
MNS News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मान्यता रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाली आहे. त्याचप्रमाणे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह इतर नेत्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणीही या याचिकेत करण्यात आली आहे. दरम्यान, या याचिकेनंतर मनसे नेत्यांकडून आता निर्वाणीचा इशारा देण्यात आला आहे.
कुणी केली याचिका?
मुंबईतील सुनिल शुक्ला यांनी ही याचिका दाखल केली आहे. ते उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष असून राजकीय पक्ष म्हणून त्यांना केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मान्यताही मिळाली आहे. वकील श्रीराम पराक्कट यांच्याकरवी शुक्ला यांनी याचिका दाखल केली आहे.
काय म्हटलंय याचिकेत?
शुक्ला यांनी याचिकेत दावा केला आहे की, मागील काही महिन्यांपासून आपल्याला धमक्या येत असून त्रास दिला जात आहे. उत्तर भारतीयांसाठी लढत असल्याने धमक्या दिल्या जात आहेत. राज ठाकरे यांच्या भडकावू भाषणांमुळे हिंदी भाषिकांवर हल्ले होत आहेत.
शुक्ला यांनी याचिकेत राज ठाकरे यांच्या गुढीपाडवा मेळाव्यातील भाषणाचा संदर्भ दिला आहे. या भाषणामुळे मॉल, बँक आदी ठिकाणी नोकरी करणाऱ्या उत्तर भारतीयांवर मराठी बोलत नसल्याने हल्ले होत आहेत. या भाषणानंतर मुंबईत काही ठिकाणी हल्ले झाल्याचे शुक्ला यांनी याचिकेत म्हटले आहे.
आपल्याला शंभरहून अधिक धमक्यांचे फोन आल्याचा दावाही शुक्ला यांनी केला आहे. ता. 6 ऑक्टोबर 2024 रोजी मनसेशी संबंधित जवळपास 30 जण पक्षाच्या कार्यालयात आले होते. त्यांनी कार्यालयात तोडफोड करण्याचा प्रय़त्न केला. याबाबत मुख्यमंत्री, पोलिसांकडे तक्रार केली. गुन्हा दाखल करण्याची तसेच संरक्षणाची मागणी केली होती, असा दावाही शुक्ला यांनी याचिकेत केला आहे.
राज्य पोलिसांना आपल्याला संरक्षण देण्याची आणि संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी शुक्ला यांनी याचिकेत केली आहे. त्याचप्रमाणे मनसेची मान्यता रद्द करण्याबाबत निवडणूक आयोगाला आदेश द्यावेत, भडकावू भाषणे, हल्ल्यांचा तपास करण्याबाबत एसआयटी नेमण्याचे आदेश द्यावेत, त्याचप्रमाणे राज ठाकरेंना हेट स्पीच न देण्याबाबत आदेश देण्याची मागणीही शुक्ला यांना याचिकेत केली आहे.
मनसे नेते आक्रमक
याचिकेनंतर मनसेचे नेते संदीप देशपांडे आक्रमक झाले असून त्यांनी निर्वाणीचा इशारा दिला आहे. कुठला तरी भैय्या म्हणे कोर्टात गेला आहे की, मनसेची मान्यता रद्द करावी. मराठी माणसाचा पक्ष बंद व्हावा म्हणून भैय्ये प्रयत्न करणार असतील तर भैय्यांना मुंबईत, महाराष्ट्रात राहू द्यायचं का, यावर विचार करावा लागेल, असा इशारा देशपांडे यांनी सोशल मीडियातून दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.