MNS News : विदर्भातील मनसेचा बडा नेता अडचणीत; खंडणीचा गुन्हा दाखल
Yavatmal News: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विदर्भातील एकमेव नेता अडचणीत सापडला आहे. यवतमाळमधील वणीच्या पोलिसांनी त्याच्यावर खंडणीचा गुन्हा नोंदवला आहे. खंडणी मागणे, धमक्या देणे आणि मजुरांना मारहाण केल्याच्या आरोपाखाली मनसेचे नेते राजू उंबरकर यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत मोठे बदल केले होते. नव्या लोकांना संधी द्यायची असल्याचे सांगून त्यांनी अनेक अनुभवी लोकांना कार्यकारिणीतून डच्चू दिला होता. विदर्भाची धुरा राजू उंबरकर यांच्यावर सोपवली होती. मनसेच्या प्रमुख नेत्यांमध्ये त्यांना स्थान दिले. मनसेच्या नेतेपदी नियुक्ती झालेले उंबरकर हे विदर्भातील एकमेव कार्यकर्ते आहेत.
त्यांनी दोन वेळा विधानसभेची निवडणूक लढवली. राज ठाकरे त्यांच्या प्रचारासाठी आले होते. दोन्ही वेळा उंबरकर यांचा पराभव झाला. पक्षातील कार्यकर्त्यांनी नाराजीही त्यांनी ओढवून घेतली आहे. यात आता खंडणीच्या गुन्हा दाखल झाल्याने उंबरकर यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी मनसेच्या कार्यकर्त्यांची आहे.
चंद्रपूर येथील गजानन कन्स्ट्रक्शन कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर अजय सुदाम हिंगाणे यांच्या तक्रारीवरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उंबरकर यांनी खंडणी मागितली सोबतच साईड इंजिनिअर सागर तन्नीवार आणि निरपेंद्र पटेल, सुपरवायजर व मजुरांना मारहाण केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
उंबरकर यांनी अजय हिंगाणे, सागर तन्निरवार आणि निरपेंद्र पटेल यांना जबरदस्तीने गाडीत बसवून रस्त्याचे बांधकाम दाखवायला घेऊन गेले. त्यांच्या माणसांनी बांधकामाचे फोटो घेतले. त्यानंतर कंपनीच्या येथील प्लांटमध्ये घेऊन गेले. तेथे शिवीगाळ केली. कंपनीच्या कंत्राटदाराला बोलावा, असे फर्मान सोडले.
मालक जयंत उमाकांत मामीडवार त्यांच्या पत्नीची प्रकृती गंभीर आहे आणि त्या दवाखान्यात भरती असल्याने ते येथे येऊ शकणार नाहीत हे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र उंबरकर यांनी काहीच ऐकून घेतले नाही. त्यांच्यासोबत फोनवर बोलण्यासही नकार दिला. मी फोनवर कोणाशी बोलत नाही. उद्या मालकाला माझ्याकडे पाठवा नाही तर संपूर्ण प्लांट जाळून टाकीन अशी धमकी दिल्याचे तक्रारीवरून पोलिसांनी उंबरकर यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.