
Manisha Kayande: आषाढी वारीमध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांमध्ये तसंच भाविकांमध्ये संविधानाच्या मुल्यांप्रती जनजागृतीसाठी निघालेली 'संविधान दिंडी', पर्यावरणाच्या रक्षणाचं महत्व सांगणारी 'पर्यावरण वारी' तसंच संतांनी सांगितलेल्या अनिष्ट प्रथांविरोधात जनजागृती करणाऱ्या पथनाट्यांना शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी 'अर्बन नक्षल' असं संबोधलं आहे.
तसंच हे उपक्रम राबवणाऱ्या लोकांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी लक्षवेधीद्वारे बुधवारी विधानपरिषदेत केली. विशेष म्हणजे हे सांगताना सध्या राज्यभरात प्रचंड विरोधाचा सामना करावा लागत असलेल्या जनसुराज्य कायद्याचाही उल्लेख त्यांनी केला. हा कायदा आम्ही यासाठीच आणत आहोत, अशी स्पष्टोक्ती त्यांनी यावेळी दिली.
मनिषा कायंदे म्हणाल्या, "महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील लाखो वारकऱ्यांचा समावेश असलेली पंढरपूरची आषाढी वारी सध्या सुरु आहे. गोरगरिबांचे देवस्थान असलेल्या विठुरायावर श्रद्धा असलेले लाखो वारकरी या वारीत सहभागी होत असतात. या वैष्णवांच्या मेळाव्यात अनेक दिवसांपासून देवाला न मानणाऱ्या नास्तिक संघटनांचा शिरकाव झालेला असून ही अतिशय गंभीर बाब आहे. हे अर्बन नक्षल 'संविधान दिंडी', 'पर्यावरण वारी' आणि 'लोकायत' या नावाखाली वारीत जाऊन ठिकठिकाणी काहीतरी पथनाट्य करतात किंवा काहीतरी भाषणं देतात आणि लोकांचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न करतात"
"आपल्याला माहिती आहे की, महाराष्ट्र शासन येत्या अधिवेशनात 'जनसुरक्षा विधेयक' आणणार आहे. हे विधेयक देखील या अशा गोष्टींना अटकाव करण्यासाठीच आहे. मागे देखील काही दिवसांपूर्वी काही लोकांनी वारीवर मांसाचे तुकडे टाकण्याचं काम केलं. तसंच बंडातात्या कराडकर यांनी देखील या सगळ्या विषयावर खूप भाष्य केलेलं आहे. तसंच सरकारला आणि मुख्यमंत्र्यांना निवेदन देखील दिलेलं आहे. ही अतिशय गंभीर बाब असून दोन दिवसांतच आषाढी एकादशी देखील येते आहे, तर मला असं वाटतं की शासनानं त्वरीत यावर कारवाई करावी. हे सगळे प्रकार रोखले गेले पाहिजेत, कारण लोकांचा बुद्धिभेद करणं आणि त्यांना देवापासून दूर नेणं आणि हिंदू धर्मावर आक्रमण करण्याचेच हे प्रकार सुरु आहेत"
दरम्यान, मनिषा कायंदे यांच्या लक्षवेधीच्या मुद्द्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की, "शासनानं याची गंभीर दखल घेतली आहे. संबंधित गृहविभागाला याच्या सूचना दिल्या जातील. तसंच अशा समाजाला घातक असलेल्या लोकांवर कारवाई केली जाईल"
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.