

Pune News : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नियमबाह्य पैसे वापरणाऱ्या उमेदवारांवर इन्कम टॅक्स विभागाची कडक नजर असणार आहे. निवडणूक खर्चात काळा पैसा वापरला जात असल्यास तात्काळ कारवाई केली जाणार आहे. विशेष म्हणजे नागरिकांनाही अशा प्रकारांविरोधात थेट तक्रार करण्याची सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे उमेदवारांचा खर्च बारकाईने तपासला जाणार आहे.
गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रक्रिया सुरु झाली आहे. निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. काही झालं तरी यंदा नगरसेवक व्हायचंच असा चंग अनेकांनी बांधला आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत या उमेदवारांकडून वारेमाप पैशाचा वापर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
त्यामुळे निवडणुकीत होणाऱ्या पैशांच्या वापरावर इन्कमटॅक्स विभाग वॉच ठेवणार आहे. वारेमाप खर्चावर आळा घालण्यासाठी निवडणूक काळात 24 तास नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. निवडणूक काळात येणाऱ्या तक्रारींवर त्वरित दखल घेण्यात येणार असून संबंधित ठिकाणी छापा टाकण्यासाठी पथकांची देखील निर्मिती करण्यात आली आहे.
आपल्या भागात जर निवडणूक काळामध्ये पैशाचा गैरवापर होताना नागरिकांना दिसल्यास ही माहिती इन्कम टॅक्स विभागाला कळवण्यासाठी टोल फ्री क्रमांक देण्यात आला आहे. तसेच व्हाॅट्स अॅप, एसएमएस आणि इमेलद्वारेही नागरिक माहिती देऊ शकतात, असे विभागातर्फे कळवण्यात आले आहे.
२०२५-२६ मधील महानगरपालिका निवडणुकांमध्ये पैशांच्या अनुचित वापराला रोखण्यासाठी प्राप्तिकर विभाग पूर्णपणे कटिबद्ध आहे. मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शी निवडणुका घडवून आणण्याच्या व निवडणूक प्रक्रियेची पवित्रता जपण्याच्या हेतूने, पुणे प्राप्तिकर विभागाने २४×७ कार्यरत राहणारा नियंत्रण कक्ष असलेली विशेष निवडणूक निरीक्षण यंत्रणा उभी केली आहे.
या यंत्रणेच्या कार्यक्षेत्रात ठाणे, उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली, भिवंडी-निजामपूर, मीरा-भाईंदर, वसई-विरार, पनवेल, अहिल्यानगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, इचलकरंजी तसेच सांगली-मिरज-कुपवाड या महानगरपालिका क्षेत्रांचा समावेश आहे.
आचारसंहिता लागू राहील तोपर्यंत ही यंत्रणा सक्रिय राहणार आहे. निवडणूक प्रचारादरम्यान रोख रक्कम किंवा मौल्यवान वस्तूंचा दुरुपयोग होत असल्यास, त्याची माहिती नागरिकांना सहज देता यावी, यासाठी ही व्यवस्था कार्यान्वित करण्यात आली आहे.
टोल फ्री क्रमांक – १८००-२३३-०७०१
व्हॉट्सॲप क्रमांक – ९९२२३८०८०६
ईमेल आयडी – pune.pdit.inv@incometax.gov.in
पत्ता – नियंत्रण कक्ष, कक्ष क्र. ८२९, ८ वा मजला, आयकर सदन, बोधी टॉवर, सॅलिसबरी पार्क, गुलटेकडी, पुणे ४११०३७
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.