Mumbai South LokSabha Constituency: पराभवाचा वचपा काढण्याची संधी; मिलिंद देवरा दक्षिण मुंबईमधून पुन्हा इच्छुक

Mumbai Political News : मागील ५० वर्षांपासून दक्षिण मुंबई हा मतदारसंघ काँग्रेसकडे आहे आणि देवरा परिवाराकडून मिलिंद देवरा हा मतदारसंघ लढवत आहेत.
Milind Deora
Milind Deora sarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Election 2024 :  लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबई हा मतदारसंघ काँग्रेसचा पारंपरिक गड मानला जातो. एस. के. पाटील, मुरली देवरा, मिलिंद देवरा या काँग्रेसच्या नेत्यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. मात्र, 2014 च्या मोदीलाटेत हा मतदारसंघ काँग्रेसच्या हातून सुटला. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी मिलिंद देवरा यांचा पराभव करून काँग्रेसच्या गडाला सुरुंग लावला. पहिल्यांदा मोदीलाटेत विजयी झालेल्या अरविंद सावतांनी 2019 मध्ये पुन्हा एकदा मिलिंद देवरा यांना पराभवाची धूळ चारत या मतदारसंघावर शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. मात्र, आता आगामी लोकसभा निवडणुकीत मिलिंद देवरा हे पुन्हा एकदा या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून, मागील दोन पराभवांचा वचपा काढण्यासाठी ते सज्ज झाले आहेत.

मिलिंद देवरा हे काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी केंद्रीयमंत्री मुरली देवरा यांचे पुत्र आहेत. त्यांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपदही भूषवले होते. 2004 आणि 2009 असे सलग दोन टर्म हायप्रोफाईल मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे त्यांनी नेतृत्व केले. डॉ. मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात ते केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचे राज्यमंत्रीही होते. मात्र पुढे 2014 मध्ये मोदीलाटेत आणि 2019 मध्ये शिवसेनेच्या (आताचे ठाकरे गटाचे नेते) अरविंद सावंत यांच्याकडून मिलिंद देवरा (Milind Deora) यांना दोन्ही वेळेस एक लाखांपेक्षा जास्त मतांनी पराभव पत्करावा लागला होता.

Milind Deora
Nana Patole VS Vijay Wadettiwar : काँग्रेस प्रभारींकडून नेत्यांना तंबी; म्हणाले, जरा जपून...

अमेरिकेतील बोस्टन विद्यापीठातून बिझनेस व्यवस्थापनाचे शिक्षण घेतलेल मिलिंद देवरा हे राहुल गांधी यांच्याजवळचे नेते मानले जातात. मात्र गेल्या काही काळापासून पक्षातील अंतर्गत गटबाजीमुळे ते काँग्रेसपासून दुरावले असल्याची चर्चा आहे. दोन पराभवांनंतर मिलिंद देवरा हे मतदारसंघातही सक्रिय दिसत नव्हते. दरम्यान, आता ते पुन्हा एकदा दक्षिण मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र शिवसेनेचा ठाकरे गट महाविकास आघाडीत सहभागी झाला आहे. त्यातच ठाकरे गटाचे अरविंद सावंत हे या मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे जागावाटपाच्या चर्चेत जो विद्यमान खासदार त्याची जागा हा फॉर्म्युला राबवल्यास ही जागा शिवसेनेला सुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे देवरा यांच्यासाठी जागावाटपाचा तिढा अडसर मानला जात आहे.

काही दिवसांपूर्वीच शिवसेना ठाकरे गटाने या मतदारसंघात मेळावा घेत दक्षिण मुंबईमध्ये शिवसेना ठाकरे गटाचाच खासदार निवडून येणार, असे मत व्यक्त करीत एक प्रकारे या मतदारसंघावर दावाच केला होता. यावर मिलिंद देवरा यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. महाविकास आघाडीतील एक घटकपक्ष दक्षिण मुंबईवर आपला दावा करीत आहे, मात्र मला कुठल्याही प्रकारचा वाद-विवाद वाढवायचा नाही. मागील ५० वर्षांपासून दक्षिण मुंबई हा मतदारसंघ काँग्रेसकडे आहे आणि देवरा परिवार हा मतदारसंघ लढवत आहे. त्यामुळे आमच्याकडे खासदार असो किंवा नसो विकासकामेदेखील केली जात असल्याचे मत व्यक्त करत देवरा यांनी मतदारसंघावर काँग्रेसचा हक्क असल्याचे सूतोवाच केले होते. अरविंद सावंत हे भाजप आणि शिवसेना युतीत लढल्यामुळे खासदार म्हणून निवडून आले होते, असा टोलाही त्यांनी सावंतांना लगावला होता.

नाव (Name)

मिलिंद मुरली देवरा

जन्मतारीख (Birth date)

4 डिसेंबर 1976

शिक्षण (Education)

BBA

कौटुंबिक पार्श्वभूमी (Family Background)

मिलिंद देवरा यांचा जन्म राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबात झाला. त्यांचे वडील मुरली देवरा हे मुंबईचे महापौर, केंद्रीयमंत्री होते. ते एक उद्योजक आणि समाजसेवकही होते. मिलिंद देवरा यांच्या मातोश्रींचे नाव हेमा देवरा असे होते, तर त्यांच्या भावाचे नाव मुकुल देवरा असे आहे. मुकुल उद्योजक आहेत. त्यांची विविध कंपन्यांमध्ये भागीदारी आहे. मिलिंद देवरा यांच्या पत्नी पूजा देवरा यादेखील व्यावसायिक आहेत. मिलिंद देवरा यांना एक मुलगी आहे.

नोकरी किंवा व्यवसाय काय? (Service/Business)

व्यवसाय

लोकसभा मतदारसंघ कोणता? (Lok Sabha Constituency)

दक्षिण मुंबई

राजकीय पक्ष कोणता? (Political Party Affiliation)

काँग्रेस

आतापर्यंत कोणकोणत्या निवडणुका लढविल्या? किंवा आतापर्यंतचा राजकीय प्रवास? (Election Contested or Political Journey)

मिलिंद देवरा यांना राजकारणाचे बाळकडू घरातूनच मिळाले होते. वडील मुरली देवरा हे काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीयमंत्री होते ते दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून चारवेळा विजयी झाले होते. त्यामुळे मिलिंद देवरा यांच्यासाठी राजकारणाची प्रवेशद्वारे खुलीच होती. मिलिंद देवरा यांनी 2004 मध्ये पहिल्यांदा काँग्रेसच्या तिकीटावर मुंबई दक्षिण मतदारसंघातून लोकसभेचे सदस्यत्व मिळवले. त्यांनी त्यावेळी भाजपच्या जयवंतीबेन मेहता यांचा 10,000 मतांनी पराभव केला होता. त्यावेळी ते देशातील सर्वात तरुण खासदार ठरले होते. त्यांनी अनेक संसदीय समित्यांचे सदस्य म्हणून काम पाहिले. पुढे 2009 मध्ये ते पुन्हा खासदार म्हणून निवडून आले. यावेळी त्यांनी मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांचा पराभव केला. बाळा नांदगावकर यांना 1,59,729 मते मिळाली होती. मिलिंद देवरा यांना 2,72,411 मते मिळाली होती. या टर्ममध्ये त्यांनी मनमोहनसिंग यांच्या मंत्रिमंडळामध्ये माहिती व तंत्रज्ञान आणि जलवाहतूक मंत्रालयाचा कारभारही पाहिला.

पुढे 2014 मध्ये ते पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. यावेळी मात्र संपूर्ण देशात मोदीलाट होती. त्यांच्याविरोधात शिवसेना-भाजपचे उमेदवार अरविंद सावंत होते. मात्र मोदीलाटेच्या तडाख्यात मिलिंद देवरा यांचा पराभव झाला. अरविंद सावंत हे या मतदारसंघातून निवडून येणारे दुसरे मराठी खासदार ठरले होते. काँग्रेसच्या गडाला खिंडार पडले होते. तरीही मिलिंद देवरा यांनी मतदारसंघात आपला संपर्क कायम ठेवला होता. त्यानंतरच्या निवडणुकीत त्यांना यश मिळेल, अशी आशा होती. मात्र त्याही निवडणुकीत अरविंद सावंत यांनी मिलिंद देवरा यांनी पराभवाची धूळ चारली. या निवडणुकीनंतर मिलिंद देवरा यांनी मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि केंद्रीयस्तरावर पक्षकार्यात सक्रिय झाले.

राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी अमेरिका आणि भारतातील खासगी क्षेत्रातही काम केले. आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना माहिती-तंत्रज्ञानाचे शिक्षण मोफत मिळावे, म्हणून त्यांनी प्रयत्न केले. त्यांच्या संसदीय कारकिर्दीत ऐतिहासिक अशा माहिती अधिकार कायदा आणि ई-गव्हर्नन्ससारख्या अनेक महत्त्वाच्या धोरणात्मक उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी त्यांनी पुढाकार घेतला.

आतापर्यंत केलेली सामाजिक कामे? (Social Work in the Constituency)

मिलिंद देवरा कुटुंबाकडून सातत्याने सामाजिक उपक्रम राबवले जातात. स्वत: मिलिंद देवरा यांनी प्लास्टिक वापरावर बंदी, सिंगल यूज प्लास्टिकचा उपक्रम हाती घेत जनजागृती केली होती. खासदार निधीचा वापर करून त्यांनी मतदारसंघातील अनेक विकासकामे मार्गी लावली. जनतेची सुविधा आणि मतदारसंघाचा विकास या दृष्टिकोनातून त्यांनी सार्वजनिक स्वच्छतागृहे, ड्रेनजलाइनची कामे पूर्ण करून घेतली. स्पर्श या एनजीओमार्फत त्यांनी गरजवंतांसाठी मोफत नेत्रतपासणी आणि उपचार, नोकरी-व्यवसायाच्या दृष्टीने मोफत संगणक प्रशिक्षण दिले. गरजू विद्यार्थ्यांना कपडे आणि शालेय साहित्याचे वाटपही केले.

Milind Deora
Prithviraj Chavan : शिवसेनेचा झाला आता 'राष्ट्रवादी'चा निकाल काय? पृथ्वीराज चव्हाणांनी स्पष्टच सांगितले

2019 मधील निवडणूक लढविली होती का? त्याचा निकाल काय लागला? (Whether Contested 2019 Lok Sabha Election)

2019 च्या निवडणुकीत मिलिंद देवरा यांना शिवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत यांच्याकडून दुसऱ्यांदा पराभव स्वीकारावा लागला होता. अरविंद सावंत यांना 4 लाख 21 हजार 937 मते, देवरा यांना 3 लाख 21 हजार 870 इतकी मते मिळाली होती.

2019 मधील निवडणूक निकालात विजय मिळाला असल्यास त्याची कारणे काय होती? पराभव झाला असल्यास त्याची कारणे काय होती? (Reasons for Winning the Election or Losing the Election)

2019 च्या निवडणुकीत मिलिंद देवरा यांचे पारडे जड मानले जात होते. कारण या निवडणुकीत उद्योगपती मुकेश अंबानी, बँकर उदय कोटक यांनी मिलिंद देवरा यांना पाठिंबा दिला होता. तरीही मिलिंद देवरा यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीचा फटका बसल्याची चर्चा त्यावेळी झाली होती. शिवाय शिवसेना आणि भाजपची युती कायम होती. त्यातच पंतप्रधान मोदी यांची लाट 2019 मध्येही कायम दिसून येत होती.

या मतदारसंघात अरविंद सावंत यांनी पहिल्या टर्ममध्ये निवडून आल्यानंतर विकासकामांचा धडाका लावला होता. आपला माणूस म्हणून एक छाप पाडली होती. प्रचारादरम्यान जर मी पुन्हा एकदा निवडून आलो तर या मतदारसंघातील मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जमिनीवर झोपडपट्टीधारकांना मोफत घरे बांधून देण्यासाठी प्रयत्न करेन, असे आश्वासनही दिले होते. रोजगारनिर्मितीचेही आश्वासन सावंत यांनी दिले होते. त्याचाही मतदारांवर प्रभाव दिसून आला होता आणि याचाच फटका मिलिंद देवरा यांना बसला होता.

याखेरीज देवरा यांच्या परभवामध्ये ईव्हीएम मशीनमधील त्रुटी, सुरक्षेचा प्रश्नदेखील उपस्थित करण्यात आला होता. यासंदर्भात देवरा यांनी निवडणूक आयोगाला मतमोजणी केंद्राभोवती 'काही संशयित व्यक्तीच्या हालचाली सुरू होत्या,' अशी तक्रारदेखील केली होती. ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड झाल्याचाही आरोप देवरा यांच्या कार्यकर्त्यांकडून केला जातो.

मतदारसंघातील जनसंपर्क कसा आहे? (Public Relation in Constituency)

दक्षिण मुंबई हा हायप्रोफाईल मतदारसंघ मानला जातो. काँग्रेसचा हा पारंपरिक मतदारसंघ असून देवरा कुटुंबीयांनीच सुमारे सहा टर्म या मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. देवरा यांची जनसंपर्क यंत्रणा प्रभावी आहे. याशिवाय ते मतदारांच्या संपर्कात राहण्यासाठी सातत्याने सामाजिक उपक्रम राबवताना दिसून येतात. मोफत आरोग्य तपासणी शिबिर, सांस्कृतिक कार्यक्रम, युवकांसाठी प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन, महाविद्यालयांना भेटी देणे, त्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधणे असे अनेक उपक्रम राबवतात. त्यांच्या स्पर्श या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवून जनतेशी संपर्क कायम ठेवण्याचा प्रयत्न केला जातो.

सोशल मीडियावरील प्रसिद्धीबद्दल? (Social Media Handles)

मिलिंद देवरा एक उच्चशिक्षित राजकारणी आहेत. शिवाय ते माजी केंद्रीय आयटीमंत्री होते. त्यामुळे इंटरनेटच्या विश्वात ते सोशल मीडियाचा अत्यंत प्रभावीपणे वापर करून घेतात. यूट्यूब, इन्स्टाग्राम, ट्विटर, फेसबुक या माध्यमातून ते सातत्याने नवनवीन संकल्पना शेअर करीत असतात. यासोबतच राजकीय घडामोडींवरही ते भाष्य करताना दिसून येतात. मागे मोदी आणि मिलिंद देवरा यांच्यात ट्विटरवर जुगलबंदी रंगली होती. याशिवाय देवरा हे पक्षाची ध्येयधोरणे, मतदारसंघातील प्रश्न सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडताना दिसून येतात.

उमेदवाराने केलेली महत्त्वाची राजकीय विधाने किंवा वक्तव्ये (Political Statements made by Candidate)

देवरा हे शांत आणि संयमी राजकारणी म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांच्याकडून आक्रमक वक्तव्ये होताना दिसून येत नाही. मात्र काँग्रेसमधील तरुण राजकारणी म्हणून त्यांच्या काही विधानांचे पडसाद उमटलेले पाहायला मिळाले होते. 2019 च्या निवडणुकीत त्यांनी जैन समाजाकडून करण्यात आलेल्या मांसबंदीच्या मागणीला शिवसेनेने विरोध केला होता. त्यावरून देवरा यांनी जैन समाजाने शिवसेनेला धडा शिकवावा, असे आवाहन केले होते. त्यावेळी त्यांच्यावर आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यात ते दोषी आढळले होते. 2020 मध्ये त्यांनी दिल्ली सरकारच्या रेव्हेन्यूचा उल्लेख करत केजरीवालांची प्रशंसा करणारा एक व्हिडीओ ट्विट केला होता. त्यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजय माकन यांनी देवरा यांना तंबी दिली होती.

राजकीय गुरु कोण? (Political Godfather/Guru)

मुरली देवरा

सकारात्मक मुद्दे (Positive Points about candidate)

मिलिंद देवरा हे उच्चशिक्षित, अभ्यासू राजकारणी म्हणून ओळखले जातात. त्यांच्याकडे विकासाची दूरदृष्टी आहे. पारंपरिक राजकारणापेक्षा विकासाचे राजकारण करण्यावर त्यांचा भर असतो. युवावर्गात देवरा यांची क्रेझ आहे. त्यांची विकासाची धोरणे,अभ्यास यामुळे युवकांवर त्यांच्या विचारांची छाप पडली आहे. मिलिंद देवरा हे मारवाडी कुटुंबातून आणि व्यावसायिक पार्श्वभूमी असलेले नेते आहेत. उद्योगजगतात त्यांच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर असल्याचे यापूर्वी अधोरेखित झाले आहे. मुंबईचा आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विकास कशा पद्धतीने केला जाईल, यावर त्यांचा विशेष भर दिसून येतो. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडे सध्या या मतदारसंघातून दुसरा शक्तिशाली उमेदवार नाही. त्यामुळे ही जागा काँग्रेसला सुटल्यास महाविकास आघाडीच्या बळावर त्यांना पुन्हा एकदा हा मतदारसंघ काँग्रेसकडे खेचून आणण्याची संधी मिळणार आहे.

नकारात्मक मुद्दे (Negative Points about candidate)

मिलिंद देवरा यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली असली तरी पक्षापासून ते दुरावल्याची चर्चा आहे. पक्ष-संघटनेत काम करीत असताना अंतर्गत गटबाजीचा फटका त्यांना बसल्याचा आरोप त्यांनी यापूर्वीच मुंबईचे तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्यावर केला होता. सद्यःस्थितीत मतदारसंघातही ते फारसे सक्रिय दिसून आले नाहीत. त्यातच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबतही त्यांचे सख्य नसल्याचा प्रकार मध्यंतरी घडला होता. आम आदमी पक्षाची स्तुती केल्याच्या कारणावरून पक्षाचे नेते अजय माकन यांनी मिलिंद देवरा यांना पक्ष सोडण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे पक्षात मिलिंद देवरा यांच्याबाबत नाराजी असल्याचेही बोलले जाते.

आगामी लोकसभा निवडणुकीत जागावाटपाचा तिढा देवरांसाठी अडचणीचा ठरत आहे. महाविकास आघाडीत शिवसेनेचा ठाकरे गट सहभागी असल्याने ही जागा शिवसेनेला सुटल्यास काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्यात अडसर ठरणार आहे. त्यामुळे मध्यंतरी त्यांनी अजित पवार गटात प्रवेश करण्यासाठी चाचपणी केल्याचीही चर्चा होत आहे. आता ते शिंदे गटात प्रवेश करणार, अशी चर्चा आहे. त्यामुळे आगामी काळात मिलिंद देवरा यांची भूमिका विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण करणारी ठरू शकते.

उमेदवारी न मिळाल्यास काय होऊ शकते (If didn’t get chance to contest Lok Sabha election what will be the consequences)

मिलिंद देवरा यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे निकटवर्तीय असलेल्या देवरा यांना मागील दोन टर्म शिवसेनेच्या अरविंद सावंतांकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. आता पुन्हा एकदा ते निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी तयार आहेत. ठाकरे गट हा महाविकास आघाडीमध्ये सहभागी आहे. त्यामुळे मिलिंद देवरा यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत मिलिंद देवरा हे बंड करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण हा देवरा याच्या कुटुंबाचा पारंपरिक मतदारसंघ मानला जातो. काँग्रेसकडून उमेदवारी नाही मिळाल्यास ते अन्य पक्षात प्रवेश करतील, अशी शक्यता आहे. त्यांनी यापूर्वीच अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी दोन वेळा संपर्क साधून चाचपणी केल्याची चर्चा आहे. मात्र अजित पवार गट महायुतीत सहभागी झाला आहे. त्यामुळे या मतदारसंघातून भाजपकडूनही दावा केला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हा मतदारसंघ ठाकरे गट किंवा महायुतीत भाजपला सुटल्यास त्यांच्या दोनदा झालेल्या पराभवाचा वचपा काढण्याच्या इच्छेवर पाणी फेरले जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर देवरा हे भाजपमध्येदेखील प्रवेश करू शकतील, अशीही चर्चा होत असल्याचे दिसून येत आहे.

R...

Milind Deora
Mumbai South LokSabha Constituency : अरविंद सावंतांना हॅटट्रिकची संधी, पण जागावाटपाचा तिढा अडसर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com