

KDMC News : कल्याण फाटा चौकातील नवीन सिग्नल यंत्रणेच्या उद्घाटनावरून भाजप आणि शिवसेना शिंदे गटात रंगलेल्या श्रेयवादाला आता राष्ट्रवादी काँग्रेसने लक्ष्य केले आहे. विशेष म्हणजे, दोन वेळा उद्घाटन झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सिग्नल बंद असल्याचा दावा करत राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष जीवन वालीलकर यांनी दोन्ही पक्षांच्या नेत्यांना टोला लगावला आहे.
कल्याण फाटा चौकात नवीन सिग्नल यंत्रणा बसवण्यात आली आहे. या यंत्रणेच्या उद्घाटनावरून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत श्रेयवाद पाहायला मिळाला. शिवसेनेचे आमदार राजेश मोरे यांनी सिग्नलचे उद्घाटन केल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी भाजप नेते आणि माजी आमदार सुभाष भोईर यांनीही उद्घाटन केले. त्यामुळे राजकीय वर्तुळात या उद्घाटनाची चांगलीच चर्चा रंगली होती.
दरम्यान, आता सिग्नल यंत्रणा बंद असल्याचा मुद्दा पुढे करत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष जीवन वालीलकर यांनी दोन्ही पक्षांवर निशाणा साधला आहे. पत्रकारांशी बोलताना वालीलकर म्हणाले, "उद्घाटन झालं, मात्र सिग्नल बंद अवस्थेत आहे. जी यंत्रणा अद्याप जनतेसाठी सुरू झालेली नाही, तिच्या उद्घाटनासाठी दोन्ही पक्षांना एवढी घाई का झाली? अगोदर सिग्नल यंत्रणा सुरू करा आणि त्यानंतर सकाळी किंवा संध्याकाळी उद्घाटन करा."
केवळ फोटोसेशन आणि श्रेय घेण्यासाठी उद्घाटन करण्यात आल्याचा आरोप करत, दोन्ही पक्षांकडून जनतेच्या डोळ्यात धूळफेक केली जात असल्याचे वालीलकर यांनी म्हटले. या श्रेयवादामुळे १४ गावांचीही खराब अवस्था झाल्याचा आरोप त्यांनी केला.
मनसेचे डोंबिवली शहरप्रमुख हर्षद पाटील यांनीही बंद सिग्नलचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत राजकीय नेत्यांना सवाल केला आहे. "काल दोन वेळा उद्घाटन झालेला कल्याण फाटा सिग्नल आज बंद का? उद्घाटनाचा एवढा थाटमाट, मग दुसऱ्याच दिवशी सिग्नल बंद का? फोटोसेशन आणि श्रेयवादापेक्षा नागरिकांना सुरळीत वाहतूक आणि कायमस्वरूपी सुविधा कधी मिळणार?" असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला आहे.
उद्घाटनाच्या श्रेयवादानंतर आता सिग्नलच्या कार्यक्षमतेवरून सुरू झालेल्या या राजकीय आरोप-प्रत्यारोपामुळे कल्याण फाटा चौक पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.