रिफायनरी' बाबत शिवसेनेचा दुटप्पी खेळ : प्रमोद जठार 

शिवसेनेच्या उद्योगमंत्र्यानी एमआयडीसीच्या माध्यमातून जागा खरेदीची अधिसूचना काढली. तत्पूर्वी आपल्याच बगलबच्चांना तिथल्या जागा विकत घ्या, असे सांगण्यात आले; मात्र आज ही मंडळी रिफायनरीला समर्थन करत असल्याचे राऊतांकडून त्यांना दलाल असे संबोधले जात आहे.
Pramod Jathar and Vinayak Raut
Pramod Jathar and Vinayak Raut

कणकवली : एकीकडे नाणार रिफायनरी प्रकल्पाला विरोध करायचा आणि दुसरीकडे त्याच रिफायनरी कंपनीकडून पैसे घेऊन जाहिराती छापायच्या असा दुटप्पी खेळ शिवसेनेकडून सुरू आहे. कोरोना महामारीत कोकणातील हजारो युवक बेरोजगार झाले आहेत. त्यांच्यासाठी रिफायनरी प्रकल्प ही सुवर्णसंधी आहे; पण शिवसेना आणि खासदार राऊत यांना इथे रोजगार निर्माण करायचे नाहीत असेच दिसते, अशी टीका भाजपचे प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांनी केली आहे.

श्री.जठार म्हणाले, रिफायनरी प्रकल्पाबाबत खासदार विनायक राऊत आणि शिवसेनेची मंडळी डबलगेम खेळत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे स्थानिकांना प्रकल्प हवा असेल तर त्याला आमचा विरोध नसेल अशी भूमिका घेत आहेत.

या उलट नाणार प्रकल्पाला पाठिंबा देणाऱ्या शिवसैनिकांना चप्पलांनी बडवुन काढण्याची धमकी खासदार राऊत देत आहेत. एवढेच नव्हे तर नाणारला पाठिंबा देणाऱ्या शिवसैनिकांना पक्षातून निलंबित केले जात आहे.  श्री. जठार म्हणाले, शिवसैनिक म्हणजे स्थानिक जनता नव्हे का? शिवसेनेच्या उद्योगमंत्र्यानी एमआयडीसीच्या माध्यमातून जागा खरेदीची अधिसूचना काढली.

तत्पूर्वी आपल्याच बगलबच्चांना तिथल्या जागा विकत घ्या, असे सांगण्यात आले; मात्र आज ही मंडळी रिफायनरीला समर्थन करत असल्याचे राऊतांकडून त्यांना दलाल असे संबोधले जात आहे. विरोधासाठी विरोध म्हणून चक्‍क दीड लाख रोजगार निर्मिती करणाऱ्या उद्योगालाच विरोध करणे म्हणजे पुढील अनेक पिढयांचे नुकसान करण्यासारखे आहे. एवढ्या मोठ्या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या राऊतांनी आपण कोकणचा लोकप्रतिनिधी म्हणवून घेणे खरोखरच शोभते का? हे आधी स्वतःच्या मनाला विचारावे.

खासदारांनी राजीनामा द्यावा...
७० गावांची देवगड पंचायत समिती पाठिंब्याचा ठराव पास करते, तर खासदार महोदय लोकमताचा आदर करण्याऐवजी एका गावातील छोट्या वाडीत जाऊन मुठभर लोकांना प्रकल्पाविरोधात भडकवत फिरत आहेत. राऊत यांना रोजगार देणारा उद्योग नको असेल तर त्यांनी ताबडतोब खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि पुन्हा निवडणुकीला सामोरे जाऊन "नाणार'ला स्थानिकांचा पाठिंबा आहे की नाही, ते पहावे, असेही आव्हान श्री. जठार यांनी दिले आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com