
Mumbai News, 17 Dec : महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाल्यापासून ज्या नेत्यांना मंत्रिमंडळात संधी मिळाली नाही त्यांनी उघड नाराजी व्यक्त करायला सुरूवात केली आहे. यामध्ये भाजप नेते सुधीर मुनगंटीवार, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते छगन भुजबळ आणि शिंदेंच्या शिवसेनेचे माजी मंत्री तानाजी सावंत यांच्यासह पुरंदरचे आमदार विजय शिवतारे कमालीचे नाराज झाले आहेत.
या सर्व नेत्यांनी पक्ष नेतृत्वावर उघडपणे नाराजी दर्शवली आहे. महायुतीतील याच सर्व नाराजी नाट्यावर शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी निशाणा साधला आहे. शिवाय नाराजांनी काहीही केलं तरी त्यांच्या नाराजीकडे लक्ष दिलं जाणार नाही. त्यामुळे ते रडून रडून गप्प होतील, असा टोला त्यांनी लगावला आहे.
माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले, "भाजपकडे (BJP) स्वत:चं बहुमत आहे, फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार एकत्र मिळून 225 च्या आसपासचा बहुमताचा खूप मोठा आकडा आहे. त्यामुळे कोणाच्या मनातला अंगार, संताप, असंतोष कितीही बाहेर पडला, तरीही या सरकारला चटके बसतील अशी शक्यता नाही, असं म्हणत त्यांनी नेत्यांच्या नाराजी नाट्यावर भाष्य केलं.
तसंच यावेळी त्यांनी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावरही भाष्य केलं. संजय राऊत म्हणाले, "छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते आहेत. मागील काळात मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात त्यांनी टोकाची भूमिका घेतली होती. त्यावेळी त्यांनी थोडा संयम पाळायला पाहिजे होता, असं आमच्या सर्वांचं म्हणणं होतं. कारण मराठा आणि ओबीसी समाज हे महाराष्ट्रातले प्रमुख घटक आहेत.
सगळ्यांना न्याय मिळावी ही आमची भूमिका असतानाही त्यांनी टोकाची भूमिका घेतली, पण ती भूमिका त्यांना घ्यायला लावली आणि जरांगेंच्या लढ्याला विरोध करण्यासाठी भुजबळांचा पुरेपूर वापर करण्यात आला." याचवेळी त्यांनी नाराज आमदारांच्या नाराजीला आणि रडण्याला काहीही किंमत नसल्याचंही वक्तव्य केलं.
"नाराज आमदार आणि इतर लोकं अश्रू ढाळत आहेत पण त्यांच्या अश्रूंना कोण विचारतं? पुरंदरचे आमदार असो वा मुंबईतले आमदार असोत, किंवा सुधीर मुनगंटीवार असोत त्यांच्या अश्रूंना काय किंमत आहे? एखादा दुसरा आमदार नाराज झाला म्हणून या सरकारला तडा जाईल अशी शक्यता दिसत नाही. त्यामुळे नाराज आमदार काही दिवस रडतील, त्यांना हातात एखादं खेळणं दिलं जाईल, आणि सगळे शांत राहतील असंही राऊत म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.