Mumbai News, 02 Apr : बहुचर्चित वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक (Waqf Amendment Bill) बुधवारी (ता.02) लोकसभेत माडलं जाणार आहे. याबाबतचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. प्रश्नोत्तराच्या तासानंतर हे विधेयक सभागृहात मांडलं जाणार आहे.
या विधेयकावर 8 तास चर्चा केली जाणार असल्याची माहिती सांगण्यात आली आहे. मात्र, हे विधेयक सभागृहात माडांयच्या आधीच महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे. कारण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काल ट्विट करत ठाकरेंच्या शिवसेनेला डिवचलं होतं.
'वक्फ सुधारणा विधेयक उद्या संसदेत! बघू या उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना, हिंदूहृदयसम्राट, वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार राखणार की राहुल गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवून तुष्टीकरण करीत राहणार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. आता फडणवीसांच्या या प्रश्नावर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये, अशा शब्दात राऊतांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं आहे. माध्यमांशी संवाद साधताना राऊत म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, हिंदुत्व आणि शिवसेना शिकवू नये. भाजप आणि फडणवीसांना मिशा फुटल्या नव्हत्या, तेव्हापासून आम्ही हिंदुत्वाच्या मिशीला पिळ देत या देशात फिरतोय.
वक्फ सुधारणा बील आणि हिंदुत्वाचा काहीही संबंध नाही. वक्फ संदर्भात जे बील आहे त्यामध्ये सरकार काही बदल करू पाहत आहे. मात्र, त्या बिलाला फक्त मुसलमानांचा विरोध आहे असं नाही. तर या बिलाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ( RSS) ही पूर्णपणे पाठिंबा नाही, असा दावा राऊतांनी केला.
शिवाय ज्याप्रमाणे औरंगजेबाच्या कबरीच्या भूमिकेबाबत संघाने जी भूमिका घेतली तशीच भूमिका घेत संघानेही या बिलाला विरोध दर्शवला असून उगीच वातावरण खराब करू नका, अशी भूमिका संघाची असल्याचं राऊत म्हणाले. शिवाय हिंदुत्वाचा आणि या बिलाचा मेळ कोणी घालत असेल तर तो केवळ मूर्खपणा आहे, असंही राऊत यांनी म्हटलं.
या बिलाचा आणि हिंदुत्वाचा काय संबंध? हे फडणवीस सांगू शकतील का? ज्याप्रमाणे इतर सुधारणा बिल असतात त्याचप्रमाणेच हे विधेयक आहे. या बिलाचा संबंध भविष्यात काही उद्योगपतींना या जमिनीवर कब्जा मिळावा हा स्पष्ट हेतू असल्याचा गंभीर आरोप देखील राऊतांनी यावेळी केला.
तर या विधेयकाबद्दल शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक खासदार, पदाधिकाऱ्यांसोबत आम्ही चर्चा केली असून आमची भूमिका ठरली असून ती भूमिका शेवटच्या क्षणी सभागृहात दिसेल, असे संकेतही राऊतांनी यावेळी दिले. त्यामुळे आता ठाकरे गट वक्फ बोर्ड सुधारणा बिलाच्या समर्थनार्थ मतदान करणार की विरोधात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.