
Mumbai News : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा महायुतीने धुव्वा उडवला. महायुती सरकारचा पाच डिसेंबरला शपथविधी होईल. यानंतर नागपूर हिवाळी अधिवेशन होईल. यातच राज्यात रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत केंद्रभागी असेल, ती मुंबई महापालिकेची निवडणूक. ही ताब्यात घेण्याची तयारी भाजप महायुतीने सुरू केली आहे. हेच हेरत उद्धव ठाकरे देखील कामाला लागले आहेत. यासाठी मुंबई महापालिकेतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेवकांची बैठक बोलावत आढावा घेतला. या बैठकीत अनेक राजकीय मुद्यांवर चर्चा झाली असून, विशेष करून भाजपच्या रणनीतीवर देखील चर्चा झाली.
विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचे सरकार स्थापनेचे सत्ता नाट्य रंगले आहे. शपथविधी सोहळ्याच्या तयारी महायुतीत भाजपचाच पुढाकार आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आजारी असल्याने शिवसेना पुरती या सोहळ्यापासून दूर दिसते. या सर्व राजकीय घडामोडी होत असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवकांची बैठक मातोश्रीवर घेतली. या बैठकीला झालेल्या राजकीय चर्चेला महत्त्व आलं आहे. उद्धव ठाकरे यांनी नगरसेवकांना मार्गदर्शन करताना भाजप एकनाथ शिंदे यांचा राजकीय सत्ता काबीज करण्यासाठी कसा वापर करून घेत आहे, यावर भाष्य केले. उद्धव ठाकरे यांचा हा खळबळजनक दाव्याची आता चर्चा रंगली आहे.
महायुतीमध्ये सत्तास्थापनेचा तिढा सुरू आहे, खेळ सुरू आहे, त्यातील काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेला दिल्लीतील भाजपचे काही नेते रसद पुरवत आहेत, असल्याचा खळबळजनक दावा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला. महापालिका निवडणुकी होईपर्यंत भाजप एकनाथ शिंदे यांचे संपूर्ण लाड पुरवतील, त्यांना गोंजारले जाईल. विशेष करून मुंबई महापालिकेसाठी एकनाथ शिंदे यांचे सर्व हट्ट पुरवले जातील. भाजपचे साध्य पूर्ण झाल्यावर जे करायचे आहे, ते भाजप बरोबर करेल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रणनीती आव आणून भाजपने वेगवेगळ्या यंत्रणा या निवडणुकीत राबवल्या असल्याचा गौप्यस्फोट उद्धव ठाकरे यांनी केला.
"आरएसएस विधानसभा निवडणुकीत फक्त पत्रक वाटत होती. भाजपने वेगवेगळ्या एजन्सी राबवून ही सत्तेचा खेळ केला. आता राज्यात एकनाथ शिंदे यांच्या राजकीय हालचालीमागे दिल्लीतील भाजपची मोठी शक्ती कार्यरत आहे. भाजपला मुंबई जिंकायची आहे. यासाठी आता ते एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून पुरेपूर प्रयत्न करतील", असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून लवकरच राज्यातील पदाधिकाऱ्यांचे शिबिर बोलावण्यात येणार आहे. तसेच मुंबईतील गटप्रमुखांचे देखील शिबिर होईल. महाविकास आघाडीच्या माध्यमातून ही निवडणूक लढवली जाईल, असे संकेत उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघातील 227 प्रभागात तयारीला सुरवात करा, असा आदेश दिला आहे. विनायक राऊत, अनिल परब, मिलिंद नार्वेकर, वरुण सरदेसाई, सुनील राऊत, बाळा नर, सुनील शिंदे, अमोल कीर्तिकर यांच्यासह एकूण 18 जणांची टीम प्रत्येकी दोन विधानसभेतील बारा प्रभागांचा आढावा घेईल. पुढील आठवडाभरात हा अहवाल तयार करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सोपवला जाईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.