
Ganesh Naik Vs Eknath Shinde : आपल्याकडे एक हरणाचे पिल्लू आणि बिबट्याचे बछडे होते. आपण त्यांचा चांगला सांभाळ केला. पण मंत्री झाल्यावर कायद्यामुळे सोडून दिले, अशी जाहीर कबुली वनमंत्री गणेश नाईक यांनी एका कार्यक्रमात दिली आहे. या खळबळजनक कबुलीने नाईक यांचे मंत्रिपद संकटात सापडले आहे. वन्यजीव पाळणे हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे नाईक यांच्यावर कारवाई व्हावी, यासाठी शिवसेनेचे नवी मुंबई जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांनी न्यायालयात धाव घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
बकरीच्या पिल्लांबरोबर चालत आलेले हरणाचे पिल्लू मला कोणी तरी आणून दिले होते. एकाने आणून दिलेले बिबट्याचे बछडेही माझ्याकडे होते. मी त्यांचा चांगला सांभाळ केला. पण मंत्री झाल्यानंतर हे वन्यजीव पाळणे कायद्याने गुन्हा असल्याने ते मी सोडून दिले, असे नाईक यांनी भाषणात सांगितले. जंगलातील वन्यप्राणी आपण पाळू शकत नाही. कायद्यापुढे आपले प्रेम मागे ठेवावे लागते, अशी कबुली देत असल्याचा नाईक यांचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे.
गणेश नाईक यांच्या या खळबळजनक कबुलीने शिवसेनेच्या हाती आयते कोलित सापडले आहे. नाईक यांनी वन्यजीवांचा छळ केला असून, त्यांनी हे प्राणी सोडले असतील तर ते नेमके कुठे सोडले याची पोलिस चौकशी व्हावी, अशी मागणी शिवसेनेचे नवी मुंबई जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांनी केली आहे. तसेच याविरोधात न्यायालयात जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. या घटनेमुळे ठाणे जिल्ह्याच्या राजकारणातील वनमंत्री गणेश विरुद्ध शिवसेना हा पारंपारिक संघर्ष पुन्हा तीव्र होण्याची शक्यता आहे.
चुकीचा अर्थ : नाईकांचे स्पष्टीकरण
या व्हायरल व्हिडीओवर गणेश नाईक यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ‘‘एका सार्वजनिक कार्यक्रमातील माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ लावला गेला आहे. माझ्याकडे विचारणा केली असती तर मी याबद्दल सविस्तर माहिती दिली असती. माझे वक्तव्य हे केवळ वन्यप्राण्यांबद्दल असलेले प्रेम आणि जिव्हाळ्याचे उदाहरण म्हणून होते. माझ्याकडे कधीही कोणत्याही प्रकारे वन्यप्राण्यांना बेकायदा ठेवले नव्हते. वन्यप्राणी जंगलातच सुरक्षित असतात आणि त्यांचे रक्षण करण्यासाठी सरकारने आखलेल्या सर्व नियमांचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे, असा खुलासा नाईक यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.