मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी मंगळवारी क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील (Cruise Drug Case) आणखी काही पुरावे सादर केल्याने खळबळ उडाली आहे. क्रूझवर आर्यन खानला पकडण्यासाठी सापळा रचल्याचा दावा त्यांनी केला असून त्याचे पुरावे म्हणून सकाळी या प्रकरणातील साक्षीदार किरण गोसावी (Kiran Gosavi) व त्याच्या खबऱ्यामधील व्हॉट्सअप चॅट ट्विट केले होते. तर दुपारी मलिकांनी थेट गोसावीच्या चार ऑडिओ क्पिप्स शेअर केल्या आहेत. यामध्ये किरण गोसावी आपण थेट अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचे बोलत आहे. त्यामुळे या प्रकरणातील गूढ आणखी वाढतच चालले आहे.
एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर मलिकांकडून दररोज आरोप केले जात आहे. वानखेडे यांनी वसुलीसाठी आर्यन खानला बनावट प्रकरणात (Aryan Khan Case) अडकवल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. मंगळवारी सकाळी मलिकांनी दोन ट्विट केली आहेत. क्रूझ प्रकरणाचा साक्षीदार के. पी. गोसावी आणि त्याच्या खबऱ्यामध्ये (Informer) मध्ये व्हॉट्सअपवर झालेला संवाद या ट्विटमध्ये आहे. पहिल्या ट्विटमधील संवादामध्ये के. पी. गोसावी खबऱ्याला काशिफसह इतर काही जणांचे फोटो मागत आहे. दोघांमध्ये क्रूझवर येणाऱ्यांबाबत संवाद झाल्याचे या चॅटवरून दिसते.
दुसऱ्या ट्विटमध्ये किरण गोसावी हा खबऱ्याकडून क्रूझवर येणाऱ्यांची माहिती मागत असल्याचे दिसते. तर दुपारी त्यांनी शेअर केलेल्या क्लिपमध्ये गोसावी आणि त्याच्या खबऱ्यातील संवाद समोर आला आहे. पहिल्या क्लिपमध्ये गोसावी खबऱ्याला कॉन्टॅक्ट डिटेल्ससह सर्व माहिती गोळा करण्यास सांगत आहे. त्यानंतर आपण मोबाईलवरून ट्रेस करू. पण याविषयी इतर कुणाशी बोलू नकोस कारण मी थेट अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे, असं गोसावी म्हणत आहे.
गोसावीच्या दुसऱ्या क्लिपमध्ये तो कबीर या नावाचा उल्लेख करतो. कबीरजवळ कन्फर्म असेल ना! ज्यांच्याकडे नक्की असेल असे 10 पैकी पाच जण तरी हवे आहेत. त्यांच्याकडे असायलाच हवे, अशी विचारणा गोसवी समोरच्या व्यक्तीकडे करताना दिसत आहे. तर दादा, दिल्लीचा मेसेज टाकायचा असले तर आताच टाका. नंतर दिल्ली बंद होईल. नंतर उद्यावर जाईल, असं तिसऱ्या क्लिपमध्ये आहे. चौथ्या क्लिपमध्ये गोसावी आपण खूप थकल्याचे सांगत आहे. भाई जाऊदे आता सगळे जण थकले आहेत. पूर्ण स्टाफ थकलाय आणि मीही कालपासून झोपलो नाही. माझाही हालत खराब आहे, प्रत्येक जण थकलाय, असं गोसावी म्हणत आहे.
या चारही क्लिपमधील गोसावीचे आपण थेट अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचे वाक्य महत्वपूर्ण आहे. तसेच तो 10 पैकी पाच जणांकडे मिळायलाय हवे, असेही विचारताना दिसत आहे. त्यामुळे मलिकांकडून क्रूझवर सापळा रचल्याचा दावा केला आहे. दरम्यान, मलिकांनी सकाळी पुन्हा एकदा काशिफ खान आणि समीर वानखेडे यांचे संबंध असल्याचा आरोप केला आहे. काशिफ खान गोव्यात लपला आहे. पण त्याला एनसीबीकडून अटक केली जात नाही. त्याची चौकशीही करण्यात आलेली नाही, असा आरोप मलिकांनी केला आहे.
दरम्यान, ''सॅम डिसोझा यांने दिल्लीत पैसे दिल्याची माहिती दिली आहे. सॅम डिसोझा हा वानखेडे निर्दोष असल्याचे सांगत आहे. तो समीर वानखेडेंचा प्रायव्हेट ड्रग्ज डीलर आहे. क्रूझ वरील पार्टीचा आयोजक काशिफ खान होता. काशिफ खान याला अजून का पकडण्यात आले नाही. काशिफ खान हा गोव्यात आहे," अशी माहिती मलिक यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.