Delhi blast : 'मुळात देशाला सगळ्यात मोठा धोका आहे तो धर्मांध आणि सुस्तावलेल्या 'भाजप' मॉड्युलपासून; संसदेवर हल्ला झाला तेव्हा यांचंच सरकार...', ठाकरेंचा घणाघात

Shivsena UBT On Red Fort blast : 'राष्ट्रीय सुरक्षेबाबत भाजप नेहमी बेफिकीर राहिला. भाजपच्या काळात पहलगाम, पुलवामा, उरी, पठाणकोट, अक्षरधाम, अमरनाथसारखे भयंकर हल्ले झाले. त्यातील बहुतेक हल्ले आमच्या सैन्य ठिकाणांवर झाले. हे भारताच्या गृह मंत्रालयाचे प्रचंड अपयश असताना गृहमंत्री शहा स्वतः सरदार पटेलांच्या तोऱ्यात वावरतात ते कशाच्या जोरावर?'
Uddhav Thackeray, Narendra Modi
Security personnel inspect the scene near the historic Red Fort after the deadly car explosion; Saamana’s editorial links the Red Fort blast to lapses in national security.Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 13 Nov : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या बॉम्बस्फोटावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून थेट भाजपवर निशाणा साधला आहे. हा बॉम्बस्फोट झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी भूतान देशाच्या दौऱ्यावर गेले होते यावरही ठाकरेंच्या शिवसेनेने टीका केली आहे.

देशावरील संकट समयी मोदी केवळ वल्गनाच करतात व एरवी फक्त निवडणूक प्रचार सभांत बोलतात. आताही लाल किल्ला बॉम्बस्फोटावर मोदी यांनी तेच केले. पुन्हा या दहशतवादी हल्ल्याच्या तपासाची सूत्रे देशाचे अपयशी गृहमंत्री हाताळत आहेत. त्यांच्याच काळात गृहखात्याची यंत्रणा राजकारणग्रस्त झाली आहे, अशा शब्दात सामनातून पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना लक्ष्य करण्यात आलं आहे.

सामनात लिहलं की, जेव्हा देशावर दहशतवादी हल्ले होतात, त्या त्या वेळी पंतप्रधान मोदी हे अज्ञात ठिकाणी किंवा दूरदेशी असतात. पुलवामा हल्ल्यावेळी ते जिम कार्बेटच्या जंगलात सफारी आणि शूटिंगची मौज घेत होते, तर दिल्लीत हल्ला झाला तेव्हा ते भूतान देशी होते आणि तिथून त्यांन दहशतवादी हल्ल्याचा कट रचणाऱ्यांना सोडणार नाही, असं म्हटलं. पण ही अत्यंत बुळबुळीत भाषा आहे. दहशतवाद्यांनी तिकडे कारस्थान रचले व ते अमलात आणले. त्या हल्ल्यात लोक मारले गेले आणि तेथे रक्ताचे सडे पडल्यावर तुम्ही इशारे देताय की, 'त्यांना सोडणार नाही.'

दिल्लीतील बॉम्बस्फोटाचा संबंध कश्मीरशी जोडला जातोय. प्रश्न इतकाच आहे की, देशाच्या गृहमंत्र्यांची काही जबाबदारी आहे की नाही? गृहमंत्र्यांनी संसदेत 'कश्मीरातून 370 कलम हटवण्याची हिंमत आमच्या सरकारने दाखवली. आधीचे सरकार बोटचेपे होते. आम्ही 370 कलम हटवून कश्मीरचा प्रश्न सोडवला आहे. आता कश्मीरातून दहशतवादाचे समूळ उच्चाटन होईल,' असं म्हटलं होतं.

प्रत्यक्षात मात्र, उलटेच घडताना दिसत आहे. तेच नोटाबंदीचेही झाले. नोटाबंदीमुळे कश्मीरातील दहशतवादाचे कंबरडे मोडून पडेल, दहशतवाद्यांचा आर्थिक पुरवठा बंद पडेल, अशाही वल्गना केल्या होत्या, पण त्या सर्व हवेतल्या बाताच निघाल्या. कश्मीरातला दहशतवाद तर संपलेला नाहीच. उलट दहशतवादाचे नवे स्लीपर्स सेल आणि मॉड्यूल भारतात निर्माण झाले आहेत आणि त्यांचा शोध घेण्यात गृह मंत्रालय कमजोर पडले आहे. दहशतवादाचे नवे ‘मॉड्यूल’ किंवा ‘स्लीपर्स सेल’ आम्ही म्हणतो.

Uddhav Thackeray, Narendra Modi
Sharad Pawar : 'लग्न जमत नाही, जगण्याची उमेद हरवली…', शरद पवारांना तरुणाचे भावनिक पत्र; अनिल देशमुखही झाले स्तब्ध!

कारण दिल्ली बॉम्बस्फोटानंतर ज्यांना अटका झाल्या, त्यात सुशिक्षित तरुण-तरुणी, डॉक्टर आहेत. मुख्य संशयित डॉ. उमर नबी हा उच्चशिक्षित आहे. संपूर्ण देशात हे ‘टेरर मॉड्युल’ पसरले आहे व त्यांच्याकडे शस्त्रे, स्फोटके पोहोचली असतील तर देशाचे गृह मंत्रालय दिल्लीत बसून काय करत आहे? असा सवाल सामनातून उपस्थित केला आहे. पण वास्तव हे आहे की, ते देशाच्या सुरक्षेऐवजी विरोधकांच्या विरोधातील कारस्थानांत दंग आहे.

भाजपच्या काळात सर्वाधिक दहशतवादी हल्ले झाले. या प्रत्येक हल्ल्याची जबाबदारी आधीच्या सरकारांवर टाकून भाजपवाले मोकळे झाले. आज देशात सर्वाधिक सुरक्षा भाजप नेते, मंत्री, भाजप व संघाच्या मुख्यालयांना आहे. सरसंघचालक भागवत यांना तर शेकडो कमांडोजनी घेरून ठेवले आहे पण सामान्यांच्या सुरक्षेकडे कोणी पाहायचे? संसदेवर हल्ला झाला तेव्हाही केंद्रात भाजपचेच सरकार होते व आज लाल किल्ल्यावर हल्ला झाला तेव्हाही सत्तेत भाजपच आहे.

Uddhav Thackeray, Narendra Modi
Bihar Election Results : बिहारमध्ये दे धक्का! तेजस्वी यादव यांच्या पक्षाला सर्वाधिक जागा, सगळे अंदाज चुकवणारा एक्झिट पोल समोर

राष्ट्रीय सुरक्षेबाबत भाजप नेहमी बेफिकीर राहिला. भाजपच्या काळात पहलगाम, पुलवामा, उरी, पठाणकोट, अक्षरधाम, अमरनाथसारखे भयंकर हल्ले झाले. त्यातील बहुतेक हल्ले आमच्या सैन्य ठिकाणांवर झाले. हे भारताच्या गृह मंत्रालयाचे प्रचंड अपयश असल्याचंही सामनात म्हटलं आहे. तर भारतात असे दहशतवादी हल्ले सतत घडत राहावेत, त्यातून हिंदू-मुसलमानांत विभाजन होऊन त्याचा लाभ एकगठ्ठा हिंदू मतदान आपल्याला मिळण्यात व्हावा अशा प्रकारचे मनोरथ घेऊन देशातील एक मोठा वर्ग सध्या राजकारणात वावरत आहे.

त्यांनी भारताची सामाजिक आणि धार्मिक वीण उसवली आहे. त्यामुळे देशात राष्ट्रीय प्रश्नांवर, अन्न, वस्त्र, निवाऱ्यावर कोठेच चर्चा होऊ दिली जात नाही. हिंदू-मुसलमान हाच राष्ट्रीय चर्चेचा विषय बनवण्याचे कारस्थान रचले व अमलात आणले जात आहे. भारतातील हा मोठा वर्ग आपल्या अस्तित्वासाठी गुदमरला आहे. त्यातून हे ‘धर्मयुद्ध’ छेडले जात असेल तर देशाला विभाजनाचा धोका मोठा आहे.

देशावरील संकट समयी मोदी केवळ वल्गनाच करतात व एरवी फक्त निवडणूक प्रचार सभांत बोलतात. आताही लाल किल्ला बॉम्बस्फोटावर मोदींनी तेच केले. पुन्हा या दहशतवादी हल्ल्याच्या तपासाची सूत्रे देशाचे अपयशी गृहमंत्री हाताळत आहेत. त्यांच्याच काळात गृहखात्याची यंत्रणा राजकारणग्रस्त झाली आहे. त्यामुळेच देशात दहशतवादी हल्ले होतच आहेत. तरीही मोदी म्हणतात, 'सोडणार नाही.’'

साहेब, दिल्लीत दहशतवादाचे नवे 'व्हाईट कॉलर' टेरर मॉड्युल निर्माण झाले. ते गाव जाळून निघून गेले, त्यांच्या आत्मघातकी पथकाने दिल्लीत हाहाकार माजवला आणि तुम्ही मात्र अजूनही 'सोडणार नाही'वरच अडकून पडलाय. मुळात देशाला सगळ्यात मोठा धोका आहे तो धर्मांध आणि सुस्तावलेल्या 'भाजप' मॉड्युलपासून, अशा शब्दात ठाकरेंच्या शिवसेनेच्या सामनातून भाजपवर प्रहार करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com