Mumbai News, 13 Dec : महाराष्ट्र सरकारचं नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच मागील काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी वेगळ्या विदर्भाची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीनंतर भाजपचे नेते तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे देखील आणची वेगळ्या विदर्भाबाबत आमची भूमिका कायम असून यावर आम्ही काम करत आहोत असल्याचं वक्तव्य केलं होतं.
या दोन्ही नेत्यांच्या मागणीमुळे वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राज्यातील राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. याच मुद्द्यावरून आता ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजप आणि काँग्रेसने कितीही आपटली तरी वेगळा विदर्भ होणार नाही. कुणी कितीही प्रयत्न केला तरी मराठी माणूस महाराष्ट्राचे तुकडे पडू देणार नाही, असं राऊतांनी म्हटलं आहे.
संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत देशासह राज्यातील विविध मुद्द्यावर भाष्य केलं. यावेळी त्यांनी विरोध पक्षनेते पदावरून भाजपवर हल्लाबोल केला. 'विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यामुळे संसदेतील चर्चेत जान आहे. संसदीय लोकशाहीमध्ये विधानसभा सभागृहात विरोधी पक्ष नेता असणं गरजेच आहे. मात्र, मागील 10 वर्षांत विरोधी पक्ष नेता कुठे ठेवायचाच नाही, त्या अनुषंगाने निकालांची मांडणी करायची, हे मोदी आणि शाह यांच्या राजकारणाने ठरवलं आहे.
पण तरीही राहुल गांधींनी त्यांचे 100 खासदार निवडून आणले. तसेच आमचे काही खासदार, त्यामुळे सरकारला लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद टाळता आलं नाही. आता महाराष्ट्रा सारख्या राज्याला विरोधी पक्षनेता दोन्ही सभागृहात नाही. याची सत्ताधाऱ्यांना लाज वाटली पाहिजे. विरोधी पक्षनेत्याशिवाय तुम्ही सभागृहाचं कामकाज पुढे नेत आहात याचा अर्थ तुम्ही विरोधी पक्षांना घाबरता. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना आणि दिल्लीत अमित शाह यांना लोकशाहीचे कोणतेही संकेत पाळायचे नाहीत असं दिसतंय.
याआधी संख्याबळ कमी असतानाही दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेते नेमलेले आहेत. संसदेत भाजपची संख्या कमी असतानाही विरोधी पक्ष नेता नेमलेला आहे, असं राऊत म्हणाले. दरम्यान, यावेळी वेगळ्या विदर्भाच्या मागणीवर भाष्य केलं. ते म्हणाले, 'आज मुंबई, विदर्भ तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. या राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे हे सांगतात की विदर्भ वेगळा करण्यासाठी आमचं काम सुरू आहे, हा आमचा आजेंडा आहे.
त्यावर देवेंद्र फडणवीस काम करत असल्याचं ते सांगतात. मात्र, यावर मिंधे गटाचा एकही आमदार बोलला नाही याचा अर्थ हे अमित शाहांचे मिंधे आहेत. प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रावर आक्रमण होत आहे. पालघरच्या सीमा ओलांडून गुजरातने आत प्रवेश केला आहे.' तर यावेळी पत्रकारांनी विजय वडेट्टीवार यांचं वेगळ्या विदर्भाच्या मागणीला समर्थन असल्याचं विचारताच राऊत म्हणाले, आम्ही वडेट्टीवार आणि काँग्रेसच्या भूमिकेला समर्थन देत नाही.
कोणी कितीही आदळआपट केली तरी विदर्भ महाराष्ट्रापासून वेगळा होणार नाही. भाजपने कितीही प्रयत्न केला तरी मराठी माणूस महाराष्ट्राचे तुकडे पडू देणार नाही. आता तर महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या भूमिकेसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आहेत. त्यामुळे जर कोणी हे स्वप्न पाहत असेल तर स्वप्नभंग होईल, अशा शब्दात संजय राऊतांनी काँग्रेस आणि भाजपवर वेगळ्या विदर्भाच्या मागणीवरून जोरदार हल्लाबोल केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.