
Mumbai News, 07 Jan : नवीन वर्षाला सुरूवात होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गडचिरोली जिल्ह्यातून कामाची सुरूवात केल्याचा दाखला देत ठाकरेंच्या शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातू खासदार संजय राऊतांनी CM फडणवीसांवर कौतुकाचा वर्षाव केला होता.
मात्र, या अग्रलेखाला चार दिवस पूर्ण व्हायच्या आधीच आता राऊतांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, शेतकरी कर्जमाफी कॅगचा अहवाल या मुद्द्यावरून फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) असो वा शेतकरी कर्जमाफी या दोन्ही बाबतीत सरकार एक नंबरचे खोटारडे आहे अशा शब्दात त्यांनी महायुतीवर निशाणा साधला आहे.
शिवाय सत्ताधाऱ्यांचा बुरखा रोज टराटरा फाटत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या अग्रलेखातून त्यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरण, लाडकी बहीण योजना आणि शेतकरी कर्जमाफीवर भाष्य केलं आहे. त्यांनी लिहिलं की, राज्यातील विद्यमान राज्यकर्त्यांचा बुरखा रोजच फाटतोय. मग ते संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरण असो, लाडकी बहीण योजना असो की शेतकरी कर्जमाफी. प्रत्येक बाबतीत राज्य सरकार रोजच उघडे-नागडे होत आहे.
सरपंच देशमुख हत्याप्रकरणी रोज नवनवीन खुलासे होत आहेत आणि गृहखाते सांभाळणारे मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) ‘तपास सुरू आहे’, ‘कोणालाही सोडणार नाही’ हेच डमरू वाजवीत आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी ही सर्व मंडळी राज्यातील तमाम ‘लाडक्या बहिणीं’चे ‘लाडके भाऊ’ झाले होते. विधानसभा निवडणुकीत या मंडळींना जे यश मिळाले त्यात मोठा वाटा याच लाडक्या बहिणींचा आहे, असे ते मोठ्या तोंडाने सांगत होते.
मात्र आता सत्तेत बसल्यावर यांच्या मोठ्या तोंडाचा चंबू झाला आहे आणि लाडक्या बहिणींना ‘निकषां’च्या चाळणीमध्ये ढकलण्याचे उद्योग त्यांनी सुरू झाले केलेत. या चाळणीतून सुमारे 50 लाख ‘लाडक्या’ बहिणी ‘नावडत्या’ होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच निकषांत न बसणाऱ्या बहिणींना अपात्र ठरवून त्यांच्या खात्यात जमा झालेले पैसे परत सरकारजमा करण्याच्या ‘सावकारी’ला सुरुवात झाली आहे.
धुळे जिल्ह्यातील एका बहिणीला सरकारच्या या घूमजाव धोरणाचा फटका बसला आहे. तिला मिळालेले 7500 रुपये परत सरकारजमा करण्यात आले आहेत. निवडणुकीपूर्वी उफाळून आलेले सत्ताधाऱ्यांचे ‘बंधूप्रेम’ सत्तेत बसताच असे आटत चालले आहे, असं म्हणत राऊतांनी लाडकी बहीण योजनेला लावलेल्या निकषांवरून सरकारवर टीका केली.
तसंत त्यांनी शेतकऱ्यांच्या (Farmer) कर्जमाफीवरूनही या मंडळींनी घूमजाव केल्याचं म्हटलं आहे. "खुद्द राज्याच्या कृषी मंत्र्यांनीच लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर ‘ताण’ पडत असल्याने शेतकऱ्यांनी कर्जमाफी विसरावी, असे जाहीर करून हात वर केले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपने (BJP) आपल्या जाहीरनाम्यात लाडक्या बहिणी, आशा सेविकांपासून शेतकऱ्यांपर्यंत घोषणा आणि आश्वासनांचा पाऊस पाडला होता.
शेतकरी कर्जमाफी देणार म्हणजे देणारच, असा आव भाजपने जाहीरनाम्यात आणला होता. तुमचा तो आव आता कुठे गेला?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पंजाब-हरयाणा सीमेवर कित्येक दिवसांपासून शेतकरी आंदोलन सुरू आहे, पण त्याची दखल घेण्याचेही सौजन्य मोदी सरकारने दाखविलेले नाही. मोदी सरकारच्या महाराष्ट्रातील ‘चेले-चपाटे’ सरकारनेही राज्यातील शेतकऱ्यांच्या तोंडाला पानेच पुसली आहेत.
जाहीरनाम्यात शेतकरी कर्जमाफी देऊ, असे सांगायचे आणि सत्तेत बसल्यावर हात वर करायचे. राज्याची आर्थिक स्थिती नीट नसणे हे सरकार म्हणून तुमचे अपयश आहे. त्याचे खापर लाडक्या बहिणींवर का फोडत आहात? ‘कॅग’नेही ताशेरे ओढले आहेत ते तुमच्या आर्थिक धोरणांवरच. तेव्हा लाडक्या बहिणींच्या नावाने गळा काढत कर्जमाफी नाकारून शेतकऱ्यांचा गळा आवळण्याचे उद्योग थांबवा!
बहिणींना नवीन निकषांचा तर शेतकऱ्यांना लाडकी बहीण योजनेचा बागुलबुवा दाखविणे बंद करा! घोषणांची जुमलेबाजी आणि EVM घोटाळा करून तुम्ही सत्तेत आलात खरे, परंतु लाडक्या बहिणींपासून शेतकरी कर्जमाफीपर्यंतचे तुमचे सगळेच बुरखे काही महिन्यांतच फाटले आहेत. तुम्ही एक नंबरचे खोटारडे आहात, हे जनतेच्या लक्षात आले आहे, अशा शब्दात राऊतांनी (Sanjay Raut) फडणवीस सरकारचा समाचार घेतला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.