
Nagpur APMC News: नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या घोटाळ्याचा तपास करण्यासाठी राज्य शासनाने एसआयटी स्थापन करताच बाजार समितीच्या कार्यालयाला सील लावण्यात आले आहे. याशिवाय विद्यमान सचिवाची तडकाफडकी पुण्यात बदली करण्यात आली आहे. यामुळे अनेकांची धाबे दणाणले आहेत. या बाजार समितीवर काँग्रेसचे नेते व माजी मंत्री सुनील केदार यांचे वर्चस्व आहे.
भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडून या बाजार समितीत सुमारे ४० कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा आरोप केला होता. यापूर्वी शासनाने नियुक्त केलेल्या दोन समितीनेसुद्धा आपल्या अहवालात या घोटाळ्याचा उल्लेख केला होता, असे असतानाही एकाही अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली नाही याकडे त्यांनी पणन मंत्री जयकुमार रावल यांचे लक्ष वेधले होते. भाजपचे आमदार प्रवीण दटके आणि आमदार आशिष देशमुख यांनीसुद्धा आरोपांच्या फैरी करून कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त करावी अशी मागणी केली होती. त्यावर रावल यांनी सुरुवातीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करण्याची घोषणा केली होती.
मंगळवारी १५ जुलैला ही लक्षवेधी मांडण्यात आली होती. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी पणन मंत्री रावल यांनी एसआयटी समिती स्थापन केल्याचा आदेश काढला. नागपूरचे जिल्हाधिकारी यांना तपास समितीचे अध्यक्ष करण्यात आले आहे. त्यांच्या सोबतीला नागपूर ग्रामीणचे जिल्हा पोलिस अधीक्षक सदस्य म्हणून तर औरंगाबदचे सहकार उपनिबंधक यांची सचिव म्हणून या समितीत नियुक्ती केली आहे. या समितीला ३० दिवसांत चौकशी अहवाल सादर करायचा आहे.
कळमना बाजार समितीच्या भ्रष्टाचाराच्या वारंवार तक्रारी येत असल्यामुळे शासनाने २०१७ मध्ये ए. डी. पाटील यांची चौकशी समिती स्थापन केली होती. पाच अधिकाऱ्यांच्या चौकशी समितीने कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा अहवाल सादर केला होता. त्यानंतरही कुठलीच कारवाई करण्यात आली नाही. नंतर पुन्हा एक सदस्यीय खंडागळे समिती स्थापन करण्यात आली. या समितीनेसुद्धा जवळपास ४० कोटी रुपयांचा महसूल ५१ दलाल, तत्कालीन सचिव व संचालक मंडळ यांनी संयुक्तपणे बुडवल्याचा अहवाल सादर केला होता. या भ्रष्टाचारात माजी सचिव व विभागीय सहनिबंधक राजेश भुसारी यांची मोठी भूमिका आहे. त्यांच्यावर काँग्रेसच्या एक बड्या नेत्याचा वरदहस्त असल्याचा दावा आमदार खोपडे यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.