

Mumbai News: लोकसभा आणि विधानसभेनंतर महाराष्ट्रात आता सुमारे गेल्या 5 वर्षांपासून रखडलेल्या महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणुकांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांसह सर्वच राजकीय पक्षांनी जोर लावला आहे. अशातच मुंबई महापालिका निवडणुकीसाठी पहिल्यांदाच शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)मनसे युती जवळपास निश्चित मानली जात आहे. अशातच आता माजी मुख्यमंत्री व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) भाजप,एकनाथ शिंदेसह स्वबळासाठी आग्रह असलेल्या काँग्रेसलाही मोठा धक्का देण्याची तयारी सुरू केली आहे.
शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदाच मुंबई महापालिका निवडणुकीला सामोरे जात असलेल्या उद्धव ठाकरे आता मुंबईत आणखी एक मोठा डाव टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. भाजप आणि एकनाथ शिंदेंसह काँग्रेसचाही हिशेब चुकता करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि शिवसेना पूर्ण ताकदीसह मैदानात उतरण्याची शक्यता आहे.
मराठीचा मुद्दा पुढे करत उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपलं राजकीय भांडण मिटवून घेत युतीचे संकेत दिले आहेत. मुंबईसह इतरही काही निवडणुकांमध्ये मनसे शिवसेना युती निश्चित मानली जात असून अधिकृत शिक्कामोर्तब होणं बाकी आहे. आता या सगळ्या घडामोडी सुरू असतानाच दुसरीकडे उद्धव ठाकरे मनसे नंतर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीआधी प्रकाश आंबेडकरांशी हातमिळवणी करण्यासाठी पुढाकार घेतल्यानंतरही शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी शेवटच्या टप्प्यात फिसकटली होती.पण आता शरद पवारांसह प्रकाश आंबेडकरांच्या वंचितलाही ठाकरे सोबत घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
पण सध्यातरी उद्धव ठाकरेंची शिवसेना,शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस,आणि राज ठाकरेंची मनसे यांची मुंबई महापालिका निवडणुकीसाठी युती होण्याची दाट शक्यता आहे.महाविकास आघाडीतील मनसेच्या एन्ट्रीला जोरदार विरोध केलेल्या काँग्रेसला पवारांनी खडेबोल सुनावले होते. म्हणून भाजप,एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) शिवसेनेसह काँग्रेसचाही हिशेब चुकता करण्यासाठी उद्धव ठाकरे आता इरेला पेटले आहेत.
मनसेसोबतची युती अंतिम टप्प्यात असून काही जागांमुळेच तिची अधिकृत घोषणा बाकी आहे. उद्धव ठाकरेंनी आता या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षालाही आपल्या कोट्यातून जागा देण्याची तयारी उद्धव ठाकरेंनी तयारी दर्शवली आहे.
संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या मनसे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये जागावाटपावरुन चर्चा सुरु आहे. मात्र, दोन्ही पक्षांमधील युतीची गाडी जागावाटपाच्या चर्चेत 15 जागांवरुन अडली असल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई महापालिकेमध्ये युती करण्यासाठी जी जागावाटपाची चर्चा सुरु आहे त्यामध्ये 15 जागांवर दोन्ही पक्षांनी दावा केला आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे दुसऱ्या फळीतील नेत्यांदरम्यान सुरु असलेल्या मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेने संदर्भातील चर्चांमधून काही तोडगा निघाला नाही, तर स्वत: दोन्ही पक्षप्रमुखच जागांचा तिढा सोडवणार असणार असल्याचं बोललं जात आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसेतील जागावाटप ठाणे महापालिकेत 90 टक्के, मीरा-भाईंदरमध्ये 95 टक्के, वसई-विरारमध्ये 90 टक्के, कल्याण-डोंबिवलीमध्ये 85 टक्के निश्चित झाल्याचं सांगितलं जात आहे. माहिती मिळत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.