Baba Siddique Murder : 'हे तर गुंडांचे 'शेणापती''; CM शिंदे आणि DCM फडणवीसांची खरडपट्टी

ShivSena mouthpiece criticized the mahayuti government over the murder of NCP leader MLA Baba Siddique and increasing crime: शिवसेनेचा मुखपत्रातील अग्रलेखातून राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी आणि महाराष्ट्रातील वाढत्या गुन्हेगारीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर शेलक्या शब्दात निशाणा साधला आहे.
Baba Siddique
Baba Siddiquesarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार बाबा सिद्दिकी यांची मुंबईत हत्या झाल्यानंतर राज्यातील शांतता-सुव्यवस्थेवरून चर्चेचं गुऱ्हाळ सर्वत्र रंगलं आहे. महायुती सरकारच्या गृह मंत्रालय, मुंबई पोलिस आणि राज्य इंटेलिजन्सच्या कारभाराचे वाभाडे निघू लागलेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

यातच शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'मधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शेलक्या शब्दात निशाणा साधण्यात आला आहे. 'हे तर गुंडांचे 'शेणापती'', अशा अग्रलेखातून खरडपट्टी केली आहे.

राष्ट्रवादीचे (NCP) नेते आमदार बाबा सिद्दिकी यांची मुंबईत गोळ्या घालून हत्या झाली. सत्ताधारी पक्षातील आमदाराची त्यांच्याच कार्यालयासमोर हत्या होते, यावरून संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये राज्यात गुन्हेगारीचा आलेख देखील वाढत आहे.

यावरून विरोधक, विशेष करून महाविकास आघाडीकडून महायुती सरकारवर सातत्याने टीका होते. परंतु सत्ताधारी पक्षातील आमदाराची गोळ्या घालून हत्या होतो, आमदार सुरक्षित नाही, तर तिथं सर्वसामान्य सुरक्षित कसा असेल, हा प्रश्नच आहे. याच मुद्यावरून महायुती सरकारवर चारही बाजूनं घेरलं गेलं आहे.

Baba Siddique
Baba Siddique Shot Dead : शार्प शूटर धर्मराजच्या वकिलाचा डाव फसला; मुंबई न्यायालयाकडून गंभीर दखल

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचा काल मुंबईत मेळावा झाला. राज ठाकरे यांनी या मेळाव्यात राज्यातील गुन्हेगारीची आकडेवारी मांडत सरकारला 'हाच का समृद्ध महाराष्ट्र?', असा प्रश्न केला. शिवतीर्थावर शिवसेना (ShivSena) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दसरा मेळावा झाल्या आणि काही क्षणात राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची बातमी समोर आली. यावर शिवसेनेचे मुखपत्र सामनातील अग्रलेखातून महायुती सरकारमधील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे.

Baba Siddique
Political Horoscope MNS : आगामी निवडणुकीत 'मनसे'ची आमदारसंख्या वाढणार? काय सांगते पत्रिका

अग्रलेखाचं शीर्षक 'गुंडांचा 'शेणापती'' असं दिलं आहे. राज्याचा राजाच गुंडांचा 'शेणापती' म्हणून काम करत असेल, तर ते राज्य सुरक्षित व सुसंस्कृत कसे राहणार? महाराष्ट्र राज्याचा लौकिक उत्तम प्रशासन व कायदा–सुव्यवस्थेबाबत होता. आज त्या लौकिकाचा मनोरा कोसळून पडला आहे.

मुख्यमंत्री मिंधे यांनी आधी पोलिस खात्याचे गुन्हेगारीकरण केले, त्याच गुन्हेगारांना बळ देऊन राजकारण सुरू केले. आता संपूर्ण मुंबई, महाराष्ट्रावर गुन्हेगारांचे राज्य सुरू झाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना या स्थित्यंतराचा सर्वाधिक आनंद झाला असेल.

त्यांना हवे तसेच मुंबईत घडत आहे. गुंडांच्या शेणापतीस महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याच्या सत्तेवर बसवून शाह यांनी महाराष्ट्रावर सूड उगवला आहे. आता काय करायचे?, असा सवाल अग्रलेखातून करण्यात आला आहे.

मुंबई शहर हत्या व खंडण्यांनी हादरले

महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेचे साफ धिंडवडे निघाले आहेत. खून, खंडणी, भ्रष्टाचार आणि महिलांवरील अत्याचार यामुळे महाराष्ट्र बदनाम झाला आहे. माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची शनिवारी रात्री भरगर्दीत पोलीस बंदोबस्तात हत्या झाली.

मुंबई शहर या खुनामुळे हादरले आहे. सगळ्यांच्याच मनात आपण असुरक्षित असल्याची भावना निर्माण झाली आहे. मुख्य म्हणजे मिंधे-फडणवीस सरकारने मुंबईला दोन-दोन पोलिस आयुक्त नेमले आहेत, तरीही जनतेची सुरक्षा वाऱ्यावर आहे व दिवसाढवळ्या रस्त्यांवर मुडदे पाडले जात आहेत. मागच्या चार दिवसांत मुंबईत 17 हत्या झाल्या. मुंबई शहर हत्या व खंडण्यांनी हादरले आहे. हे हादरे मुख्यमंत्र्यांना बसत नाहीत, अशी टीका अग्रलेखातून करण्यात आली आहे.

राज्याच्या सुरक्षेचे धोतर सुटलंय

बदलापूरच्या बलात्कार कांडातील आरोपी अक्षय शिंदे याचे एन्काऊंटर पोलिसांनी केले. त्यानंतर मुख्यमंत्री मिंधे व गृहमंत्री फडणवीस यांनी स्वतःला ‘सिंघम’ म्हणून घोषित केले. त्या दोन्ही सिंघमची ऐशी की तैशी करत गुंडांनी मुंबईचा ताबा घेतला आहे.

बाबा सिद्दिकी हे राज्याचे मंत्री होते. अनेक वर्षे नगरसेवक, आमदार व मंत्रीपदी राहिलेली व्यक्ती एका सिनेअभिनेत्याशी त्याची मैत्री आहे म्हणून मारली जात असेल, तर ते मिंधे सरकारचे अपयश आहे.

पोलिस यंत्रणा राजकीय वाळवीने व भ्रष्टाचाराने पोखरली आहे. मुंबई-ठाण्यातील 75 टक्के पोलिस बळ हे गद्दार आमदार, खासदार व त्यांच्या समर्थकांच्या सुरक्षेसाठी लावले गेले आहे. त्यामुळे मुंबईचे व राज्याच्या सुरक्षेचे धोतर सुटल्याचे अग्रलेखात म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com