलिसांनी फेटाळला आहे. पोलिस आयुक्तालयाचे उपआयुक्त (अभियान) अकबर पठाण यांनी शुक्रवारी दिलेल्या निवेदनात, व्हायरल व्हिडिओचा चुकीचा अर्थ लावला जात असल्याचे म्हटले आहे.
त्यांच्या म्हणण्यानुसार, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित व्हिडिओचे परीक्षण करून वस्तुस्थितीची पडताळणी केली असून, सोशल मीडियावर प्रसारित होत असलेल्या दाव्यांना तथ्यात्मक आधार नसल्याचे प्राथमिक निष्कर्षात आढळले आहे. मात्र, या स्पष्टीकरणानंतरही सोशल मीडियावर या प्रकरणाविषयी चर्चा आणि प्रतिक्रिया सुरूच आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.