
RahuI Gandhi Voter List Controversy : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत केंद्रीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केलेत. महाराष्ट्रा, कर्नाटकसह देशभरात मोठ्या प्रमाणात मत चोरी झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.
शिवाय महाराष्ट्रात तब्बल 40 लाख संशयास्पद मतदार असल्याचा दावाही त्यांनी केला. हे आरोप करताना राहुल गांधींनी काही पुरावे देखील दिले. राहुल गांधींच्या या आरोपांमुळे देशभरात खळबळ उडाली. त्यानंतर अनेकांनी निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित करायला सुरूवात केली आहे.
तर मतांची चोरी ही महाराष्ट्रात तसेच भारतात कुठेही झालेली नसून राहुल गांधींच्या डोक्यातील चीप चोरीला गेली असून त्यांची हार्डडिस्क करप्ट झाली आहे, अशी टीका करत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गांधींचे सर्व आरोप फेटाळून लावले होते.
मात्र, अशातच आता काँग्रेस नेत्यांनी भाजपचे जेष्ठ नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा नोव्हेंबर 2024 च्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतरचा एक व्हिडिओ व्हायरल केला आहे. ज्यामध्ये ते आपल्या मतदारसंघांत तब्बल साडेतीन लाख मतदारांची नावे कमी केल्याचा आल्याचा दावा करत आहेत. या व्हिडिओमुळे आता निवडणूक आयोगावर राहुल गांधींनी केलेल्या आरोपात तथ्य असल्याचं विरोधक म्हणत आहेत.
काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी एक्सवर नितीन गडकरी यांचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यावेळी त्यांनी लिहिलं की, "ये अंतर की बात, गडकरीजी सत्य के साथ. काँग्रेस नेते राहुलजी गांधी यांना खोटं ठरवू पाहणाऱ्या भाजपच्या अंधभक्तांनी हा व्हिडिओ पहावा.
आतातर भाजपचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनीच तुम्हाला उघडं पाडलं आहे. त्यांच्या स्वतःच्या नागपूर मतदारसंघात साडे 3 लाख मतदारांना मतदार यादीतून वगळल्याचं ते सांगत आहेत. भाजपवालेहो, उघडा डोळे, ऐका नीट."
केंद्रीय मंत्री नितिन गडकरींचा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना ते म्हणतात, "मी कोणावर आरोप करत नाही, पण माझ्या मतदारसंघातील जे मला मतदान करणारी लोकं होती. अशा साडे तीन लाख लोकांची नावे कापली. यामध्ये माझ्या जवळच्या माणसांची नावे होती. माझे अनेक नातेवाईक होते.
माझ्या कुटुंबातील व्यक्तींची सुद्धा नावे वगळण्यात आली होती." त्यामुळे आता या व्हिडिओच्या माध्यमातून भाजप अन् निवडणूक आयोगावर टीका करण्यासाठी विरोधकांना आयतं कोलीत मिळालं आहे. तर काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी देखील आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांची कोणती चीप आणि डिस्क खराब झाली आहे? असा खोचक सवाल उपस्थि करत भाजपला डिवचलं आहे.
निवडणुक आयोगाची वकिली करणारे मुख्यमंत्री, भाजप नेते गडकरींना जाब विचारणार का मतचोरी होते, मतदार यादीत घोळ केले जातात याचा पुरावा आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला. केंद्रीय मंत्री गडकरी यांनी गंभीर आरोप केला की त्यांच्या निवडणुकीत मतदारसंघातील 3,50,000 नावं वगळण्यात आली. विशेष म्हणजे जी नावं वगळण्यात आली ते त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक होते. त्यांच्या भाच्याचे नावही वगळण्यात आले, असं गडकरी म्हणाले.
नितीन गडकरी यांच्या जवळच्या लोकांची मत जर मतदार यादीतून गायब होत असतील तर इतरांचे काय? कुठे मतदार वाढवून दाखवले जात आहे तर कुठे मतदार गायब केले जात आहे, मतचोरीचा याहून मोठा पुरावा काय आहे? केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवडणूक आयोग आता प्रतिज्ञापत्रक मागणार का ? अजून पुरावे मागणार की माफी मागणार? असे अनेक सवाल वडेट्टीवार यांनी सरकारला आणि आयोगाला केले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.