
VBA ready alliance with MVA: महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक युत्या आणि आघाड्या सुरु झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच शिवशक्ती-भिमशक्तीची घोषणा झाली. त्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीनं महाविकास आघाडीला साद घातली आहे. तसंच आपली भूमिका आणि उद्देशही जाहीर केला आहे. पण वंचितनं ही साद घालताना नेमकं काय म्हटलं आहे, जाणून घेऊयात.
वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी म्हटलं की, "स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजप आणि त्याचे मित्रपक्ष सोडून इतरांसोबत युती करायला आम्ही तयार आहोत. कोणी सोबत आलं किंवा नाही आलं तरी, आमची भाजपाच्या विरुद्धची कट्टर हिंदुत्ववादाच्या संदर्भातील लढाई ही सुरूच राहील. आताच्या जनसुरक्षा विधेयकाच्या माध्यमातून दलित, आदिवासी, मुस्लिम यांना निर्माण झालेली असुरक्षितता यामुळं आम्हाला आमचा संघर्ष करावाच लागेल"
अंजलीताई आबेडकर या वंचित बहुजन आघाडीचे समन्वयक प्रकाश आंबेडकर यांच्या पत्नी आहेत. त्यांनी स्वतः जाहीररित्या वंचितनं महायुतीतील पक्षांशिवाय इतर पक्षांसोबत युतीसाठी तयारी दर्शवली आहे. याचा अर्थ महायुतीत असलेल्या भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार, शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षासोबत ते जाणार नाहीत. पण या तीन पक्षांशिवाय इतर पक्षांशी युती करण्यासाठी त्यांना अडचण नाही. याचं कारणही त्यांनी स्पष्ट केलं आहे. महायुती ही कट्टर हिंदुत्वाचा पुरस्कार करते त्यामुळं या कट्टरतेविरोधात आपला मुळातच लढा सुरु आहे. त्यामुळं सहाजिकच महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांचा कॉमन मिनिमम प्रोग्राम हा हिंदुत्वाचा पुरस्कार करणार नाही. त्यामुळं मविआतील तीन पक्षांबाबत वंचितची मवाळ भूमिका आहे.
दरम्यान, आंबेडकर कुटुंबातील सदस्य आणि प्रकाश आंबेडकर यांचे धाकटे बंधू आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेना या पक्षानं नुकतीच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत युतीची घोषणा केली. आजवर केवळ रस्त्यावरची लढाई लढत असलेल्या आंबेडकरी तरुणांना मुंबईसह इतर महापालिका निवडणुकीत सत्तेत वाटा मिळेल ही हमी मिळाल्यानं आपणं शिवसेनेसोबत युती केली असल्याचं आनंदराज आंबेडकर यांनी सांगितलं होतं. पण त्यांना शिंदेंसोबत युती केल्यानं आंबेडकरी जनतेतून मोठी टीकाही सहन करावी लागली होती.
यापार्श्वभूमीवर भाजपनं विधानसभा निवडणुकीत पुन्हा मुसंडी मारलेली असली तरी त्यांना महापालिका निवडणुकीत रोखता येईल हा विचार करुन तसंच त्यांच्या कथित संविधानविरोधी धोरणांना विरोध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीची साथ खुणावू लागलं आहे. यापूर्वी देखील २०२४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी वंचित बहुजन आघाडीनं मविआच्या नेत्यांसोबत युतीसंदर्भात चर्चा केल्या होत्या. परंतू जागा वाटपाचा तिढा सुटण्याची चिन्हं नसल्यानं वंचितनं आपली वेगळी चूल मांडली होती. तसंच प्रकाश आंबेडकर यांनी देखील मध्यंतरी एका मुलाखतीत एकत्र येऊन अर्थात युतीचं राजकारण केल्याशिवाय आंबेडकरी पक्षांना गत्यंतर नसल्याचं म्हटलं होतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.