Mumbai News : लोकसभा निवडणुकीत चांगले यश संपादन करणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आता आपले लक्ष विधानसभेच्या निवडणुकीकडे केंद्रित केले आहे. विदर्भातील अधिकाधिक जागा घेत त्या कशा पद्धतीने विजयी होतील, याकडे ठाकरे यांनी लक्ष देण्यास सुरूवात केली आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, शरदचंद्र पवार यांच्या मदतीने महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढविणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाने नऊ जागांवर विजय मिळविला आहे.
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील माध्यमातून जागांचे वाटप करताना काँग्रेस, शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पेक्षा अधिक जागा घेत त्या लढविण्याचा ठाकरे सेनेचा प्रयत्न राहणार आहे. विदर्भात अधिकाधिक जागा निवडून आणण्याासाठीची रणनिती उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांनी आखण्यास सुरूवात केली आहे. यासाठी गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांच्याकडे पूर्व विदर्भाची जबाबदारी देण्यात आली आहे.
ठाकरे गटाचे आमदार जाधव यांच्याकडे विदर्भाचे संपर्कप्रमुखपद देण्यात आलेले आहे. पद आल्यानंतर आमदार जाधव यांनी पूर्व विदर्भातील मतदारसंघांचा आढावा त्यांनी घेतला आहे. स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत त्यांच्याकडून माहिती घेण्यास जाधव यांनी सुरूवात केली आहे. यापूर्वी शिवसेनेची भाजपसोबत युती होती. त्यावेळी ज्या जागा शिवसेनेने लढविल्या होत्या, त्यावर सध्या लक्ष केंद्रित करण्यात आलेले आहे. तसेच महायुतीच्या माध्यमातून विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाताना या निवडणुकीत ज्या मतदारसंघात भाजप, शिंदेसेनेचे उमेदवार असतील, त्या जागा मित्र पक्षाकडून मागून घेत त्या जागांवर लढण्याची तयारी ठाकरे सेनेच्या वतीने केली जात आहे.
शिवसेनेच्या वतीने 1990 साली पहिल्यांदाच मुंबईच्या बाहेर निवडणुका लढविण्यात आल्या. 1995 मध्ये शिवसेनेने सर्वाधिक जागा निवडून आणल्या होत्या. त्यानंतर भाजपने राजकारण करत शिवसेनेच्या जागा कमी केल्या. मित्र पक्ष असल्याचा गैरफायदा घेत भाजपने शिवसेनेची ताकद कमी करत आयती संधी साधली, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली. मात्र या निवडणुकीत भाजप (BJP) आणि शिंदे यांच्या शिवसेनेला चांगलाच धडा शिकविण्याचा निर्धार ठाकरे यांच्या शिवसेनेने केले आहे. पूर्व विदर्भातील 28 जागांची जबाबदारी माझ्याकडे देण्यात आली आहे. यातील 12 जागांवर भाजपचे आमदार आहेत. भंडारा, रामटेकचे अपक्ष आमदार शिंदेंसोबत आहेत. सध्यस्थिती पाहता आम्हाला विदर्भात विस्ताराची संधी असल्याचे जाधव यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.