

Election process update : महापालिका निवडणुकीसाठी दोन दिवस उरलेले असतानाच राज्य निवडणूक आयोगाने इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांवरील (EVM) मॉकपोलमध्ये मोठा बदल केला आहे. हाच निर्णय जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये लागू होण्याची शक्यता आहे. आयोगाने दोन दिवसांपूर्वीच एका आदेशाच्या माध्यमातून मॉकपोलची माहिती दिली होती. आता या आदेशासह मे २०१७ मधील याबाबतचा आदेशही रद्द केला असून सुधारित आदेश काढला आहे.
आयोगाकडून सोमवारी सर्व विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना हा आदेश देण्यात आला आहे. आयोगाच्या यापूर्वीच्या आदेशानुसार मतदान यंत्र सज्ज करण्यापूर्वी (कँडिडेट सेटिंग किंवा कमिशनिंग ऑफ ईव्हीएम करण्यापूर्वी) वापरण्यात येणाऱ्या एकूण मतदान यंत्रांच्या १० टक्के मतदान यंत्रात किमान एक हजार मते नोंदवून मॉकपोल करणे बंधनकारक होते. आता त्यामध्ये बदल करण्यात आला आहे.
आयोगाच्या सुधारित आदेशानुसार, मतदान यंत्रे तयार करताना बॅलेट युनिटवर जितके उमेदवार सेट करण्यात आले असतील (नोटासहीत) तितक्या उमेदवारांसमोरील वापरात येणारे प्रत्येक बटण (नोटा बटणासहित) किमान दोन वेळा दाबून ते बटण व्यवस्थित सुरू असल्याची खात्री करण्यात येईल. तसेच या प्रक्रियेत उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी यांनाही सहभागी करून घेण्यास सांगण्यात आले आहे.
या प्रक्रियेमध्ये मत नोंदविल्यानंतर टोटल बटण दावून मतदानाची एकूण संख्या पाहिली जाईल. त्यानंतर क्लोज बटण आणि नंतर रिझल्ट बटण दावून निकाल पाहण्यात येईल. सर्वात शेवटी क्लिअर बटण दाबून नोंदविलेल्या मतदानाची आकडेवारी शून्य करण्यात येईल. याशिवाय मतदान यंत्रे तयार करण्यावेळी वापरात नसलेली इतर सर्व बटणे व शेवटचे End बटण व्हाईट मास्किंग टॅबने बंद करण्याचे आदेश आयोगाकडून देण्यात आले आहेत. हे पहिले मॉकपोल असेल.
उमेदवारांसाठी अलर्ट
मतदान यंत्र तयार करताना उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी वेळेवर उपस्थित नसतील तरीही विहित केलेल्या वेळी त्यांच्या अनुपस्थितीत मतदान यंत्र तयार करण्याची कार्यवाही सुरू करावी. मात्र कोणत्याही परिस्थितीत मतदान यंत्र तयार करण्याची प्रक्रिया पुढे ढकलू नये, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.
मतदानादिवशी काय होणार?
मतदानाच्या दिवशी प्रत्यक्ष मतदान केंद्रात सकाळी ६.३० वाजता मॉकपोल, उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी किंवा मतदान प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत करण्यात येईल. ते उपस्थित नसले तरी मॉकपोल थांबविले जाणार नाही. मॉकपोलवेळी सर्व उमेदवारांना (नोटासहित) किमान दोन मते देण्यात येतील, म्हणजे प्रत्येक बटण किमान दोनवेळा दाबून व्यवस्थित सुरू असल्याची खात्री केली जाईल.
कँडिडेट सेटिंग करण्यापूर्वी करण्याचे मॉकपोल आणि प्रत्यक्ष मतदान केंद्रांवर करण्याचे मॉकपोलच्या नोंदी ठेवल्या जातील. पहिल्या मॉकपोलचे संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंग जतन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मॉकपोलची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच मतदान यंत्रे सील केली जातील, असे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.