

Mumbai, 08 January : मुंबई महापालिका निवडणुकीत मुलीला उमेदवारी न मिळाल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार दगडू सपकाळ हे नाराज झाले आहेत. शिवसेनेने मला फार मोठं केलं आहे, यात वाद नाही. पण गेल्या १५ वर्षांत मी पक्षाकडं काहीही मागितलं नाही. पक्षाचं प्रत्येक काम मी बघत होतो. पक्षप्रमुखांनी मला एक फोन करून ‘मी तुझ्याबरोबर आहे. माझी अडचण आहे, मी तिकिट देऊ शकत नाही,’ असं सांगितलं असतं तर माझ्यासाठी ते खूप झालं असतं. पण एक फोनसुद्धा त्यांनी मला केला नाही, त्यामुळे मी नाराज झालो आहे, हे खरं आहे, असे सपकाळ यांनी स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर दगडू सपकाळ (Dagdu Sapkal) म्हणाले, चर्चा करणारे फक्त चर्चाच करत असतात. आपल्याकडे कोणी पाहुणा आला तर आपण त्यांना हाकलून लावतो का. त्यांना माझी तब्येत चांगली नाही, असं कोणीतरी सांगितलं. त्यांनी फोन केला, भेटायला येतोय, तर त्यांना नको म्हणून सांगू का, असा सवाल सपकाळ यांनी केला.
एकनाथ शिंदे आले, त्यांनी माझी तब्येत आणि कुटुंबाची चौकशी केली. ते आले म्हणजे एकटे नव्हते. नारायण राणे, मुरली देवरा यांचे चिरंजीव त्यावेळी सोबत होते. त्यांच्या भेटीनंतर जुन्या आठवणी ताज्या झाल्या, हे साहजिक आहे. ठाकरे कुटुंबामुळेच मी मोठा झालो, हे मला मान्य आहे. पण तुम्ही मला मोठं केलं म्हणून अशा पद्धतीने अपमानित करणं, हे बरोबर नाही ना. त्यामुळे मी घरी बसण्याचं ठरवलं, असेही सपकाळ यांनी स्पष्ट केले.
मी माझ्या मुलीला तिकिट मागितलं तेव्हा पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं की, मी पंधरा वर्षे तुमच्याकडे काही मागितलं नाही. नगरसेवक होण्याची माझ्या मुलीची इच्छा आहे, त्यामुळे एक तिकिट द्या, अशी मागणी केली होती. शरद पवार यांच्या पक्षासाठी ११ जागा दिल्या. त्यांनी शिवसेनेसाठी कधी रक्त सांडलं. मग मला ते एक तिकिट देऊ शकत नव्हते का, ते मला काही बोलले नाही, मी काही बोललो नाही आणि आता बोलणार नाही, असेही दगडू सपकाळ यांनी सांगितले.
सपकाळ म्हणाले, शिवसेनेला मला मोठं केलं, नाहीतर दगडू सपकाळला कोण विचारतो. आम्ही मातोश्रीला आजही आमचं दैवत मानतो, त्यामुळे आम्ही चुकूनही मातोश्रीच्या आणि साहेबांच्या विरोधात एक शब्दही बोलणार नाही. पण मी आता घरातच बसायचं ठरवलं आहे. इतका अपमान मी या वयात सहन करणार नाही.
त्यांनी मला एक फोन केला असता मी अडचण आहे, मी तिकिट देऊ शकत नाही’ असे सांगितलं असतं तर काही अडचण नव्हती. पण साधं तेवढंसुद्धा त्यांनी केलं नाही; म्हणजे पक्षातील माझी गरज संपलेली आहे. दगडू सपकाळ हे नाव मागं टाकायचं ठरवलं असेल तर त्याची चर्चा कशाला करायची? त्याचं वाईट तर वाटणारच ना? पण आम्ही वाईट वाटणार नाही.
शिवसेनेत कोणी किती त्याग केला आहे, हे दगडू सपकाळला माहिती आहे, त्यामुळे मी तोंड उघडणार नाही. ज्या पक्षाने आणि लोकांनी आपल्याला एवढं मोठं केलं, त्यांच्या विरोधात बोलून आपण काय मिळविणार? वेगळी भूमिका घेण्याबाबत मी आताच बोलणार नाही. पण मी घरी बसणार हे नक्की आहे. एकनाथ शिंदेंसोबत जाण्यासारखी आज तरी परिस्थिती नाही. पण मी घरी बसतोय, तरी माझी कुणाला गरज वाटली तर मी विचार करेन, असे सूचक भाष्यही दगडू सपकाळ यांनी केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.