हिंगोली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटात गेलेले शिवसेनेतील (Shiv Sena) कळमनुरी मतदारसंघातील बंडखोर आमदार संतोष बांगर यांनी खासदार संजय राऊतांवर (Sanjay Raut) जोरदार टीका केली. बहुमत चाचणीवेळी अचानक शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर बांगर यांना जिल्हाप्रमुख पदावरून हटवण्यात आलं. पण त्यानंतर त्यांनी थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनाच आव्हान दिलं. आता त्यांनी काही नेत्यांवर उघडपणे टीका करण्यास सुरूवात केली आहे. (Santosh Bangar Latest News)
हिंगोलीत शिंदे गटाकडून शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या शिवसेना कार्यकर्ता पदाधिकारी मेळाव्यात बांगर यांनी आपली भूमिका स्पष्ट केले. ते म्हणाले, पक्षप्रमुखांच्या आजुबाजूला चांडाळ चौकडी आहे. मला त्यांचं नावही घ्यायचं नाही. नाव घेतलं तर ते मोठे होतील. ते कधीच जनतेतून निवडून आले नाहीत. त्यातील एक नेता मला म्हणायचा, कळमनुरी मतदारसंघात माझी एक पाहुणी आहे. त्यांना मदत करा. हा काय धंदा झाला का, अशी टीका बांगर यांनी राऊतांचा नाव न घेता केली.
अरे मी शिवसेनेचा आमदार, जिल्हाप्रमुख आणि तू आम्हाला म्हणतोस की, काँग्रेसच्या कार्यकर्त्याला मदत करावी लागेल. मी म्हटलं, शिवसेनेच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला मी मदत करीन. राष्ट्रवादी आणि काँग्रेसला बाळासाहेबर ठाकरेंनी आयुष्यभर शिव्या दिल्या. त्यांनी सांगितलं होतं की, मला राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जायची वेळ आली तर माझा पक्ष बंद करून घरात बसेन, असं बांगर म्हणाले. राऊतांनी बांगर यांच्यावर 'सामना'मधून जोरदार टीका करण्यात आली आहे.
मला आपल्या शिवसैनिकांना एकच सांगायचे आहे की, आपण शिवसैनिक आहोत. जो कोणी आपल्याला गद्दार म्हणत असेल त्यांच्या कानाखाली आवाज काढण्याचे काम माझ्या शिवसैनिकाने करावं, असा जोरदार प्रहारही बांगर यांनी केला. त्यामुळे बांगर आता अधिकच आक्रमक झाल्याचे सांगितले जात आहे.
ते पुढे म्हणाले की, आम्ही घाबणारे शिवसैनिक नाही. आमच्या हातात बांगड्या नाहीत. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे कडवट शिवसैनिक आहोत. आम्हाला कोणी आरे म्हंटले तर त्याला कारे नाही तर त्याच्या कानाखाली जाळ काढल्याशिवाय राहणार नाहीत. असे आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे कडवट शिवसैनिक आहोत.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.