Palghar Hospital Case : पालघर रुग्णालय राडा प्रकरण, ११ गोविंदांसह कॅमेरामनला जामीन; प्रमुख आरोपींच्या अर्जांवर सुनावणी बाकी

Palghar Hospital Assault Case Bail : राहुल, मनीष उर्फ विकी आणि नगरसेवक नीलम संखे यांच्या जामीन अर्जावर ३१ ऑक्टोबरला निर्णयाची शक्यता, साईराज पाटील यांच्या अर्जावर २ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.
Palghar hospital Assault Case Bail
Palghar hospital Assault Case Bail sarkarnama
Published on: 
Updated on: 

निखिल मेस्त्री

Palgar News : पालघरच्या रिलीफ रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, धमक्या तसेच मारहाण केल्याच्या आरोपांमुळे चर्चेत आलेल्या रुग्णालय राडा प्रकरणात अकरा गोविंदांसह एका कॅमेरामनची जामिनावर सुटका झाली आहे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सुजाता बांदल यांनी मंगळवारी १२ जणांचे जामीन अर्ज मंजूर केले. मात्र, या प्रकरणातील काही प्रमुख आरोपींच्या जामीन अर्जांवरील निर्णय अद्याप बाकी असून त्यामुळे पुढील न्यायालयीन सुनावण्यांकडे लक्ष लागले आहे.

५ सप्टेंबर रोजी दहीहंडी उत्सवादरम्यान जखमी झालेल्या गोविंदाच्या उपचारांवरून रिलीफ रुग्णालयात वाद निर्माण झाला होता. या वेळी शिवसेनेचे पदाधिकारी कुंदन संखे, युवासेनेचे तत्कालीन प्रमुख साईराज पाटील, मनीष उर्फ विकी संखे, राहुल संखे, ऋषभ वारे, शुभम बांदिवडेकर, नगरसेवक नीलम संखे, मनोज घरत यांच्यासह अन्य व्यक्तींनी रुग्णालयात गोंधळ घातल्याचा आरोप आहे.

डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व धमक्या देण्यात आल्याचा, तसेच राहुल घरत याने रुग्णालयातील कर्मचारी विवेक झिंगा यांना कानशिलात मारल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता. या प्रकरणी ६ सप्टेंबर रोजी पालघर पोलिस ठाण्यात दहा नामनिर्दिष्ट व्यक्तींसह सात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी तपासादरम्यान संशयितांना ताब्यात घेऊन अटकसत्र सुरू केले.

Palghar hospital Assault Case Bail
MLC Election Result: विधान परिषद निवडणुकीत भाजपला धक्का! शिक्षक मतदारसंघात पराभव; वाराणसीचा गड सपानं जिंकला

अटकसत्रानंतर जामिनासाठी धाव

७ सप्टेंबर रोजी राहुल घरत याला अटक करण्यात आली. त्यानंतर तपासात अन्य व्यक्तींची ओळख पटवून पोलिसांनी आणखी कारवाई केली. १२ सप्टेंबर रोजी आमदारपुत्र रोहित राजेंद्र गावित याला अटक करण्यात आली, तर १३ सप्टेंबर रोजी कुंदन संखे यांच्यासह अन्य आरोपींना अटक करण्यात आली. या प्रकरणात एकूण २३ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती आहे. त्यानंतर संबंधित आरोपी न्यायालयीन कोठडीत होते.अनेक वेळा सर्वांनी जामिनासाठी अर्ज केले. मात्र जामीन अर्ज फेटाळण्यात आले होते.

अखेर अकरा गोविंदांनी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. कॅमेरामननेही स्वतंत्र अर्ज दाखल केला होता. या अर्जांवर सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने १२ जणांना जामीन मंजूर केला.

काही अर्जांवर अद्याप निर्णय नाही

शिवसेनेचे निलंबित पालघर युवासेना प्रमुख साईराज पाटील यांनी जामिनासाठी पालघर सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. या अर्जावर २ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. राहुल संखे, मनीष उर्फ विकी संखे आणि नगरसेवक नीलम संखे यांच्या जामीन अर्जांवर ३१ ऑक्टोबर रोजी सुनावणी निश्चित करण्यात आली आहे. दरम्यान कुंदन संखे, राहुल घरत, ऋषभ वारे, शुभम बांदिवडेकर, मनोज घरत आणि कुंदन संखे यांचा वाहनचालक यांच्या जामीन अर्जांबाबतची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.

उच्च न्यायालयातही प्रकरणाची सुनावणी

रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित करणारी याचिका महाराष्ट्र मेडिकल असोसिएशनकडून मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवरही सुनावणी सुरू आहे. अलीकडील सुनावणीदरम्यान पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी पोलीस डायरीसंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. एकीकडे काही आरोपींना जामीन मिळाला असताना, दुसरीकडे इतर आरोपींच्या अर्जांवरील सुनावणी आणि उच्च न्यायालयातील याचिकेमुळे हे प्रकरण न्यायालयीन स्तरावर चर्चेत राहणार आहे.

Palghar hospital Assault Case Bail
BJP News : भाजपला मोठा धक्का; दोन बड्या नेत्यांचा तडकाफडकी राजीनामा; पक्ष सोडताच घेतला मोठा निर्णय

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com