Mumbai News : जालन्यातील अंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर राज्यभर मराठा आरक्षणाची मागणी तीव्र झाली आहे. निजामशाहीत नोंदी असणाऱ्या मराठवाड्यातील मराठा समाजातील लोकांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. मात्र, वंशावळ नाही अशा लोकांसह सरसकट मराठ्यांना प्रमाणपत्र मिळावे, यावर जरांगे पाटील ठाम राहिले.
या मागणीनंतर राज्यातील 'ओबीसी' समाजात अस्वस्थता निर्माण झाली आहे. आपल्या आरक्षणाला धक्का पोचू नये, अशी मागणी करत ओबीसी रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत. परिणामी राज्य सरकारपुढील आरक्षणावरून निर्माण झालेली अडचण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. (Latest Political News)
राज्यात सुरू असलेल्या मराठा-ओबीसी आरक्षणाच्या वादाची ठिणगी चंद्रपुरात पडली आहे. जालन्यात जरांगे पाटील यांचे उपोषण मराठा समाजाला सरसकट कुणबी समाजात सामील करावे, यासाठी असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, ही मागणी चुकीची असून त्याचा राष्ट्रीय ओबीसी महासंघाने विरोध केला आहे. महासंघाने ओबीसी समाज व इतर जातीनिहाय जनगणना, ओबीसी समाजाची वसतिगृहे राज्यभर तत्काळ सुरू करा, बिहारच्या धर्तीवर जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, अशा मागण्याही पुढे रेटल्या आहेत.
दरम्यान, चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे (Ravindra Tonge) यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनानंतर १७ सप्टेंबरला राष्ट्रीय ओबीसी महासंघ व ओबीसीत मोडणाऱ्या सर्व जात संघटनेचा महामोर्चा काढण्यात येणार आहे. यामुळे राज्यात मराठा-ओबीसी आरक्षणाचा वाद वाढण्याची शक्यता आहे.
जालन्यातील आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. सरसकट मराठ्यांना आरक्षण देण्याची मागणी जोर धरू लागल्यानंतर सरकारच्या हलचाली वाढल्याचे दिसून येत आहे. मराठा आरक्षणावरून वाढलेला तेढ कमी करण्यासाठी सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक होणार आहे. (Maharashtra Political News)
दुसरीकडे मात्र मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध वाढतानाही दिसत आहे. दरम्यान, ओबीसी समाजही आजपासून रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात आले. यातून सरकार कसा मार्ग काढणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
(Edited by Sunil Dhumal)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.