

सचिन फुलपगारे
Uddhav Thackeray News : नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील महायुती सरकार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. हे एक फूल दोन हाफचे सरकार आहे. राज्य सरकारमध्ये एकूणच गोंधळाची स्थिती असून, राज्याचं आरोग्य खातं हे विभागलं गेलं आहे. नेमके कुठल्या खात्याचे कोण मंत्री आहेत? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
कोरोनाच्या काळात कुठेही औषधांचा तुटवडा नव्हता. आज कुठलीही साथ नाही, पण साथ आहे ती भ्रष्टाचाराची. आरोग्य खात्यातील पदांसाठी रेट कार्ड ठरवलं गेलं आहे, असं कानावर आलं आहे. औषध खरेदीची निविदा प्रक्रिया बंद होणार आहे; मग हे लोक कोणत्या तोंडाने भ्रष्टाचारावर बोलणार? निविदा प्रक्रियेशिवाय औषध खरेदी म्हणजे सरळ सरळ भ्रष्टाचाराला दार उघडून देत आहात. जिथे औषध खरेदी झालेली नाही किंवा पोहोचली नाही, यात दलाल बसले आहेत का? याची 'सीबीआय' चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.
युती सरकारच्या काळात खेकड्यांमुळे धरण फुटलं होतं. आता खेकड्यांच्या हातात भ्रष्टाचाराचा कारभार गेला आहे का? धरणं फोडून भ्रष्टाचाराचं पाणी वळलं जातंय का? असे सवाल करत उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला घेरलं आहे. नुसतं मृतांच्या नातेवाइकांना मदत देऊन भागणार नाही. ज्यांचा जीव गेला, त्यांचा जीव परत कुणी आणू शकत नाही, असंही ते म्हणाले.
हे खोके सरकार आहे. यांच्याकडे स्वतःच्या जाहिराती करायला पैसे आहेत. गुजरात अन् गुवाहाटीला जाऊन मजामस्ती करायला यांच्याकडे पैसे आहेत. गोव्यात जाऊन टेबलावर नाचायला यांच्याकडे पैसा आहे. पण महाराष्ट्रातील रुग्णांचे जीव वाचवायला या सरकारकडे पैसे नाहीत. या सरकारची निष्पक्ष सीबीआय चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
हे सरकार आता लवकरात लवकर घालवलं पाहिजे. कारण यांच्या या भ्रष्ट कारभारामुळे लोकांचा बळी जात आहे. आणि आता जनतेने जागं झालं पाहिजे, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.