Ramesh Mhatre News : डोंबिवलीतील शास्त्रीनगर महापालिका रुग्णालयात डॉक्टर आणि परिचारिकांना मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचे (शिंदे गट) नगरसेवक रमेश म्हात्रे रविवारी पोलिसांना शरण आले. त्यांना रविवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ३ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तसेच या प्रकरणातील महिला आरोपी साधना करांडे यांनाही अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
यापूर्वी कल्याण न्यायिक दंडाधिकारी न्यायालयाने रमेश म्हात्रे यांना जामीन मंजूर केला होता. मात्र, त्या जामिनाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती देत त्यांना पोलिसांसमोर शरण जाण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार म्हात्रे यांनी विष्णूनगर पोलीस ठाण्यात हजर होत आत्मसमर्पण केले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ३ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.
या प्रकरणात विष्णूनगर पोलिसांनी साधना करांडे यांना अटक केली. त्या उपचारात विलंब झाल्याचा आरोप करण्यात आलेल्या गर्भवती महिलेच्या आई आहेत. उपचाराला झालेल्या कथित विलंबानंतर झालेल्या वादातून त्यांनी रमेश म्हात्रे आणि त्यांच्या समर्थकांसह डॉक्टर व परिचारिकांना मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यांना पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले. या अटकेनंतर या प्रकरणातील अटक आरोपींची संख्या पाच झाली आहे.
दरम्यान, रमेश म्हात्रे यांचे वकील गणेश पाटील यांनी सांगितले की, उच्च न्यायालयाने म्हात्रे यांच्या जामिनाला स्थगिती दिली असून या प्रकरणाची पुढील सुनावणी २२ जुलै रोजी होणार आहे. त्या दिवशी बचाव पक्षाकडून उच्च न्यायालयात भूमिका मांडण्यात येणार आहे.
शास्त्रीनगर रुग्णालयात गर्भवती महिलेच्या उपचाराला विलंब झाल्याच्या आरोपावरून झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले होते. या घटनेनंतर डॉक्टर, परिचारिका आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या घटनेचा वैद्यकीय क्षेत्रातून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला होता. डॉक्टरांनी नियमित सेवा बंद ठेवत केवळ आपत्कालीन सेवा सुरू ठेवून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली होती. या प्रकरणाचा पुढील तपास विष्णूनगर पोलीस करत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.