रश्मी पुराणिक -
Mumbai : गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक नाट्यमय व वेगवान हालचाली घडत आहे. याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अखेर अजित पवारांनीच पत्रकार परिषदेत आपण राष्ट्रवादी सोडणार नसल्याचं स्पष्ट करत सुरु असलेल्या सर्व चर्चांवर पडदा टाकला. पण आता पुन्हा एकदा राज्याच्या राजकारण तापण्याची शक्यता आहे. शिंदे गटाचे नेते व मंत्री संजय राठोड यांच्या कार्यालयावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत.
अन्न व औषध प्रशासन कार्यालयाबाबत एक धक्कादायक बाब समोर आली आहे. महाराष्ट्र स्टेट ड्रगिस्ट असोसिएशनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे. या पत्राद्वारे अन्न व औषध प्रशासन या संजय राठोड(Sanjay Rathod) यांच्या मंत्रालयातील भ्रष्टाचार रोखण्याचं आवाहन केलं आहे. या पत्रात महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासनाचे मंत्री यांचे कार्यालय म्हणजे मंत्रालय नसून भ्रष्टाचार असल्याचे दिसून येत आहे. संपूर्ण राज्यातील औषध विक्रेते अन्न व औषध प्रशासन मंत्री यांच्या कार्यालयातील भ्रष्टाचाराने त्रस्त व तणावग्रस्त झालेले आहेत असल्याचं या पत्रात म्हटलं आहे.
पत्रात नेमकं काय ?
दि महाराष्ट्र राज्य केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन (The Maharashtra State Chemist and Druggist Association)चे सचिव अनिल नावंदर यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात राज्यातील औषध विक्रेत्यांचे प्रतिष्ठानच्या तपासण्या अन्न व औषध प्रशासनाद्ववारे कायद्यानुसार नियमित केल्या जातात असल्याचं म्हटलं आहे. तसेच दुकानदारांकडून कायद्याचे पालन करताना अनावधानाने होणाऱ्या छोट्या मोठ्या त्रुटींकरता प्रशासनाद्वारे त्यांचे औषध विक्रीचे परवाने काही काळांकरिता निलंबित करणे अथवा कायमस्वरुपी रद्द करणे अशा प्रकारची कारवाई केली जाते.
अन्न व औषध प्रशासनाकडून अनेकवेळा छोट्या छोट्या त्रुटींकरिता औषध विक्रेत्यांना अवाजवी शिक्षा केली जाते. औषधी व सौंदर्य प्रसाधने कायद्यानुसार तरतुदीनुसार अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या कारवाई विरोधात मंत्री महोदयांकडे अपील करण्याची तरतूद कायद्यात असल्यामुळे औषध विक्रेते अपील दाखल करतात. या अपिलावर अनेकवेळा शिक्षेचा संपूर्ण कार्यकाळ संपून गेला तरीही मंत्री महोदयांच्या कार्यालयाकडून अनेक वेळा संपर्क करुन देखील निर्णय दिला जात नाही. यामुळे सभासदांना नाहक शिक्षा भोगावी लागत आहे.
प्रचंड पैशांची मागणी
प्रत्यक्षात औषध विक्रेत्यांना मंत्री महोदय यांचे स्वीय सहाय्यक डाँ. विशाल राठोड,संपत डावखर तसेच चेतन करीडीदेव यांच्याद्वारे प्रचंड पैशांची मागणी केली जात आहे. यापूर्वी या बाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच अन्न व औषध प्रशासन मंत्री महोदयांच्या प्रत्यक्ष भेटून या प्रकाराची कल्पना दिल्यानंतर भ्रष्टाचार कमी होण्याऐवजी आणखी वाढल्याचंच पाहायला मिळत असल्याचंही दि महाराष्ट्र राज्य केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे सचिव अनिल नावंदर यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.