

Mumbai, 29 November : मतदारसंघ पुनर्रचनेवर (डिलिमिटेशन) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली. ती मांडताना त्यांनी डिलिमिटेशनला जोरदार विरोध दर्शविला. मतदारसंघ पुनर्रचना समितीवर विशेषतः वादग्रस्त निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या नियुक्तीवर ठाकरेंनी आक्षेप नोंदविला आहे. या समितीत निवृत्त न्यायमूर्ती अभय ओक यांना का घेत नाही, असा सवाल करत ठाकरेंनी एक प्रकारे समितीत ओक यांच्यासारख्या न्यायमूर्तींची नियुक्ती असायला हवी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डिलिमिटेशन बिलाबाबत आज मातोश्रीवर पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी ज्ञानेशकुमार आणि डिलिमिटेशन समितीवर जोरदार आक्षेप नोंदविले. ते म्हणाले, मतदारसंघ पुनर्रचना ठरविण्यासाठी जी समिती असणार आहे, ती तिघांची असणार आहे.
या समितीत केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायायाधीश एक असणार आहेत. न्यायाधीश कोण असणार? त्यांना कोणी निवडले.? त्यांना निवडण्याचा अधिकार कोणाचा? असा सवाल करतानाच अर्थातच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा असणार, हेही ठाकरेंनी स्पष्ट केले.
ज्ञानेशकुमार हा भाजपचाच माणूस आहे. निवृत्त न्यायाधीश हेही त्यांच्याच विचाराचे असणार आहेत. तिसरा सदस्य ज्ञानेशकुमार निवडणार आहेत. यामुळे समितीत विरोधी मतच व्यक्त केले जाणार नाही, त्यामुळे ही समिती नुसता फार्स आहे. मतदारसंघ पुनर्रचना कशी करायची, याची स्क्रीप्ट आजच तयार आहे. ही स्क्रीप्ट दोन-चार दिवस घेऊन त्यावर सह्या ठोकून जनतेसमोर आणायची, एवढंच या समितीचं काम आहे, असा दावाही उद्धव ठाकरे यांनी केला.
ते म्हणाले, मुळात ही समितीच चुकीची आहे. या समितीत कोण कोण असायला पाहिजे. निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीच्या प्रक्रियेतून सरन्यायाधीशांना काढून टाकलं. त्याच्याऐवजी एक मंत्री घेतला. त्यामुळे त्या समितीत पंतप्रधान, केंद्रीय मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्री आणि विरोधी पक्षनेता यांचा समावेश आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेत्यांचं म्हणणंच ऐकून घेतलं जात नाही.
मतचोरीचा आरोप असणाऱ्यांना या समितीत घेतलं आहे. निवृत्त न्यायाधीशांना घेतलं म्हणजे आमचं समाधान होणार नाही. निवृत्त न्यायाधीश कोण आहेत? त्यात माजी न्यायमूर्ती अभय ओक यांना का घेत नाही? ओक यांच्यासारखे निःस्पृह, निःस्वार्थी, देशहिताची चाड आणि आपुलकी असणाऱ्या निवृत्त न्यायमूर्तीचं नाव घ्यावं. पण असं काही नाव घेतल्याचे ऐकवित नाही. त्यांचं मम म्हणणाऱ्या निवृत्त न्यायाधीशांचं नाव घेतलं जाईल, असेही ठाकरेंनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.