Mumbai News, 06 Dec : काँग्रेस नेते आणि प्रवक्ते पवन खेरा यांनी पत्रकार परिषद घेत पंतप्रधान कार्यालयातील प्रमुख अधिकारी असलेले हिरेन जोशी यांची अचानक हकालपट्टी केल्याचा मोठा दावा केला आहे. हिरेन जोशी हे प्रधानमंत्री कार्यालयात कम्युनिकेशन्स आणि आईटी विभागाचे ओएसडी (ऑफिसर ऑन स्पेशल ड्यूटी) असल्याचे सांगितले जाते.
ते पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अत्यंत विश्वासू आणि जवळचे मानले जातात. त्यामुळे त्यांची हकालपट्टी का केली? या चर्चांना सध्या उधाण आलं आहे. अशातच आता ठाकरेंच्या शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून हिरेन जोशी ‘महादेव’ बेटिंगमध्ये सट्टेबाजी करत होते, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
सामनात लिहंलं की, 'पंतप्रधान कार्यालयात ‘ओएसडी’ म्हणून काम करणारा हिरेन जोशी मोदींचा उजवा हात आहे. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून हे महाशय मोदींचे मीडिया मॅनेजमेंट सांभाळत होते. पंतप्रधान कार्यालयात बसून हिरेन जोशी सर्व मीडिया ग्रुप, चॅनल्स, वृत्तपत्रांवर दबाव आणत असे. कोणती बातमी ब्रेकिंग न्यूज चालवायची हे हिरेन जोशी ठरवत होता.
हिरेन जोशीची मीडियाच्या मालकांत व संपादकांत प्रचंड दहशत होती. असा हिरेन जोशी ‘महादेव’ बेटिंगमध्ये सट्टेबाजी करत होता.' पंतप्रधान कार्यालयाचा वापर करून त्याने गेल्या चार वर्षांत पैसाच पैसा गोळा केला. या कामात त्याला मदत करणारे हितेश जैन आणि प्रसार भारतीचे प्रमुख नवनीत सहगल होते. या तिघांनी सरकारी पदावर बसून बेकायदा सट्टेबाजी केली.
या सट्टेबाजी व्यवहारात हिरेन जोशीचे परदेशी भागीदार आहेत. हे परदेशी भागीदार कोण? याचा खुलासा व्हायला हवा, अशी मागणी सामनातून करण्यात आली आहे. तर पंतप्रधान कार्यालयात बसलेला ‘ओएसडी’ बेटिंग माफियाचे रॅकेट चालवत होता. तर मग देशाची सुरक्षा राम भरोसेच म्हणायला हवी, असा टोलाही सामनातून लगावला आहे.
शिवाय जो हिरेन जोशी कालपर्यंत मीडियात मोदींच्या नावाने दहशत निर्माण करीत होता, तो पंतप्रधान कार्यालयातून अचानक गायब झाला. महादेव बेटिंग अॅप प्रकरणात छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या मुलास अटक झाली. काँग्रेसला पुरते बदनाम केले गेले. ईडी, सीबीआयने महादेव अॅपच्या माध्यमातून काँग्रेसला प्रचंड पैसा मिळाला याचे नाट्य उभे केले.
पण या बेटिंगचे खरे सूत्रधार पंतप्रधानांच्या कार्यालयात होते, हे आता उघड झाल्याचंही सामनात म्हटलं आहे. अर्थात या सूत्रधारांना ईडी, सीबीआयने अद्यापि हात लावलेला नाही. प्रसार भारतीचे चेअरमन नवनीत सहगल या सट्टेबाजीत सामील आहेत. त्यांचा मुलगा शिवा सहगल सट्टेबाजी करणाऱ्या या कंपन्यांचा भागीदार आहे, पण देशाच्या तपास यंत्रणा, देशाचा मीडिया यावर तोंडात बोळा कोंबून बसला आहे.
पंतप्रधानांच्या संवेदनशील कार्यालयाचा वापर सट्टेबाजीसाठी चालला असेल तर त्याची जबाबदारी पंतप्रधानांची आहे. सट्टेबाजीत अडकलेले हे तिन्ही लोक पंतप्रधान मोदींचे खास आहेत. त्यामुळे या सट्टेबाजीवर पंतप्रधानांची भूमिका काय? विरोधकांना किरकोळ प्रकरणांत, खोटी प्रकरणे तयार करून अडकवणाऱ्या मोदी-शहा व त्यांच्या तपास यंत्रणांना पंतप्रधान कार्यालयातून झालेले ‘मनी लाँडरिंग’सारखे गुन्हे दिसू नयेत याचे आश्चर्य वाटते.
सट्टेबाजीच्या बदल्यात देशाची काही गुप्त माहिती पंतप्रधान कार्यालयातून विकली गेली काय? हा देखील प्रश्न उपस्थित होऊ शकतो. कारण हिरेन जोशी वगैरे ‘माफिया’ पंतप्रधानांबरोबर अनेक विदेश दौऱ्यांवर होते व या काळात हे ‘सट्टेबाज’ विदेशातील त्यांचे भागीदार व इतर ऑनलाईन बेटिंगवाल्यांना भेटल्याचे उघड झाले आहे. देशाच्या पंतप्रधान कार्यालयातच भ्रष्टाचार, जुगार, सट्टेबाजीला ऊत आला आहे. हाच पैसा भाजपच्या राजकारणात आणला जातो.
ज्यांच्यावर ‘ईडी’, ‘सीबीआय’च्या कारवाया झाल्या असे उद्योगपती आणि कंपन्यांकडून हजारो कोटींच्या निवडणूक देणग्या घेणाऱ्या भाजपने लाज सोडली आहे. त्यामुळे सर्व सट्टेबाज माफियांना भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये टाकून स्वच्छ केले जाईल व पंतप्रधान कार्यालयातील सट्टेबाजी व जुगार हा हिंदुत्वाचे प्रतीक म्हणून जाहीर केले जाईल.
देशाची प्रतिष्ठा इतकी खालच्या पातळीवर कधीच घसरली नव्हती. पुन्हा या सर्व प्रकारावर मोदींचे मौन आहे. गृहमंत्री पडद्यामागे हालचाली करत आहेत. उद्या पंतप्रधान कार्यालयात ‘सट्टेबाजी’, मनी लाँडरिंग झाले हे विसरण्यासाठी एखादी धर्माची अफू गोळी दिली जाईल, दुसरे काय, असा जोरदार हल्लाबोल सामनामधून भाजप आणि पंतप्रधान कार्यालयावर करण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.