Vande Mataram Debate : 'वंदे मातरम्'चा 'इव्हेंट' भाजपच्या अंगलट, पैशाच्या जोरावर घोटाळे करून निवडून येणाऱ्या सरकारचे पंतप्रधान हीच मोदींची जागतिक ओळख...'

Parliament Debate Modi vs Congress : 'वंदे मातरम्'ला दीडशे वर्षे झाल्याबद्दल भारतीय जनता पक्षाने एक ‘उत्सव’ म्हणजे ‘इव्हेंट’ करायचे ठरवले; पण हा खेळ पंतप्रधान मोदी व भाजपच्या अंगलट आल्याचे दिसते. ‘वंदे मातरम्’वर लोकसभेत चर्चा सुरू करून चूक केली असे मोदी यांना आता वाटत असेल.'
Narendra Modi Uddhav Thackeray
A heated discussion in Parliament as leaders debate the legacy of Vande Mataram on its 150th anniversary. The image reflects intense political exchanges over nationalism and history.Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 10 Dec : वंदे मातरम या गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त संसदेत सोमवारपासून चर्चा सुरू आहे. या चर्चे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस आणि पंडित नेहरूंनी वंदे मातरमचे तुकडे केले, विश्वासघात केल्याचा आरोप पंतप्रधानांनी केला. मोदींच्या या आरोपावर काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी यांनी आपल्या भाषणातून मोदींंना जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं.

अशातच आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. ''वंदे मातरम्'ला दीडशे वर्षे झाल्याबद्दल भारतीय जनता पक्षाने एक ‘उत्सव’ म्हणजे ‘इव्हेंट’ करायचे ठरवले; पण हा खेळ पंतप्रधान मोदी व भाजपच्या अंगलट आल्याचे दिसते. ‘वंदे मातरम्’वर लोकसभेत चर्चा सुरू करून चूक केली असे मोदी यांना आता वाटत असेल. ‘वंदे मातरम्’ प्रकरणात समस्त विरोधी पक्षाने पंतप्रधान मोदींसह भाजपला वेड्यात काढले.

भाजपच्या तथाकथित राष्ट्रवादाचा मुखवटाच ओरबाडून काढला. मुळात भाजप किंवा त्यांच्या संघ परिवाराचा भारतीय स्वातंत्र्य लढ्याशी कोणताच संबंध नाही. या लोकांच्या अंगावर स्वातंत्र्य लढ्यात साधा ओरखडाही उमटला नाही आणि हे ढोंगी राष्ट्रवाद, देशभक्ती, ‘वंदे मातरम्’वर देशाला ज्ञान देतात हा विनोद आहे, अशा शब्दात सामनातून मोदींसह भाजप आणि आरएसएसवर टीका करण्यात आली आहे.

तर 1896 मध्ये कोलकाता काँग्रेस अधिवेशनात तरुण रवींद्रनाथ टागोरांनी काँग्रेसच्या मंचावरून प्रथम ‘वंदे मातरम्’ गायले तेव्हा लोकमान्य टिळक, गोपाळ कृष्ण गोखले, दादाभाई नौरोजी यांच्यासह संपूर्ण सभागृह राष्ट्रभक्तीने रोमांचित होऊन उभे राहिले. त्या क्षणापासून हे गीत राष्ट्राचा आत्मा बनले. अर्थात विडंबना अशी की, ज्या काँग्रेसने ‘वंदे मातरम्’ला मंच दिला, प्रतिष्ठा दिली त्याच काँग्रेसकडून नव्या जमान्यातील राष्ट्रभक्तीचे ठेकेदार राष्ट्रभक्तीचे प्रमाणपत्र मागत आहेत, असा टोला पंतप्रधान मोदींना सामनातून लगावला आहे.

तर भाजपचे पूर्वज स्वातंत्र्य लढ्यात नव्हते. ते इंग्रज आणि मोहम्मद अली जीनांबरोबर होते. द्विराष्ट्रवादाचे समर्थन करीत होते व आता सत्तेवर बसून राष्ट्रभक्तीवर ज्ञान पाजळत आहेत. भाजपला व संघ परिवारास अचानक ‘वंदे मातरम्’वर प्रेम उफाळून आले. हा बंगाल निवडणुकीसाठी चाललेला खेळ आहे. संघ परिवाराने देशाला सांगायला हवे की, त्यांच्या शाखांमध्ये सर्वप्रथम ‘वंदे मातरम्’ कधी गायले होते?

Narendra Modi Uddhav Thackeray
Municipal Elections Delay : महापालिका निवडणूक पुन्हा लांबणीवर? अंतिम मतदारयाद्यांना विलंब लागल्याने संभ्रम

संघाने तेसुद्धा स्पष्ट केले पाहिजे की, त्यांना ‘वंदे मातरम्’बाबत इतके प्रेम होते तर आपल्या शाखांत ‘वंदे मातरम्’ऐवजी ‘नमस्ते सदा वत्सले मातृभूमी’चा स्वीकार का केला? असा सवालही सामनात उपस्थित केले आहेत. तर ‘वंदे मातरम्’वरील चर्चेत पंतप्रधान मोदी नेहमीप्रमाणे नेहरूंवर घसरले. प्रे. ट्रम्प, पुतीन यांच्याबरोबर कितीही मेजवान्या झोडल्या व त्यांना मिठ्या मारल्या तरी पंडित नेहरूंना जागतिक नेते म्हणून मिळालेला मान, प्रतिष्ठा मोदींच्या वाट्याला येऊ शकत नाही.

निवडणुकीत घोटाळे करून, पैशांचा वापर करून निवडून येणाऱ्या सरकारचे पंतप्रधान हीच त्यांची जागतिक ओळख आहे, असा जोरदार हल्लबोल देखील ठाकरेंकडून करण्यात आला आहे. तर ‘वंदे मातरम्’वरील चर्चेत प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांची भंबेरी उडवली. सत्ताधारी खासदारांची वाचाच गेली. प्रियंका म्हणाल्या, ‘‘जितकी वर्षे मोदी देशाचे पंतप्रधान आहेत, तितकी वर्षे जवाहरलाल नेहरू देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात तुरुंगात राहिले.’’

नेहरू 17 वर्षे प्रधानमंत्री राहिले व त्यांनी देश घडवण्याचे काम केले. शिवाय विविध संस्थांची स्थापना करत नेहरूंनी या देशासाठी, देशाची सेवा करीत शेवटचा श्वास घेतला, असं प्रियंका गांधी म्हणाल्या. त्यानंतर प्रियंका गांधींनी थेट मोदींना आव्हान दिलं, त्या म्हणाल्या, "मोदीजी, नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधींना काय बोलायचंय, दोष द्यायचेत ते एकदाचे देऊन टाका. त्यासाठी हवे तेवढे तास चर्चा ठेवा; पण त्यानंतर मात्र ते थांबवा आणि बेरोजगारी, महागाई, महिलांच्या समस्या यावर पण चर्चा करू या.’’

Narendra Modi Uddhav Thackeray
Sanjay Shirsat News : उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा मोह झाला होता, आदित्य ठाकरेंना विरोधी पक्षनेतेपदाचा होतोय!

देशात असंख्य प्रश्न थैमान घालीत असताना पंतप्रधान मोदी व त्यांचे अंधभक्त ‘वंदे मातरम्’वर वाद उकरून काढतात. देशाची हवाई नागरी सेवा उद्ध्वस्त झाली आहे. अनेक म्हातारे, आजारी लोक विमानतळावर अडकून पडले आहेत. लोकांची लूट चालली आहे आणि मोदी संसदेत वंदे मातरमचे वाद आणि चर्चा करण्यात व्यस्त आहेत. प. बंगालच्या निवडणुका जिंकता याव्यात म्हणून पाच वर्षांपूर्वी मोदी यांनी दाढी वाढवून रवींद्रनाथ टागोरांचे रूप धारण केले होते. मात्र त्याचा काहीच परिणाम झाला नाही.

आता त्यांनी प. बंगाल निवडणुकीसाठी ‘वंदे मातरम्’ आणि बंकिमचंद्र यांना वेठीस धरले, पण त्यात मोदी यांचीच फजिती झाली. प्रियंका गांधी यांनी तर हसत हसत मोदींच्या जखमेवर मीठ चोळले. राष्ट्रभक्तीचा बाजार आणि व्यापार करणे हाच पंतप्रधान मोदी व त्यांच्या लोकांचा खेळ आहे. ‘वंदे मातरम्’ पवित्र असल्याने या प्रकरणात ते फसले आहेत. ‘वंदे मातरम्’चा गजर करीत भगतसिंगांपासून अशफाकउल्ला खानपर्यंत असंख्य क्रांतिवीर फासावर गेले. त्यात मोदी पक्षाचा एकही पूर्वज नव्हता. त्यांनी ‘वंदे मातरम्’वर ज्ञान पाजळावे हा अतिरेकच आहे, असं म्हणत सामनातून मोदींसह भाजप संघावर ताशेरे ओढले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com