Dr. Ambedkar Birth Anniversary : मुंबई महाराष्ट्राचीच कशी? आंबेडकरांनी दिलं होतं सडेतोड उत्तर, राज ठाकरेंकडून स्मरण

Raj Thackeray’s Tribute to Dr. B.R. Ambedkar on His Birth Anniversary : मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र नको म्हणून जे काही तर्क पुढे केले जात होते, त्याला त्यांनी कसं सडेतोड उत्तर दिलं होतं, याचं स्मरण होणं आवश्यक आहे, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
Dr Babasaheb Ambedkar, Raj Thackeray
Dr Babasaheb Ambedkar, Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जगभरात त्यांना वंदन केले जात आहे. यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील बाबासाहेब आंबेडकरांच्या योगदानाचे स्मरण केले आहे आहे. मराठी जनांना आपण मराठी म्हणून एकत्र येणं, मराठी समाजाने जातीच्या भिंती उध्वस्त करणं आणि या प्रांताला वैभव प्राप्त करून देण्याची शपथ घेण्याचे आवाहन त्यांनी सोशल मीडियातून केलं आहे.

काय म्हणाले राज ठाकरे?

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांची आज जयंती. आज या जयंतीनिमित्त संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या वेळेला बाबासाहेबांनी या लढ्याला कसा पाठींबा दिला होता आणि इतकंच नाही तर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र नको म्हणून जे काही तर्क पुढे केले जात होते, त्याला त्यांनी कसं सडेतोड उत्तर दिलं होतं, याचं स्मरण होणं आवश्यक आहे, असे राज ठाकरेंनी फेसबूक पोस्टमध्ये म्हटले आहे.

Dr Babasaheb Ambedkar, Raj Thackeray
Dr. Babasaheb Ambedkar : डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली काही बहुचर्चित पुस्तकं तुम्हाला माहिती आहेत का?

संयुक्त महाराष्ट्राच्या सुरुवातीच्या काळात, कॉम्रेड डांगे, एस.एम. जोशी, आचार्य अत्रे आणि संयुक्त महाराष्ट्र समितीच्या इतर नेत्यांनी, बाबासाहेबांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली होती आणि या लढ्यासाठी त्यांचं आणि त्यांच्या अनुयायांचे सहकार्य मागितलं होतं. यावेळेस बाबासाहेबांनी देखील माझा शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन संयुक्त महाराष्ट्र समितीच्या पाठीशी जिब्राल्टरच्या खडकासारखा उभा राहील, असं सांगितल्याचे राज ठाकरेंनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

राज ठाकरे पुढे लिहितात की, इतकंच नाही तर पुढे मुंबईतील राजगृह हे संयुक्त महाराष्ट्र समितीच्या बैठकांचे केंद्र बनलं. या बैठकांमध्ये आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे हे देखील उपस्थित असायचे. स्वतः बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1948 रोजी धार कमिशनला मराठी भाषिकांसाठी स्वतंत्र राज्य असावं, या मागणीला पाठींबा देणारं निवेदन दिलं होतं. या निवेदनात मुंबई हा महाराष्ट्राचाच अविभाज्य भाग कसा आहे, याचं विस्तृत विवेचन आहे. आणि हे विवेचन Maharashtra As A Linguistic Province मध्ये वाचता येईल.

Dr Babasaheb Ambedkar, Raj Thackeray
Bhushan Gavai : आंबेडकरी चळवळीचा वारसा, वडील माजी खासदार; महाराष्ट्राचे सुपुत्र होणार सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश

हे सगळं सविस्तर सांगायचं कारण असं की, बाबासाहेबांनी पुढे जाऊन मुंबई हा महाराष्ट्राचा भाग कधीच नव्हता किंवा मुंबईत फक्त मराठी भाषिकांची लोकसंख्या अधिक आहे, म्हणून मुंबई महाराष्ट्राचा भाग कसा होऊ शकतो, असे जे तर्क पुढे केले जात होते, त्याला सडेतोड उत्तर दिलं होतं. ते म्हणाले होते की, मुसलमानांनी भारतावर-हिंदूंवर आक्रमणं केली म्हणून हिंदू-मुसलमानांची मूळ ओळख पुसली गेली नाही. मुंबईत गुजराती किंवा इतर भाषिक आले म्हणजे मुंबईची मूळ ओळख पुसली गेली, असं होत नाही. मुंबईची मूळ ओळख ही मराठी भाषिकांचा प्रांत अशीच आहे आणि ती बदलता येणार नाही, असे राज ठाकरेंनी लिहिले आहे.

पुढे बाबासाहेबांचं निधन झालं. पण त्यानंतर दादासाहेब गायकवाड, बॅरिस्टर बी.सी. कांबळे यांच्यासारखे नेते संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात त्वेषाने उतरले. बॅरिस्टर बी.सी. कांबळे यांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलकांवर होणाऱ्या पोलिसी कारवायांवर विधानसभेत प्रश्न उपस्थित करून मोरारजी देसाईंना जेरीस आणलं होतं. पुढे 1960 ला मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला. हा प्रसंग पहायला बाबासाहेब नव्हते. पण या लढ्यातील बाबासाहेबांचं योगदान हे विसरता येणार नाही, असे राज ठाकरे सांगतात. 

आज पुन्हा एकदा मुंबईत मराठी भाषेला, मराठी माणसाला दुय्यम दर्जा दिला जात असताना, या लढ्यासाठी किती उत्तुंग माणसांनी आपली शक्ती खर्ची केली होती, हे मराठी माणसाने विसरू नये. आणि हे जर आपण विसरलो आणि मराठी म्हणून एकत्र नाही आलो तर या लढ्याला काय अर्थ? आपण मराठी म्हणून एकत्र येणं, मराठी समाजाने जातीच्या भिंती उध्वस्त करणं आणि या प्रांताला वैभव प्राप्त करून देण्याची शपथ घेणं, हे आजच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांचं योग्य स्मरण ठरेल, असे आवाहन राज ठाकरेंनी केलं आहे.   

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com