मुंबई : राज्यात मागील महिन्यात झालेल्या राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकांमधील धक्कातून महाविकास आघाडी अजूनही सावरलेली नसल्याचे चित्र आहे. राज्यसभेत शिवसेनेला (Shivsena) तर विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसला (Congress) पराभवाचा मोठा धक्का बसला होता. विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore) पराभूत झाले होते. काँग्रेसने २९चा कोटा ठेवला असताना हंडोरे यांना २२च मते पडली होती.
त्यामुळे काँग्रेसच्या याच सात आमदारांनी पक्षाविरोधात मतदान केल्याने त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (prithviraj chavan) यांनी पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांच्याकडे केली आहे. विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडे ४४ आमदारांची मते होती. काँग्रेस हायकमांडकडून पहिल्या पसंतीचे उमेदवार म्हणून चंद्रकांत हंडोरे यांना मतदान करण्याचे आदेश देण्यात आले होते. तर उर्वरित मते दुसऱ्या क्रमांकाचे उमेदवार भाई जगताप यांना देण्याचे आदेश होते.
मात्र या निवडणुकीत भाई जगताप (Bhai Jagtap) विजयी झाले, पहिल्या पसंतीचे हंडोरे पराभूत झाले. त्यामुळे काँग्रेस आमदारांनी पक्षशिस्त न पाळल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसच्या वरिष्ठांकडे तक्रार केली आहे.
हंडोरे यांना केवळ २२ मते पडली, सात जणांनी भाजपला मतदान केल्याने हंडोरे यांचा पराभव झाला, याची गंभीर दखल घ्या, अशी मागणी महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांच्याकडे करण्यात आली असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी बोलताना सांगितले. भाजपला मते दिली असतील तर हे आमदार भाजपच्या संपर्कात आहेत असा अर्थ निघतो. शिवाय यामुळे दलित समाजात चुकीचा संदेश गेला आहे. हे प्रकरण दडपून टाकलं तर बेशिस्तीला प्रोत्साहन दिल्यासारखे होईल. मतदान करताना कोडिंग करण्यात आले होते. त्यामुळे कुठल्या आमदारांनी मतदान केलेले नाही हे आम्हाला माहीत आहे, असेही ते म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.