

Thane News : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे विभागप्रमुख प्रदीप ऊर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथकाचीही स्थापना करण्यात आली आहे. यात पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असून, हत्येमागील नेमका कट आणि त्यातील इतर सहभागींचा शोध घेतला जात आहे. अशातच पूर्णेकर कुटुंबीयांनी दिलेल्या जबाबातून या प्रकरणाला आणखी एक नवे वळण मिळाले आहे.
हत्येच्या काही दिवस आधी दोन तरुणांसोबत आढळलेल्या एका तरुणीवर कुटुंबीयांनी संशय व्यक्त केला असून, तिच्याबाबतही सखोल तपास करण्याची मागणी पोलिसांकडे करण्यात आली आहे. प्रदीप पूर्णेकर यांचा मुलगा राम पूर्णेकर यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, हत्येच्या काही दिवस आधी परिसरातील एका तरुणीला दोन तरुणांसोबत एका खोलीत आढळून आले होते. त्यावेळी पूर्णेकर यांनी त्या ठिकाणी जाऊन संबंधित तरुणांशी वाद घातल्याचा आणि त्यांना मारहाण केल्याचा दावा करण्यात आला आहे.
‘त्या’ तरुणीबाबत कुटुंबीयांचा संशय
यानंतर पूर्णेकर यांनी त्या तरुणीला आणि तिच्यासोबत असलेल्या दोन्ही तरुणांना कापूरबावडी पोलीस ठाण्यात (Police station) आणल्याचा उल्लेख पुरवणी जबाबात करण्यात आल्याचे राम पूर्णेकर यांनी सांगितले. याच घटनेनंतर संबंधित तरुणी पूर्णेकर यांच्या हत्येच्या आधी आणि हत्येनंतर त्यांच्या कार्यालयाबाहेर दिसून आल्याची माहिती राम पूर्णेकर यांनी पोलिसांना दिल्याचा दावा केला आहे. यामुळे या तरुणीचा पूर्णेकर यांच्या हत्येशी काही संबंध आहे का, तिची आरोपींशी ओळख किंवा संपर्क होता का, याचा तपास करण्याची मागणी कुटुंबीयांकडून करण्यात आली आहे.
हत्येच्या तपासाला वेग
पूर्णेकर हत्या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत अनेक संशयितांची चौकशी केली आहे. एका माजी सहकाऱ्याला अटक करण्यात आली असून, इतर संशयितांचाही शोध सुरू आहे. दरम्यान, पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांनी यापूर्वी माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. शिंदे यांनी हे आरोप फेटाळले असून, पोलिस तपासातूनच सत्य समोर येईल, असे म्हटले आहे. त्यामुळे आता पूर्णेकर यांच्या हत्येच्या कटामागे नेमकं कोण आहे, हत्येपूर्वी दिसलेल्या ‘त्या’ तरुणीचा या प्रकरणाशी काही संबंध आहे का आणि हत्येमागचा अंतिम हेतू काय होता, याकडे पोलिसांच्या तपासाचे लक्ष लागले आहे.
शिंदेंनी आरोप फेटाळले
दरम्यान, शुक्रवारी या प्रकरणी ठाण्याचे माजी महापौर मीनाक्षी शिंदे (Meenakshi Shinde) यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले. मात्र, त्यानंतर प्रदीप पूर्णेकर यांच्या भावाने पुन्हा एकदा मीनाक्षी शिंदेंवर गंभीर आरोप केले आहेत. यावेळी जयनाथ पूर्णेकर म्हणाले, आम्ही कोणत्याही नेत्यांना बोलवलं नव्हतं, आमच्या पाठीशी जनता भरपूर आहे. मीनाक्षी शिंदे यांच्या विरोधात नारे लावायला आम्ही सांगितलं नाही. माझा भाऊ कोणाला घाबरत नव्हता, यांच्याकडून जो अन्याय चालवतो त्यांच्याविरोधात तो लढत द्यायचा. त्यामुळे, ऑडिओ क्लिपच काय तुम्ही सगळी चौकशी करा, असे जयनाथ पूर्णकर यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.