
Mumbai News : शिवसेनेतील उभ्या फुटीनंतर उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला सामोरे गेले. या निवडणुकीत महाविकास आघाडी सरकार ज्यांच्यामुळे कोसळलं त्या एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदार आणि भाजपविरोधात ठाकरेंनी दंड थोपटलं होतं. लोकसभेला मिळालेल्या यशानंतर तर उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) टीकेची धार आणखी तीव्र झाली. पण विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत तब्बल 95 जागा लढवलेल्या ठाकरेंना जेमतेम 20 जागा मिळाल्या.
महायुतीच्या त्सुनामीसमोर महाविकास आघाडीची वाताहत झाली. या पराभवानंतर आघाडीच्या नेतेमंडळींकडून ईव्हीएमवर (EVM) शंका उपस्थित केली जात आहे. याचवेळी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर आता राज्यातील प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांनी मोठं विधान केलं आहे. त्या म्हणाल्या,जर आगामी महापालिकांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घेतल्या नाहीत तर आम्ही निवडणुकीवर बहिष्कार घालू,असा इशारा अंधारेंनी दिला आहे.
एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात त्यांच्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपला मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडला.त्यांनी भाजपचं केंद्रीय नेतृत्व महायुतीच्या मुख्यमंत्रिपदाबाबत जो काही निर्णय घेईल तो मान्य असेल असं स्पष्ट केलं. तसेच आपल्याला इतर कुठल्या पदांपेक्षा लाडक्या बहिणींचा सख्खा लाडका भाऊ हे पद मोठं वाटतं असंही त्यांनी म्हटलं.यावर आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाष्य केलं.
अंधारे म्हणाल्या, एकनाथ शिंदेंना इगो होता.आता ते भाजपनं उपकार केल्याचं सांगतात.माझी मुख्यमंत्री पदाची कुवत नव्हती,विश्वासघाताच्या राजकारणाला भाजप नेत्यांनी साथ दिली,मी भाजपचा आभारी आहे असंही त्यांनी सांगितल्याचा हल्लाही अंधारे यांनी केला आहे.
याचदरम्यान, सुषमा अंधारे यांनी एकनाथ शिंदेंना डिवचलं आहे. त्या म्हणाल्या,एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद पुन्हा स्वत:कडं ठेवण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी त्यांचं दबावाचं राजकारण कामी आलं नसल्याचं अंधारे यांनी म्हटलं. यावेळी देशात सध्या हुकूमशाही सुरू असल्याची खोचक टीकाही त्यांनी केली.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुककीचा निकाल जाहीर झाला आहे. यात महायुतीला 230 जागांवर यश मिळालं आहे. तर महाविकास आघाडीला अवघ्या 49 जागांचा आकडा गाठता आला आहे. त्यामुळे या निकालावर आघाडीने आक्षेप घेतला आहे. EVM विरोधात महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे.
EVM विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मोठं आंदोलन उभारण्याच्या तयारीत असल्याच्या तयारीत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष वकिलांची टीम करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येतेय. ईव्हीएमबाबत आक्षेप किंवा निवडणूक प्रक्रियेतील चुकीच्या बाबींबातचे पुरावे गोळा करण्याच्या सूचना शरद पवारांनी उमेदवारांना दिल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.