मुंबई : मागील नऊ दिवसांपासून पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरवाढीचा भडका उडाला आहे. आतापर्यंतची ही वाढ 5.60 रुपयांवर गेली आहे. दररोज दरवाढ होत असल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं (NCP) मोदी सरकार इंधन दरवाढ आटोक्यात आणणार की इंधन शंभरीनंतर आता दरांची डबल सेंच्युरी पार करणार, अशी भीती व्यक्त केली आहे. (Petrol Price)
राष्ट्रवादीने मुंबईतील इंधनाच्या वाढत्या दरांचा (Fuel Price Hike) आलेख ट्विट केला आहे. मुंबईत पेट्रोलपाठोपाठ डिझेलनंही शंभरी पार केली आहे. याबाबत राष्ट्रवादीनं ट्विटवरून चिंता व्यक्त केली आहे. 'देशभरात इंधनाचे दर आकाशाला भिडले आहेत. मुंबईतील इंधन दरांवर नजर टाकल्यास आता पेट्रोल पाठोपाठ डिझेलनेही शंभरी गाठली आहे. महागाईचा भस्मासूर सर्वसामान्यांना आपल्या विळख्यात घेत असताना केंद्र सरकार केवळ बघ्याची भूमिका घेताना दिसत आहे.'
सध्या संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांनी या प्रश्नाकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधलेय. त्यामुळे याची दखल घेऊन वाढत्या इंधन दरवाढीला ब्रेक लावण्याचा निर्णय केंद्र सरकार घेणार का याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे. मोदी सरकार इंधन दरवाढ आटोक्यात आणणार की इंधन शंभरीनंतर आता दरांची डबल सेंच्युरी पार करणार, हाच खरा प्रश्न आहे, असं राष्ट्रवादीनं ट्विटमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, सुमारे चार महिन्यांनंतर पेट्रोल, डिझेलच्या दरात 22 मार्चपासून वाढ सुरू झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मागील 9 दिवसांत 8 वेळा वाढ करण्यात आली आहे. यामुळे या काळात पेट्रोल, डिझेलचे दर 5.60 रुपयांनी महागले आहे. दिल्लीत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 101.01 रुपये झाला असून, डिझेलचा दर 92.27 रुपये आहे. मुंबईत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे 84 व 85 पैसे वाढ करण्यात आली आहे. यामुळे मुंबईत डिझेलच्या दराने पुन्हा शंभरी गाठली आहे. मुंबईत पेट्रोलचा दर 115.88 रुपये आणि डिझेलचा दर 100.10 रुपये आहे. आगामी काळात टप्प्याटप्प्याने पेट्रोल, डिझेलच्या दरात प्रतिलिटर सुमारे 12 ते 25 रुपयांपर्यंत वाढ होईल, असा इशारा विश्लेषकांनी दिला आहे.
रशियाने युक्रेनवर (Russia Ukraine War) पुकारलेल्या युद्धाचे चटके आता सगळ्यांनाच बसू लागले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाच्या भावाचा भडका उडाला आहे. खनिज तेलाचा भाव आता प्रतिबॅरल 110 डॉलरवर गेला आहे. यामुळे पेट्रोलियम कंपन्यांना दरवाढ करण्याशिवाय पर्याय नाही. असे असतानाही उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या काळात पेट्रोल, डिझेलचे दर सुमारे चार महिने स्थिर होते. या निवडणुकांच्या निकालानंतर पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलिंडरच्या दरात आता वाढ सुरू झाली आहे. याआधी सीएनजीचा दरात सातत्याने वाढ करण्यात आली असून, यानंतर पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलिंडरचा नंबर लागला आहे. यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.